सभेसाठी १५ सहस्र लोकांची मर्यादा पाळणे कठिण ! – बाळा नांदगावकर, मनसे नेते
संभाजीनगर – येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या होत असलेल्या सभेच्या सिद्धतेसंदर्भात २९ एप्रिल या दिवशी मनसेच्या शिष्टमंडळाने येथील पोलिसांची भेट घेतली. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकरसह प्रमुख नेतेही उपस्थित होते. तब्बल पावणे दोन घंटे शिष्टमंडळाने येथील पोलिसांशी चर्चा केली. या वेळी पोलिसांनी सभेला १५ सहस्र लोकांची अनुमती दिल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले; मात्र सभेविषयी लोकांमध्ये उत्सुकता वाढल्याने ही मर्यादा पाळणे कठिण आहे, असे आम्ही पोलिसांना सांगितले, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांसमवेत मैदानाची पहाणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांना सहकार्य करणार !
पत्रकारांशी बोलतांना बाळा नांदगावकर म्हणाले की, सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही पोलिसांना सर्व सहकार्य करणार आहोत. सभेसाठी मैदानापर्यंत जे मार्ग येतात, तेथे शांतता ठेवावी, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. कुठेही गडबड आणि गोंधळ होणार नाही, याची काळजी मनसेकडून घेतली जाईल. पोलिसांनी सभेसाठी जे नियम ठरवून दिले आहेत, त्याचे पालन केले जाईल, तसेच सभेसाठी पोलिसांनी ज्या अटी घालून दिल्या आहेत, त्या जाचक नाहीत.
कोणी सभा उधळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना रोखण्यास पोलीस सक्षम !
भीम आर्मीने मनसेची सभा उधळून लावण्याची चेतावणी दिली आहे. त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, त्यांना रोखण्यासाठी येथील पोलीस सक्षम आहेत. त्यात आम्ही ढवळाढवळ करणार नाही. आम्हाला सर्वांना समवेत घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे आम्हाला होणार्या विरोधाविषयी आम्ही कठोर होणार नाही, तसेच सभेच्या विरोधात रिपब्लिकन युवा मोर्चाने येथील खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर संविधानाने प्रत्येकाला घटनात्मक अधिकार दिले आहेत. त्याविषयी अधिक बोलणार नाही.
आम्ही युतीसाठी प्रस्ताव दिला नव्हता !
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसमवेत युती करण्याचा भाजपचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्ट केले आहे. मनसेसमवेत युती म्हणजे अपरिपक्वता आहे, असेही ते म्हणाले आहेत. यावर नांदगावकर यांनी ‘आपण कुठे युतीसाठी प्रस्ताव दिला होता ?’, असा प्रश्न केला.