वडगाव शेरी (जिल्हा पुणे) – नगर रस्त्यावर खराडी जुना जकात नाका येथे रस्त्यावर असलेल्या जोगेश्वरी मिसळ आणि बाजूच्या फर्निचर ‘मोबाईल शॉपी’च्या दुकानाला ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागून आतापर्यंत ८ दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत. २० एप्रिल या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता ही आग लागली. अग्नीशामक दलाचे बंब विलंबाने आल्याने आग आवाक्याच्या बाहेर गेली. आग लागल्याने नगर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. येथील २ भ्रमणभाषच्या दुकानांना आग लागल्यामुळे दुकानांतील भ्रमणभाष जोराने फुटण्याचे आवाज या वेळी येत होते. शेजारी लागलेली आग पाहून फर्निचरचे दुकानदार दुकानातील सामान बाहेर काढण्यासाठी जिवाचे रान करीत होते; मात्र बघ्यांच्या गर्दीतील सहस्रो नागरिक दुकानदारांना साहाय्य करण्याऐवजी त्या दुकानाचे भ्रमणभाषने ‘शूटिंग’ करत होते. (असंवेदनशीलतेची परिसीमा गाठलेला समाज देशासाठी घातक ! – संपादक)
खराडी येथे गेल्या चार-पाच वर्षांत अनेक वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळेस पुण्यातून आगीचे बंब येईपर्यंत घटनास्थळाची मोठी हानी होते. खराडी बाह्य वळणमार्गावर अग्नीशमन केंद्राचे काम चालू आहे. निधीअभावी मध्यंतरी ते काम रखडले होते. या केंद्राचे काम तातडीने पूर्ण करून कर्मचार्यांची नियुक्ती तातडीने करणे आवश्यक आहे.