पू. (डॉ.) नंदकिशोर वेद यांच्या देहत्यागानंतर आणि अंत्यविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद

१. देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

अ. ११.५.२०२१ या रात्री साधारण ८ वाजता माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याच्या आधीपासूनच त्यांचा देह पिवळा दिसत होता. त्यांच्या देहाकडे पाहून मला चैतन्य जाणवत होते.

आ. त्यांच्या उजव्या हातावर आणि उजव्या पायावर ‘ॐ’ उमटलेला दिसला.

इ. त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहून ‘ते शांत आणि आनंदी आहेत’, असे मला जाणवले.

ई. मी त्यांचे अंत्यदर्शन घेतले, तेव्हा ‘ते थोडेसे हसत आहेत’, असे मला वाटले.

उ. त्यांचे केस अतिशय मऊ झाले होते.

ऊ. त्यांच्याजवळ गेल्यावर माझा ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’ असा जप होऊ लागला.

ए. त्यांच्या सहस्रारचक्रावर हात ठेवल्यावर माझा ‘महाशून्य’ हा जप होत होता.

ऐ. ११.५.२०२१ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांचा अत्यंत अमूल्य वेळ आमच्या परिवाराला दिला. त्यांच्याच चैतन्यामुळे आम्ही आजपर्यंत स्थिर राहू शकलो. त्या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांवर ‘त्रिशूळ, ध्वज, स्वस्तिक’, अशी दैवी चिन्हे स्पष्ट दिसत होती. ‘त्यांच्या रूपात श्रीगुरुच आले आहेत’, अशी अनुभूती आम्हा सर्वांना आली.

सौ. क्षिप्रा जुवेकर

२. अग्निसंस्काराच्या वेळी

अ. १२.५.२०२१ या दिवशी माझ्या वडिलांचा अग्निसंस्कार होता. तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सद्गुरु, संत आणि साधक आले होते. तेव्हा ‘वडील सूक्ष्मातून सर्वांच्या चरणी प्रणाम करत आहेत’, असे मला वाटले. अधूनमधून माझा ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असा जप होत होता.

आ. ‘त्यांचा देह हवेत थोडासा वर अधांतरी तरंगत आहे’, असे वाटत होते.

इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे तेथे आगमन झाले. तेव्हा ‘साक्षात् श्रीगुरु तेथे आले आहेत’, असे जाणवले. श्रीगुरूंनी वडिलांना पुढे जाण्यासाठी ऊर्जा दिली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अस्तित्वाने आम्हा सर्वांना चैतन्य मिळाले.

३. अग्निसंस्कारानंतर : १३.५.२०२१ या दिवशी त्यांच्या अस्थींमध्ये ‘ॐ’चा आकार दिसत होता.

‘हे गुरुदेव, आमची कसलीही पात्रता नसतांनाही आपण आमच्यावर कृपा करत आहात. त्यासाठी कितीही कृतज्ञता केली, तरी ती अल्पच आहे. प्रभु, एवढी प्रीती करणारे आपण एकमेव आहात. आपण आम्हाला आपल्या कृपाछत्राखाली घेतले, यापेक्षा अधिक सौभाग्य आणखी कोणतेही नाही. ‘परात्पर गुरुदेव, आम्हालासुद्धा आपल्या श्री चरणी संपूर्ण समर्पित होत येऊ दे’, अशीच प्रार्थना आहे.

– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (मुलगी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२१)


यजमानांच्या (पू. (डॉ.) नंदकिशोर वेद यांच्या) देहत्यागानंतर झालेली विचारप्रक्रिया आणि गुरुकृपेने अनुभवलेली स्थिरता !

श्रीमती मिथिलेश कुमारी

१. यजमानांच्या मृत्यूनंतर धक्का बसणे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सावरल्यावर त्यांच्या कृपेने स्थिर रहाता येणे

ज्या वेळी डॉ. नंदकिशोर वेद यांचा मृत्यू झाला, त्या वेळी मला अकस्मात् धक्का बसला; परंतु श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला सावरले आणि त्यांच्याच कृपेने माझ्या मनात पुढील विचार आले, ‘जिवाने जन्म घेतला, तर त्याचा अंत होणारच आहे. ईश्वराने त्यांना वैकुंठधामात ईश्वरचरणी अर्पण केले.’ त्यांना पाहून माझे मन रिकामे झाले. ‘माझ्या हृदयाला जसे काही कुलूप लागले आहे आणि मी स्थिर झाले आहे’, असे मला वाटले. त्यानंतर मी यजमानांकडे पाहिले, तेव्हा ते हसत होते.

२. अंतिम समयी यजमान शांत मुद्रेत होते. ते २ दिवस आधीच म्हणाले होते, ‘‘ईश्वर एका क्षणाचे नियोजन करत आहे. तो जे करील, ते चांगलेच असेल.’’

३. अंत्यविधीच्या वेळी ‘निर्विचार’ हा जप केल्याने मनातील विचार नष्ट होणे

१२.५.२०२१ या दिवशी अंतिम दर्शनाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला ‘निर्विचार’ हा जप करायला सांगितला. तो जप केल्याने माझ्या मनातील विचार नष्ट झाले. मी विधी पहात होते; परंतु माझ्या मनात काहीच विचार येत नव्हते. केवळ सौभाग्यालंकार काढून ठेवण्याच्या विधीच्या वेळी मला रडू आवरता आले नाही.

आता मला वाटते, ‘ते (यजमान) कुठेही गेले नाहीत, येथेच आहेत.’ ‘माझ्या संदर्भात एवढा मोठा प्रसंग घडला आहे’, असे मला वाटतही नाही. ‘परात्पर गुरुदेव सर्व करत आहेत. त्यांच्या चरणी किती कृतज्ञता व्यक्त करू ?’, असे मला वाटत आहे.

– श्रीमती मिथिलेश कुमारी (पत्नी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक