ग्रंथलिखाणाचे अद्वितीय आणि विलक्षण कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

ज्ञानवंत की हो यशवंत की हो कीर्तीवंत । बाप माझा हो ज्ञानवंत ।।

वरील भजनपंक्ती प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या गुरूंच्या संदर्भात लिहिली आहे. प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तम शिष्य आणि सनातनच्या सर्व साधकांसाठी प्राणप्रिय असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदर्भातही वरील पंक्ती सार्थ ठरते. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी ग्रंथांच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञानसरिता समाजापर्यंत पोचवणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘ज्ञानवंत’ आहेत ! सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानामृतामुळे असंख्य जिज्ञासू साधनाभिमुख झाले असून, ८ एप्रिल २०२२ पर्यंत सनातनचे ११४ साधक संत झाले असून, १३४५ साधक संत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टर ‘यशवंत’ आहेत ! अवघ्या २७ वर्षांत, म्हणजे वर्ष १९९५ ते एप्रिल २०२२ पर्यंत ३५४ ग्रंथ-लघुग्रंथांची निर्मिती करणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांचे ग्रंथ-निर्मिती क्षेत्रातील कार्य विलक्षण असून यावरूनही त्यांच्या असामान्य आध्यात्मिक कर्तृत्वाचा परिचय होतो. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टर ‘कीर्तीवंत’ आहेत !

पू. संदीप आळशी

परात्पर गुरु डॉक्टरांची ही ज्ञानगाथा, यशोगाथा आणि कीर्तीगाथा असण्यामागील मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या ग्रंथकार्याचे नानाविध पैलू ! या पैलूंची माहिती देणारी ही लेखमालिका त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. या मालिकेतील हा पहिला लेख आहे. या लेखात दिलेली सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये वाचून सनातनच्या ग्रंथांची आणि त्या योगे परात्पर गुरु डॉक्टरांची थोरवी लक्षात येईल.

संकलक : (पू.) श्री. संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


अध्यात्मातील जिज्ञासूंसाठी ज्ञानाचे एक आगळेवेगळे दालन निर्माण करणार्‍या सनातनच्या ग्रंथांची अद्वितीय वैशिष्ट्ये !

१. ‘पुस्तक’ नव्हे, तर ‘ग्रंथ’ !

प.पू. बेजन एन्. देसाई हे नाशिक येथील एक थोर संत होऊन गेले. वर्ष १९९७ पर्यंत सनातनचे जेमतेम ७ – ८ ग्रंथच प्रकाशित झालेले होते. प.पू. बेजन देसाई यांनी त्या वेळी सांगितले होते, ‘डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या सर्वच ग्रंथांमध्ये अध्यात्मशास्त्रातील सैद्धान्तिक अन् क्रियात्मक असे दोन्ही भाग मांडण्यात आले आहेत. त्यांत प्रतिपाद्य विषयाचा सर्वांगाने विचार करण्यात आला असून, त्याला त्यांच्या सखोल अभ्यासाची बैठक असल्याने ते ग्रंथ कोणाही अनभिज्ञ माणसाला साधनेला उद्युक्त करतात, तसेच परमार्थपथावरील साधक, भक्त आणि उपासक यांची श्रद्धा बळकट करून त्यांची धर्माचरणाच्या मार्गावरील वाटचाल दृढ करतात.’

प.पू. बेजन देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सनातनच्या प्रत्येक प्रकाशनाला ‘ग्रंथ’ किंवा ‘लघुग्रंथ’, असे म्हणायला आरंभ केला. त्या आधी आम्ही ‘पुस्तक’ किंवा ‘पुस्तिका’, असे म्हणत असू. लौकिक दृष्टीने पाहिले तर भौतिक विषयांसंबंधी जे माहिती देते, त्याला ‘पुस्तक’ म्हणतात आणि परमार्थावरील विषयांसंबंधी जो माहिती देतो, त्याला ‘ग्रंथ’ म्हणतात. ‘प.पू. बेजन देसाई यांनी वर्ष १९९७ मध्ये सुचवलेले नामाभिदान अगदी योग्यच होते’, हे पुढे लक्षात आले.

२. अनोखे आणि सखोल अध्यात्मशास्त्रीय ज्ञान !

आध्यात्मिक विषयांवरील विविध ग्रंथांतील सुमारे ३० टक्के लिखाण हे अन्य संदर्भ ग्रंथांतील लिखाण आहे, सुमारे २० टक्के लिखाण हे साधकांना सूक्ष्मातून मिळालेले ईश्वरी ज्ञान आहे, तर ५० टक्के लिखाण ग्रंथांचे संकलक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरूंच्या आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे.

