एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्या समवेत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

१.१२.२०२० या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाच्या सत्संगाला मी उपस्थित होतो. मला सद्गुरु सिरियाक वाले यांच्या समवेत नामजप करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु सिरियाक वाले

१. नामजपाला आरंभ केल्यावर न्यास करून नामजप करतांना ज्याप्रमाणे शक्ती जाणवते, त्याप्रमाणे मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी शक्ती जाणवली.

२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले किंवा सद्गुरु सिरियाक वाले माझ्यासाठी न्यास करत आहेत’, असे मला अधूनमधून जाणवत होते.

३. त्यानंतर ‘श्री दत्तगुरु माझ्यासमोर उभे आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. मी त्यांच्या चरणी फुले वाहिली. त्या वेळी माझा भाव जागृत झाल्याने जवळजवळ १५ – २० मिनिटे माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते.

श्री. रंजित काशीद

४. माझा नामजप आर्ततेने होत होता. ‘बाळ जसे स्वत:च्या आईला वात्सल्यभावाने हाक मारते, तसे ‘हे देवा, मला तुझ्याजवळ यायचे आहे’, या आर्तभावाने मी नामजप करत आहे’, असे मला जाणवत होते.

५. माझा नामजप भावपूर्ण होत असतांना मधेच मला माझ्या स्थूलदेहाचे अस्तित्व जाणवत नव्हते.

६. माझे डोळे बंद होते. मला माझ्या डोळ्यांसमोर पांढरा प्रकाश दिसत होता. त्या वेळी मला शांत वाटत होते.

७. त्यानंतर मला सूक्ष्मातून दिसले, ‘मी श्री दत्तगुरूंच्या समवेत अग्नीसमोर बसलो आहे आणि त्यांनी मला माझे स्वभावदोषांनी भरलेले गाठोडे त्या अग्नीत टाकायला सांगितले.’

८. हे सर्व अनुभवत असतांना माझा नामजप अखंड होत होता आणि ‘माझ्यावर श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवत होते.

९. पूर्वी श्री दत्तगुरूंचे चित्र डोळ्यांसमोर ठेवल्याविना मला नामजप करता येत नव्हता. आतापर्यंत मी कधीही डोळे मिटून नामजप करू शकत नव्हतो. या वेळी मात्र मला ५० मिनिटांपर्यंत डोळे मिटून नामजप करता आला, तसेच या पूर्वीही माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत होते; परंतु ती भावावस्था केवळ २ – ३ मिनिटेच टिकून रहायची; मात्र या वेळी माझी भावावस्था अधिक वेळ टिकून होती.

श्री दत्तगुरु आणि प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळेच मला या अनुभूती आल्या. मला या अनुभूती दिल्याबद्दल मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. रंजित काशीद, गेथर्सबर्ग, मेरीलँड, अमेरिका. (१.१२.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक