मुंबई – तिरुपती देवस्थानाला नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी भूखंड प्रदान करण्यास २० एप्रिल या दिवशीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तिरुपती देवस्थानाच्या वतीने नवी मुंबई येथे श्री बालाजी व्यंकटेश्वराचे प्रतीमंदिर उभारण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून १० एकर इतकी भूमी प्रदान करण्यात येणार आहे.
यासह मुंबईतील बोरीवली येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रमाच्या धर्मादाय ट्रस्टसाठी भाडेतत्त्वाने देण्यात आलेली भूमीची मुदत ३० वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. पुणे महानगर मेट्रो रेल्वेच्या टप्पा १ ची विस्तारित मार्गिका स्वारगेट ते कात्रज या पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंत्रीमंडळाची मान्यता देण्यात आली. यासह काजूबोंडे, मोहाफुले यांपासून उत्पादित मद्याला विदेशी मद्याचा दर्जा देण्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.