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने काही ज्ञान-प्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणारे सखोल अध्यात्मशास्त्रीय असे ईश्वरी ज्ञान ! : परात्पर गुरु डॉक्टरांना अध्यात्म परिपूर्णतेने समजून घेण्याची तीव्र जिज्ञासा ते अध्यात्मात आल्यापासूनच होती. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग अशा विविध साधनामार्गांतील विषयांच्या संदर्भातील गूढ प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळवायची होती, तसेच अध्यात्मातील विविध गोष्टींमागील शास्त्र जाणून घ्यायचे होते. यासाठी ते अनेक संतांकडून मार्गदर्शन घेत असत, तसेच स्वतः ध्यानातूनही उत्तरे मिळवत असत. वर्ष २००३ मध्ये एकदा त्यांच्या मनात विचार आला, ‘अशा प्रकारे उत्तरे मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागतील. अध्यात्मातील सर्व ज्ञान अखिल मानवजातीपर्यंत लवकर पोचायला हवे. आता देवानेच सर्व प्रश्नांची भराभर उत्तरे द्यायला हवीत, असे काहीतरी व्हायला हवे.’ यानंतर लगेचच सनातनच्या साधिका सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्शक्ति [सौ.] अंजली मुकुल गाडगीळ) यांना अध्यात्मातील काही विषयांवर आपोआप ज्ञान स्फुरले ! हा निवळ योगायोग नव्हता ! परात्पर गुरु डॉक्टरांची जिज्ञासा देवाने अशी पूर्ण केली होती ! कालांतराने अन्य साधकांनाही ज्ञान स्फुरू लागले. सध्या श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) या साधकांच्या माध्यमातून अध्यात्मातील विविध विषयांवर सूक्ष्मातून ‘न भूतो न भविष्यति’, असे सखोल अध्यात्मशास्त्रीय ज्ञान प्रतिदिन पानेच्या पाने भरून मिळत आहे ! अजूनही परात्पर गुरु डॉक्टरांच्या मनातील शेकडो प्रश्नांची उत्तरे मिळवणे शेष आहे !

३. काळानुसार ग्रंथ-निर्मिती

कोणतीही गोष्ट काळानुसार करण्याला महत्त्व आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी ग्रंथ-निर्मितीही काळानुसार केली आहे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभी अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन, अध्यात्म, गुरुकृपायोग यांसारखे निवळ साधना शिकवणारे ग्रंथ लिहिले. ‘सुख-दुःख यांच्या पलीकडे शाश्वत आनंद आहे अन् तो मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे’, यासाठी या ग्रंथांचे प्रयोजन होते. या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने व्यष्टी (वैयक्तिक) स्तरावर साधना कशी करावी, ते सांगितले आहे.

आ. सध्या कलियुगांतर्गत कलियुग चालू आहे. या कलियुगात अराजकता, गुंडगिरी, भ्रष्टाचार, धर्मद्रोह आदी शिगेला पोचले आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला सुखकर जीवन जगणेही जेथे कठीण झाले आहे, तेथे निश्चिंत मनाने साधना करणे दूरच ! समाज, राष्ट्र अन् धर्म यांची ही दुःस्थिती पालटण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य, ईश्वरी राज्य)’ स्थापन करणे, हाच एकमात्र उपाय ठरतो. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार आवश्यक समष्टी साधनाच आहे. यासंदर्भात समाजाला मार्गदर्शन होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’, ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ यांसारख्या समष्टी साधना शिकवणार्‍या ग्रंथांची निर्मिती केली.

इ. कोणतेही सकारात्मक कार्य करतांना त्या कार्यात नकारात्मक शक्तींचा, म्हणजे अनिष्ट शक्तींचा विरोध हा होतोच. सनातन संस्था ‘हिंदु धर्माचा प्रसार करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, या उद्देशांसाठी कार्यरत आहे. सनातन संस्थेच्या साधकांची ही समष्टी साधनाच आहे. या कार्यात अनिष्ट शक्तींचा प्रचंड विरोध होत आहे. हा सूक्ष्मातील लढा साधक गुरूंच्या कृपाशीर्वादाने साधनेच्या बळावर लढत आहेत. या लढ्यात विजयी झाल्याविना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय पूर्णत्वास जाऊ शकणार नाही. यासाठी अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांना, म्हणजेच आध्यात्मिक स्वरूपाच्या त्रासांना समर्थपणे तोंड देता येण्याची आवश्यकता असते. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय’ शिकवणार्‍या दृष्ट, उतारा, नामजप, रिकाम्या खोक्यांचे उपाय आदी विषयांवरील ग्रंथांची निर्मिती केली.

ई. सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्या आणखी वाढतील. ‘आगामी तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील’, असे काही संतांचे भाकीत आहे. अशा घोर आपत्काळात दळणवळणाची साधने तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य उपलब्ध होणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होईल. या आपत्काळाला तोंड देता येण्याच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथमोपचार, अग्निहोत्र, औषधी वनस्पतींची लागवड यांसारख्या विविध विषयांवरील ग्रंथ, हे आपत्काळात जीवन जगणे सुसह्य होण्यासाठी उपयुक्त ठरतील.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)