तिसर्‍या महायुद्धाचा धोका कायम असल्याची रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची चेतावणी

मॉस्को – युक्रेनमध्ये युद्ध चालू होऊन २ मासांचा काळ लोटला असला, तरी ते थांबण्याची चिन्हे नाहीत. युक्रेनशी चर्चा चालू राहील; परंतु तिसर्‍या महायुद्धाचा धोका कायम आहे, असे वक्तव्य रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी नुकतेच केले.  युक्रेनला स्वतःच्या रक्षणासाठी अमेरिकेकडून ३० कोटी डॉलर्सहून अधिक निधी पुरवण्यात येणार आहे, तसेच शस्त्रास्त्रांच्या १६.५ कोटी डॉलर्सच्या विक्रीला संमती दिली आहे. अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या या आश्‍वासनाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.

रशियन वृत्तसंस्थांशी झालेल्या चर्चेत, लावरोव्ह यांनी शांतता चर्चेच्या संदर्भात  युक्रेनच्या  दृष्टीकोनावर टीका केली. ‘सद्भावनेला मर्यादा आहेत. परस्पर सद्भावना नसल्यास वाटाघाटी प्रक्रियेस साहाय्य होत नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी नियुक्त केलेल्या पथकाशी आम्ही चालू ठेवू’, असे लावरोव्ह यांनी सांगितले.