पाकपुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीरमधून ६४ सहस्र ८२७ हिंदु कुटुंबांना पलायन करावे लागले ! – केंद्र सरकार

नवी देहली – केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकपुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीरमध्ये ६४ सहस्र ८२७ काश्मिरी हिंदु कुटुंबांना १९९० च्या दशकात काश्मीर सोडून जम्मू, देहली आणि देशातील अन्य ठिकाणी पलायन करण्यास बाध्य व्हावे लागले.

गृह मंत्रालयाच्या वर्ष २०२०-२१ च्या वार्षिक अहवालानुसार १९९० चे दशक आणि २०२० च्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादामुळे १४ सहस्र ९१ नागरिक आणि ५ सहस्र ३५६ सैनिक यांचा मृत्यू झाला. या अहवालात असेही म्हटले आहे की, आतंकवादामुळे हिंदूंसह काही शीख आणि मुसलमान कुटुंबांनाही काश्मीर सोडून पलायन करावे लागले होते.

संपादकीय भूमिका

‘यातील किती कुटुंबियांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले आणि किती जणांचे करणे शेष आहे ?’, ‘त्यात काय अडचणी आहेत अन् सरकार त्यावर काय उपाययोजना करत आहे ?’, यांची माहितीही सरकारने दिली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !