आज वैशाख शुक्ल द्वितीया (२.५.२०२२) या दिवशी सौ. मधुरा धनंजय कर्वे यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांचे यजमान श्री. धनंजय कर्वे आणि त्यांचा मुलगा श्री. राज कर्वे यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
सौ. मधुरा धनंजय कर्वे यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. साधना कळल्यावर सत्संगात सांगितलेल्या सूत्रांचे तंतोतंत पालन करणार्या सौ. मधुरा कर्वे !
वर्ष २००६ मध्ये आमच्या कुटुंबात सर्वप्रथम सौ. मधुरा साधनेत आली. ती सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्या सत्संगांना जाऊ लागली. ती सत्संगात सांगितलेल्या सर्व सूत्रांचे तंतोतंत पालन करायची. सत्संगात सांगितल्याप्रमाणे कृती करून तिने ते आपल्या वृत्तीत आणले. महिलांनी टिकली न लावता कुंकू लावण्यामागचे शास्त्र आणि त्याचे महत्त्व कळल्यावर तिने ते लगेच कृतीत आणले.
२. सर्व कुटुंबालाच साधनेला प्रवृत्त करणार्या सौ. मधुरा कर्वे !
‘घरातील स्त्री साधना करत असल्यास ती सर्व कुटुंबालाच साधनेत घेऊन येते’, याचे उदाहरण म्हणजे आमचे कुटुंब ! ‘जितुकें कांहीं आपणासी ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें । शाहाणें करूनी सोडावे । बहुत जन ।। – दासबोध, दशक १९, समास १०, ओवी १४ म्हणजे ‘आपल्याला जे ठाऊक असते, ते हळूहळू इतरांना शिकवावे. अशा प्रकारे सर्वांना शिकवून शहाणे करावे.’ या उक्तीनुसार सत्संगात कळलेली प्रत्येक गोष्ट तिने घरी येऊन सांगितल्यामुळे आमच्यावरही साधनेचे संस्कार होऊ लागले. आमचा मुलगा राज मुळातच सात्त्विक असल्याने त्याने ते लगेच आत्मसात केले; परंतु माझी वृत्ती मायेतील असल्यामुळे मी त्याकडे अधिक लक्ष देत नसे; मात्र मधुराने कधीही कंटाळा न करता प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगितली.
३. मायेची आसक्ती नसणे
मधुराने संगणकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले आहे; परंतु ‘नोकरी करून पैसा कमावावा’, हे तिला फारसे रुचत नव्हते. ‘राजवर चांगले संस्कार व्हावेत’, यासाठी तिने राज आणि घर यांच्याकडे लक्ष देण्यास प्रथम प्राधान्य दिले.
४. सेवेची तळमळ
४ अ. दुकानात येणार्यांना साधनेचे महत्त्व सांगणे : आमचे बांधकामासाठी लागणार्या साहित्याचे (हार्डवेअरचे) दुकान होते. दुकानामध्ये अधिकतर कामगारवर्ग साहित्य घ्यायला यायचा. मी बांधकामांच्या ठिकाणी कामासाठी जात असल्यामुळे मधुराच अधिक वेळ दुकान सांभाळत असे. दुकानात येणार्या पुष्कळ जणांना तिने साधनेचे महत्त्व सांगितले होते. दुकानात येणारे लोक मधुराचा आदर करत असत.
४ आ. मिळालेली प्रत्येकच सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे : मधुराला कोणत्याही सेवेविषयी नकारात्मकता नसते. मिळालेली प्रत्येकच सेवा भावपूर्ण, परिपूर्ण आणि झोकून देऊन करण्याचा तिचा प्रयत्न असतो. ती आता महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे केल्या जाणार्या संशोधनाची सेवा दायित्व घेऊन करते; पण ‘त्याचा तिला ताण आला आहे’, असे तिने आतापर्यंत कधीही सांगितले नाही.
– श्री. धनंजय कर्वे (यजमान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.४.२०२२)
साधकांना साहाय्य करणार्या आणि भावपूर्ण सेवा करणार्या सौ. मधुरा धनंजय कर्वे !
१. साधकांना साहाय्य करणे
सहसाधक त्यांच्या सेवेतील किंवा अन्य अडचणी आईला सांगत असतांना ती साधकांचे बोलणे शांतपणे ऐकून घेते. एखाद्या साधकाची कुठल्याही प्रसंगामुळे मनःस्थिती बिघडलेली असल्यास ती पूर्ववत् होण्यासाठी आई त्या साधकाला वेळ देऊन साहाय्य करते. त्या साधकाची मनःस्थिती पूर्ववत् झाल्यावर त्या साधकालाच ‘त्या प्रसंगात मी कुठे न्यून पडलो ?’, याची जाणीव होते. तेव्हा आई संबंधित साधकाला ‘त्या प्रसंगात योग्य काय असायला हवे होते ?’, हे प्रेमाने सांगते. आई सर्वांना प्रेमाने हाताळत असल्यामुळे साधकांना त्यांच्या अडचणी तिला मोकळेपणाने सांगता येतात.
