‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही संघटना मुसलमानांची दिशाभूल करते ! – शेख जीना, अध्यक्ष, गोवा हज समिती

शेख जीना, अध्यक्ष, गोवा हज समिती

मडगाव, २९ एप्रिल (वार्ता.) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून (‘पी.एफ्.आय.’कडून) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच भाजप सरकार यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप तथ्यहीन आहेत. ‘पी.एफ्.आय.’ मुसलमानांची दिशाभूल करत आहे, असा आरोप गोवा हज समितीचे अध्यक्ष शेख जीना यांनी भाजपच्या दक्षिण गोवा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

शेख जीना पत्रकार परिषदेत ‘पी.एफ्.आय.’च्या अस्तित्वाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करतांना म्हणाले, ‘‘राष्ट्रीय हज समितीचा अध्यक्ष असतांना मी देशभर दौरे केले; परंतु मला ‘पी.एफ्.आय.’चे अस्तित्व कुठेच जाणवले नाही. ‘पी.एफ्.आय.’ची स्थापना केरळमध्ये झाल्याचे त्यांचे सदस्य सांगतात; परंतु कोची आणि अन्य शहरांमध्ये त्यांचा वावर दिसत नाही.’’

(सौजन्य : Prudent Media Goa)  

शेख जीना यांनी, ‘कर्नाटक आणि केरळ सीमेवर एका गावात ‘पी.एफ्.आय.’ची स्थापना झाली असावी’, असे सांगून ‘पी.एफ्.आय.’ची खिल्ली उडवली. शेख जीना पुढे म्हणाले, ‘‘पी.एफ्.आय.’ गोव्यात काही उपक्रम राबवत असल्याचे दिसते; मात्र ‘पी.एफ्.आय.’ हा काँग्रेसचा ‘ब’ गट आहे. काँग्रेस पक्ष आता संपत आला असून, ‘पी.एफ्.आय.’ ने काँग्रेसमध्ये विलीन होणेच योग्य आहे. ‘पी.एफ्.आय.’ स्वत: कोणतीही निवडणूक लढवत नाही. प्रथम त्यांनी त्यांचा एक पंचसदस्य निवडून आणावा. गोव्यात सर्वधर्मीय एकोप्याने रहात असल्याने येथे कुणीही एकमेकांमध्ये धार्मिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. भाजपच्या काळात राज्यात मुसलमानांचा उत्कर्ष झालेला आहे. ‘पी.एफ्.आय.’ ही मुसलमानधार्जिणी संघटना असून लोकशाहीत अशा संघटनेला थारा नाही.’’

संपादकीय भूमिका

गोव्यातील धार्मिक सलोखा आणि शांती भंग होण्यापूर्वीच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर शासनाने बंदी घालावी !