दैवी बालकांना होणार्‍या अनिष्ट शक्तींच्या त्रासाचे निवारण करण्यासाठी करावयाचे नामजपादी उपाय

२२.४.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘दैवी बालकांवर अनिष्ट शक्ती गर्भावस्थेपासून किंवा बालके जन्माला आल्यावरही करत असलेली आक्रमणे !’ हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/573025.html

पू. तनुजा ठाकूर

३. अनिष्ट शक्तींचा त्रास होत असलेल्या दैवी बालकांवर जन्मापासून त्यांच्या वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत सातत्याने नामजपादी उपाय केल्यास त्यांच्या समस्येचे पूर्ण निराकरण होणे

दैवी बालकांमध्ये प्राणशक्ती न्यून झाल्यामुळे होणारा त्रास हा मुळात आध्यात्मिक त्रास असतो. त्यामुळे त्यांच्यावर जन्मापासूनच वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत योग्य नामजपादी उपाय केल्यास त्यांच्या समस्येचे पूर्णपणे निराकरण होते. फेब्रुवारी २०१० पासूनच मी हा प्रयोग देश-विदेशांतील १५ ते २० दैवी बालकांवर केला आहे आणि त्याचे परिणाम अतिशय उत्साहवर्धक आहेत. आई किंवा वडील यांना मध्यम ते तीव्र आध्यात्मिक त्रास असेल आणि ते योग्य आध्यात्मिक साधना करत नसतील, तर त्यांच्या मुलांना प्राणशक्ती न्यून होण्याचा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. मी अशा दैवी बालकांच्या पालकांना गुरुकृपायोगानुसार साधनेच्या व्यतिरिक्त पुढील गोष्टी सांगितल्या.

अ. बाळाची वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी नियमितपणे दृष्ट काढावी.

आ. बाळाच्या अंघोळीच्या पाण्यात मीठ आणि गोमूत्र घालून त्याला स्नान घालावे.

इ. मूल जोपर्यंत बोलू शकत नाही, तोपर्यंत त्याला आध्यात्मिक स्तरावरील स्पर्शोपचार द्यावा, म्हणजे मुलाला स्वतःच्या कुशीत घेऊन किंवा ते झोपलेले असतांना त्याच्या डोक्यावर हात ठेवून श्रीगणेशाचा नामजप करावा. (५१ ते ५५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या मुलांसाठी ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ५६ टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या दैवी मुलांसाठी ‘ॐ गं गणपतये नमः ।’ हा नामजप करावा). कुटुंबाला तीव्र पितृदोष असल्यास दत्तात्रेयाचा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत स्पर्शोपचार करावा. एका दिवसाच्या बाळापासून १५ वर्षांपर्यंतच्या दैवी बालकांवर स्पर्शोपचार केला जाऊ शकतो. केवळ तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍यांनी असे उपाय करू नयेत. आई-वडील किंवा आजी-आजोबा यांनी हा नामजप दैवी बालकांसाठी केला, तर अधिक परिणामकारक होतो.

ई. मूल बोलायला शिकताच त्याला सांगितलेल्या विशिष्ट देवतेचा नामजप करण्यास सांगावा आणि मूल लिहायला शिकले की, त्याला नामजप लिहायला सांगावा.

उ. शारीरिक त्रासानुसार चक्रावर न्यास किंवा विशिष्ट मुद्रा करून नामजप करावा किंवा दैवी बालकांकडून तसे करवून घेणे, हे अतिशय प्रभावी ठरते.

ऊ. मुलांना काळ्या रंगाचे किंवा पाश्‍चात्त्य पद्धतीचे तामसिक कपडे घालू नयेत.

ए. वास्तूत आध्यात्मिक त्रास अधिक प्रमाणात असेल, तर अशा मुलांवर रात्री आक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी मुले वेळेवर झोपत नाहीत, रात्री अधिक रडतात किंवा झोपेतून घाबरून उठतात किंवा सकाळी पुष्कळ उशिरा उठतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून नामजप करावा आणि इष्टदेवतेला प्रार्थना करून त्याच्याभोवती संरक्षककवच निर्माण करावे.

ईश्‍वराच्या आज्ञेनुसार मी ‘वैदिक उपासनापिठा’च्या माध्यमातून स्वतंत्रपणे गुरुकार्य करू लागल्यावर ‘माझ्यासारखा त्रास अन्य कोणालाही भोगावा लागू नये’, यासाठी दैवी बालके माझ्या संपर्कात येऊ लागल्यावर मी त्यांना ही सूत्रे सांगण्यास आरंभ केला. मी स्वतःही जन्माच्या वेळी प्राणशक्ती न्यून होण्याच्या त्रासाने ग्रासले होते; म्हणूनच आज मी ही सूत्रे या लेखाच्या माध्यमातून सर्वांसाठी सादर करत आहे.

४. स्वतःला आलेले अनुभव आणि झालेली विचारप्रक्रिया

४ अ. ‘श्रीगुरूंनी दिलेल्या ज्ञानाने आत्मज्ञानी होऊन त्या ज्ञानात अधिक भर घालणे’, हीच शिष्याने दिलेली गुरुदक्षिणा असणे : श्रीगुरु आपली साधना आणि तपोबळ यांतून ज्ञान प्राप्त करून शिष्याला देतात. शिष्यही आत्मज्ञानी होऊन त्यात आणखी काही सूत्रांंची भर घालतो आणि संशोधन करून त्या ज्ञानाची व्याप्ती वाढवतो. ही शिष्याची श्रीगुरूंकडून प्राप्त झालेल्या ज्ञानासाठी गुरुदक्षिणा असते. हेच आपल्या सनातन संस्कृतीत समृद्धशाली, सखोल, गूढ आणि अगाध ज्ञानाचे भांडार असण्याचे मुख्य कारण आहे. मीही श्रीगुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या ज्ञानात आणखी काही संशोधन करून काही सूत्रे जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळे मला दैवीकृपेने लाभले आहे. परम पूज्य, मी गुरु-शिष्य परंपरेला योग्य प्रकारे समजू शकले आहे ना ?

४ आ. जन्मानंतर काही कारणामुळे आईचे दूध न मिळणे, त्यामुळे तिची रोगप्रतिकारक शक्ती अल्प राहून ती सतत आजारी पडणे : माझ्या जन्मानंतर दुसर्‍या दिवशी माझ्या आईच्या स्तनात जखम होऊन ती पिकू लागली. आधुनिक वैद्यांनी ती जखम भरून येण्यासाठी तिला औषध दिले; परंतु त्यामुळे तिला दूध येणे बंद झाले आणि ती मला स्तनपान करू शकली नाही. त्यामुळे ऋतूमध्ये थोडासा पालट झाला, तरी मला सर्दी, खोकला आणि ताप येत असे. तेव्हा आई मला म्हणायची, ‘‘मला कळत नाही, ‘कोणाची वाईट दृष्ट लागल्यामुळे मला माझे दूध तुला पाजता आले नाही.’ त्यामुळे तुझ्यात रोगप्रतिकारशक्ती अन् प्राणशक्ती अल्प आहे.’’ यावरून केवळ गर्भावस्थेतच प्राणशक्ती न्यून करण्यासाठी आक्रमण होते, असे नसून जन्मानंतरही वाईट शक्ती नियोजन करून आक्रमण करू शकतात.

(समाप्त)

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासनापीठ (११.१२.२०२१)