२. संशोधक बुद्धी
आईमध्ये मुळातच संशोधक बुद्धी आहे. त्यामुळे तिला संशोधनाचे नाविन्यपूर्ण विषय सुचतात, तसेच अन्य कोणी विषय सुचवल्यास तिला आनंद होतो. काही मासांपूर्वी ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होणार्या यज्ञयागांचा स्वर्गलोक, महर्लाेक आणि जनलोक आदी उच्च लोकांतील जीवात्म्यांवर सूक्ष्मातील परिणाम होतो का ?’, हे अभ्यासण्याविषयी एका साधकाने सुचवले. आईला ही नाविन्यपूर्ण कल्पना पुष्कळ आवडली अन् हा प्रयोग घेण्यासाठी तिने पुढाकार घेतला. तसे प्रयोग केल्यावर ‘आश्रमात होणार्या यज्ञयागांचा सप्तलोकांतील जीवात्म्यांवर सूक्ष्मातून परिणाम होतो’, हे लक्षात आले.
३. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’द्वारे केल्या जाणार्या आध्यात्मिक संशोधनांसंबंधी लेख लिहिणे
३ अ. एकाग्रता साधून लेख लिहिणे : ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’द्वारे केले जाणारे आध्यात्मिक संशोधन लवकरात लवकर समाजापर्यंत पोचायला हवे’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तळमळ आहे. त्यामुळे आई आश्रमातून घरी आल्यानंतरही वेळ मिळेल तेव्हा किंवा पहाटे उठून लेख लिहिण्याची सेवा करते. ती लेख लिहितांना त्यात पूर्णतः तल्लीन होते. तेव्हा ‘तिला हाक मारली, तरी ऐकू येत नाही, तसेच ‘सभोवती काय चालू आहे ?’, याचेही तिला भान नसते. ‘एकाग्रता साधणे, सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास करणे आणि लिखाण करतांना सूक्ष्मातून देवाशी असलेले अनुसंधान’ यांमुळे केवळ २ – ३ घंट्यांत तिचा एक लेख पूर्ण होतो.
३ आ. ‘तिने लिहिलेल्या लेखातून चैतन्याची स्पंदने प्रक्षेपित होतात’, असे मला जाणवते. परात्पर गुरु डॉ. आठवले आईच्या लेखांविषयी पुष्कळ कौतुक करतात.
४. भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणे
आई ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन विभागाच्या अंतर्गत वैज्ञानिक उपकरणांद्वारे घेण्यात येणार्या प्रयोगांचे निष्कर्ष मांडणारे लेख लिहिते, तसेच एका साधिकेसह संशोधन विभागाचे दायित्वही सांभाळते. आई भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करते. तिची बौद्धिक क्षमता उत्तम असून तिच्यात भावही चांगला आहे. तिच्यात भाव असल्यामुळे तिला सेवेत बुद्धीचा अडथळा येत नाही. तसेच तिची बुद्धी सात्त्विक असल्यामुळे ती समष्टी साधना चांगल्या प्रकारे करू शकते.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
ती लेख लिहिण्याची सेवा करत असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून तिच्या शेजारी बसून तिला लिखाण करण्याविषयी मार्गदर्शन करत आहेत’, असा तिचा भाव असतो.
६. ‘जीवनभर गुरुसेवा करायला मिळावी’, ही इच्छा असणे
काही वर्षांपूर्वी संधीवातामुळे तिचे शारीरिक स्वास्थ बिघडून तिच्यातील अनेक गुण झाकोळले होते. त्यामुळे तिच्यात एक प्रकारचा न्यूनगंड अन् संकुचितपणा निर्माण झाला होता. ती आश्रमात आल्यापासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे तिला नवनवीन सेवेची संधी मिळाल्याने तिच्यावर आलेले मळभ दूर होऊन तिच्यातील गुणांना उजाळा मिळाला. ‘परात्पर गुरु डॉक्टर टप्प्याटप्प्याने तिला घडवत आहेत’, याविषयी आईच्या मनात कृतज्ञताभाव आहे. ‘जीवनभर गुरुसेवा करायची संधी मिळावी’, हीच तिची इच्छा आहे.
– श्री. राज धनंजय कर्वे (वय २४ वर्षे), ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१९.४.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |