हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच काळानुसार साधना आहे ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन !

वर्धा, २१ एप्रिल (वार्ता.) – जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा धर्माची पुनर्स्थापना होते. सध्या भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर संक्रमणकाळ चालू आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात धर्मपालन केले जात नसल्याने अन् राष्ट्रच धर्मनिरपेक्ष घोषित केले गेल्याने आपण भारताला आलेली ग्लानी अनुभवत आहोत. सर्वत्र भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अनैतिकता, बलात्कार या घटना वाढत आहेत. धर्मग्लानीच्या काळात धर्मसंस्थापनेची साधना करणे, ही काळानुसार साधना असते. त्यामुळे सध्या भारतात धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करणे, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही साधना असणार आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील विश्व हिंदु महासंघाच्या सभागृहात एकदिवसीय हिंदु राष्ट्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

कार्यशाळेला ‘साधनेचे जीवनातील महत्त्व आणि साधनेचे प्रत्यक्ष प्रयत्न’ या विषयावर पू. अशोक पात्रीकर आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शिल्पा पाध्ये, ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची मूलभूत संकल्पना’ या विषयावर श्री. दीपक जमनारे आणि श्री. श्रीकांत पिसोळकर, तर ‘हिंदु राष्ट्र संघटकांची आदर्श आचारसंहिता कशी असावी ?’ याविषयावर श्री. दीपक जमनारे आणि सौ. भार्गवी क्षीरसारगर यांनी मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. भारनियमनकाळ असूनही केवळ ५ मिनिटांसाठीच वीज गेली. ती लगेच परत आली.

२. एक धर्मप्रेमी महिला ४० मिलोमीटर अंतरावरून कार्यशाळेला उपस्थित राहिल्या.

३. विश्व हिंदु महासंघाचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुरारका यांनी कार्यशाळेसाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिले.

४. ४५ अंश सेल्सिअस तापमान असतांनाही कुणालाही त्रास झाला नाही. सर्वांना उत्साह वाटत होता.

मनोगत 

१. सौ. मंगला खोडे : माझ्या यजमानांचा साधनेसाठी विरोध असतांनाही त्यांनी मला या कार्यशाळेला आणून सोडले.

२. सौ. वनिता हिंगे : विवाहापूर्वी मी साधना करत होते. विवाहानंतर १० वर्षांनी मी कार्यशाळेत आले. मी १० वर्षांपूर्वी जे अनुभवले होते, तसेच चैतन्य आजही अनुभवायला मिळाले.

३. सौ. स्मिता गिरडकर : माझे गुरु आहेत; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात मला माझ्या गुरूंचेच रूप दिसले.

४. सौ. शारदा गुजर : घरी अनेक अडचणी असल्याने कार्यशाळेला मला येता येईल कि नाही, अशी स्थिती होती; परंतु गुरुदेवांच्या कृपेने येथे येता आले.