दादाने हात माझा कधी सोडला नाही ।

श्री. अभय वर्तक

चैत्र कृष्ण नवमी (२४.४.२०२२) या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचा ४७ वा वाढदिवस झाला. त्यांचे त्यांच्या धाकट्या बहिणीच्या (सौ. श्रावणी कौस्तुभ फाटक यांच्या) समवेतचे लहानपणीचे छायाचित्र दिले आहे. ते छायाचित्र पाहून त्यांच्या बहिणीला पुढील ओळी सुचल्या. त्या पुढे दिल्या आहेत.

श्री. अभय वर्तक आणि त्यांची धाकटी बहीण यांचे लहानपणीचे छायाचित्र

म्हणायचा मला, तुला डोंगरावरून आणली ।
आई-बाबा नाही तुला, म्हणून इथे आणली ।।
गमतीने म्हणायचा; पण कधी भांडला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। १ ।।

‘स्टुडिओ’त नेऊन आईने ‘फोटो’ काढला छान ।
दादा माझा मोठा, मी त्याची बहीण लहान ।।
तेव्हापासून धरला त्याने हात अजून सोडला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। २ ।।

एकदा म्हणाला आईला, ती आहे छोटी ।
हवं तर मला मार, चूक झाली मोठी ।।
लांबून माझी गंमत बघत बसला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। ३ ।।

शाळेत जाता-येता, कधी बोलायचा नाही ।
मित्र सोबत असले, तर बघायचाही नाही ।।
गंमत वाटायची मला; पण राग आला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। ४ ।।

मला सायकल शिकवायचे पुष्कळ प्रयत्न केले ।
पण ती नीट शिकणे मलाच नाही जमले ।।
माझ्यामुळे ढोपर फुटले; पण कधी बोलला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। ५ ।।

म्हणायचा मला, कुणी छेडतं का तुला ।
तसं कुणी केलं, तर लगेच सांग मला ।।
काळजी त्याला पुष्कळ; पण तसा प्रसंग माझ्यावर आला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। ६ ।।

सौ. श्रावणी फाटक

लग्न ठरल्यावर यांना हळूच म्हणाला ।
कामाची सवय होईल, जरा जपत चला ।।
मी ताटावरून पाटावर असल्याचे (टीप),
यांना कधी बोलला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। ७ ।।

हाक मारली की, येतो लगेच धावून ।
निश्चिंत करतो काळजी दूर करून ।।
हीच आमची भाऊबीज, जरी येत रक्षाबंधनाला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। ८ ।।

म्हणतो, तुला त्रास होईल, असे करणार नाही ।
तरी तुझ्या आयुष्याला मी पुरणार नाही ।।
म्हटला जरी, पुढे माझे काय, प्रश्न मला पडला नाही ।
कारण दादाने हात माझा अजून सोडला नाही ।। ९ ।।

म्हणतो, तुझी दोन छान छकुली बाळं ।
देवाने दिली मला आयती मुलं ।।
आप-परभाव त्यानं ठेवला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। १० ।।

म्हणतो मला, तू आश्रमात ये ।
गुरुपूजन अन् सेवेचा आनंद घे ।।
त्याचा भाव कळला; म्हणून मी आग्रह मोडला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। ११ ।।

रहातो दादा माझा गुरूंच्या छायेत ।
साधकांच्या सवे ईश्वराच्या मायेत ।।
असा स्वर्ग दुसरा मी कुठे पाहिला नाही ।
दादाने हात माझा कधी सोडला नाही ।। १२ ।।

आले मी आश्रमात लगेच त्याचे सारे ऐकून ।
ऐकलेले सारे घेतले अनुभवून ।।
आश्रम आणि घर यांत फरक वाटला नाही ।
दादाने हात माझा अजून सोडला नाही ।। १३ ।।

माझा एक हात दादाच्या हातात ।
दुसरा गुरुरूपी ईश्वराच्या हातात ।।
माझा हात आता मोकळा राहिलाच नाही ।
दोघांनी हात माझा कधी सोडलाच नाही ।। १४ ।।

ईश्वरी राज्यात मी फिरून येईन ।
गुरूंच्या सान्निध्यात अनुभूती घेईन ।।
मग विचाराल मला, कधी अडथळा आलाच नाही ।
मी म्हणेन, दोघांनी हात माझा कधी सोडलाच नाही ।। १५ ।।

साधकांचा आमच्या पहा, किती मोठा थाट ।
गुरूंच्या सवे चालती मोक्षाची वाट ।।
आता पुढे काय, प्रश्न उरलाच नाही ।
गुरूंनी हात सोडण्यासाठी धरलाच नाही ।। १६ ।।

टीप – माहेरी काही काम करण्याची सवय नव्हती.’

– सौ. श्रावणी कौस्तुभ फाटक (श्री. अभय वर्तक यांची धाकटी बहीण), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१२.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक