राज ठाकरे यांनी त्यांचे हिंदुत्वाचे सूत्र प्रभावीपणे पुढे केल्यामुळे इतरांना पोटशूळ ! – परशुराम उपरकर, मनसे

परशुराम उपरकर

कणकवली, १९ एप्रिल (वार्ता.) – सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्व सोडून धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) झाला आहे. बाळासाहेबांच्या जुन्या भाषणांचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांत पाहिले, तर त्यातून प्रखर हिंदुत्वाचे दर्शन घडते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा आणि ठाण्यातील मेळावा यांमुळे राजकीय पक्ष घाबरले आहेत. त्यामुळे विविध आरोप होत आहेत. मराठी माणूस आणि हिंदुत्व यांसाठी मनसेची स्थापना करण्यात आली होती. एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाने बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाची कास सोडली; मात्र राज ठाकरे यांनी त्यांचे हिंदुत्वाचे सूत्र प्रभावीपणे पुढे केल्यामुळे इतर पक्षांना पोटशूळ उठले आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत मनसेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले,

१. राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या औचित्यावर अयोध्या दौर्‍याची घोषणा केली. त्यामुळे बाकीचे राजकीय पक्ष देवळात जाऊन हिंदुत्वाचे दर्शन घडवत आहेत.

२. आज महाराष्ट्रात एकत्रित सत्तेत आल्यामुळे सरकार धर्मनिरपेक्ष झाले आहे. अल्पसंख्यांक मंत्र्यांनी मुसलमान मुलांना शिक्षणासाठी ३ सहस्र रुपये मासिक मानधन घोषित केले; मात्र हिंदूंची मुले गरीब असूनही त्यांना मानधन दिले जात नाही. हज यात्रेला विमान प्रवासासाठी सवलत दिली जाते; मात्र सर्व हिंदूंना पंढरपूरला जाण्यासाठी एस्.टी.ची किंवा इतर प्रवासाची सवलत सरकारने दिली नाही.

३. त्यामुळे एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाने हिंदुत्वाची कास सोडल्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा विषय जो बाळासाहेबांनी उचलून धरला होता, त्याचे समर्थन केल्याने इतरांना डोकेदुखी झाली आहे.

४. राज ठाकरे हे हिंदू-मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य करणार्‍यानी बाळासाहेबांची जुनी भाषणे ऐकावीत किंवा आम्ही ती त्यांना देतो. बाळासाहेबांनीही दसरा मेळाव्यात भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. तत्कालीन नेते सरपोतदार यांनी भोंग्यांच्या विरोधात कोर्टात याचिका प्रविष्ट केली होती. बाळासाहेबांनी रस्त्यावरील नमाजांच्या विरोधात शिवसैनिकांना महाआरती करण्याचे आदेश दिले होते. याविषयी येथील खासदार अज्ञानी आहेत का ?

५. आज भारतात प्रखर हिंदुत्वावर बोलणारा जहाल नेता म्हणून राज ठाकरे लोकांना हवे आहेत.

६. परखड विचार मांडताना बाळासाहेबांनी जात्यंध मुसलमानांचा योग्य समाचार घेतला होता. त्याचप्रमाणे कोणत्याही कारवाईची पर्वा न करता राज ठाकरेही हिंदुत्वासाठी झटत आहेत.

७. राज ठाकरे यांच्या ५ जून या दिवशीच्या अयोध्या दौर्‍याला जिल्ह्यातूनही मनसेचे शेकडो सैनिक सहभागी होणार आहेत.’’