‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ कि ‘अखिल भारतीय राजकीय साहित्य संमेलन’ ?

साहित्य संमेलनांच्या दालनांना शासनकर्त्यांची नावे का ?

श्री. अजय केळकर, कोल्हापूर

उद्गीर – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आता राजकारण्यांच्या अंकीत आणि पूर्णत: अधिन होत आहेत. इतकी अधिन होत आहेत की, संमेलनाचे नाव पालटून ‘अखिल भारतीय राजकीय साहित्य संमेलन’, असे त्याचे नामकरण करावे अशी स्थिती आहे. यापूर्वीच्या काळात ज्या ज्या ठिकाणी परिसंवाद होत त्यात त्या दालनांना त्या त्या भागातील प्रसिद्ध साहित्यिक, संत-महंत यांची नावे देण्यात येत होती. ज्या शासनकर्त्यांचा साहित्याशी विशेष काही संबंध नाही, ज्यांचे मराठीसाठी विशेष काही योगदान नाही, अशा राजकीय लोकांची नावे देऊन साहित्य महामंडळ नेमके काय साध्य करत आहे ? त्यामुळेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख सभागृह असे नाव का देण्यात आले ? असा प्रश्न मराठीजनांना पडत आहे. दुसऱ्या एका दालनाचे नाव ‘देवीसिंह चौहान सभागृह’, असे असून देवीसिंह चौहान हे जरी साहित्यिक असले, तरी ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. म्हणजे जे साहित्यिक काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांची नावे दालनाला देणे, हा निकष महामंडळाने लावला आहे का ?

अन्य एका सभागृहाचे नाव ‘सिकंदर अली वज्द सभागृह’, असे देण्यात आले आहे. ज्ञात माहितीनुसार सिकंदर अली यांचे साहित्य हे हिंदीतच आहे आणि बहुतांश करून ते शायरी, गजल, नज्म अशा स्वरूपात आहे. मराठीत अनेक थोर संत आणि कवी, कवयित्री होऊन गेलेले असतांना हिंदीत शायरी, गजल लिहिणाऱ्यांचे नाव देणे हे साहित्य महामंडळाची वैचारिक दिवाळखोरीच नाही का ? आणि अशी नावे देणे हे आयोजक, संयोजक आणि मराठी साहित्य महामंडळ यांचेही राजकीयकरण झाले असेच म्हणावे लागेल !


संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्य सभागृहातील कार्यक्रमांना ८० टक्के खुर्च्या रिकाम्या !

उदगीर (लातूर), २३ एप्रिल (वार्ता.) – संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी लोकनेते विलासराव देशमुख सभागृहामध्ये ‘विदर्भ साहित्य संघ नागपूर’च्या वतीने ‘मी मराठी बोलतेय…’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे सादरीकरण वैशाली देशपांडे, संगीतकार अरविंद उपाध्याय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रोत्यांसाठी खुर्च्यांची व्यवस्था अपुरी होती. त्यामुळे अनेक लोकांना मागील बाजूस उभे रहावे लागले, तर दुसरीकडे छत्रपती शाहू महाराज सभागृहात ‘राजन गवस यांची प्रकट मुलाखत’ आणि ‘प्रकाशकाचा सत्कार’ या कार्यक्रमांना श्रोत्यांनी केवळ २० टक्के सभागृह भरले होते. (संमेलनाला मिळत असलेल्या अल्प प्रतिसादामागे उदगीर येथील कडाक्याचे ऊन हे महत्त्वाचे कारण असू शकते. अशा ठिकाणी उन्हाळ्यात संमेलन घेणे कितपत व्यवहार्य आहे, हे आयोजकांनी लक्षात घेतले होते का ? तसेच एकूणच जनतेचा या संमेलनाविषयी अल्प होत चाललेला ओढा लक्षात येतो. याचाही सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)