‘माझ्या आजी-आजोबांनी एका जिल्ह्यात आम्ही सध्या रहात असलेले घर आणि भूमी (जमीन) ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतली होती. मागील ६५ वर्षांपासून (गेल्या ३ पिढ्यांपासून) आमचे कुटुंब तिथे रहात आहे. आता शासनाच्या एका निर्णयानुसार भाडेतत्त्वावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर करण्याची सुविधा (तरतूद) आहे. त्या आधारे आम्ही मुख्य अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता. या कामासाठी काही शासकीय विभागांत जावे लागले. त्या वेळी मला आलेले काही अनुभव येथे दिले आहेत.
१. लाच न देता कार्यालयीन अहवाल मिळणे
१ अ. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पैसे देण्याची भ्रष्ट प्रथा असतांनाही साधकाने कुणालाही पैसे न देण्याचे ठरवणे : एका शासकीय कर्मचाऱ्याने सांगितले, ‘‘विभागाकडे प्रलंबित असलेले प्रकरण कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून मुख्य अधिकाऱ्याकडे पाठवण्यासाठी ६ कार्यालयांतून त्या भूमीविषयी त्यांचे अभिप्राय असलेले अहवाल मिळवावे लागतील.’’ त्याप्रमाणे ‘संबंधित कार्यालयांत सतत जाणे आणि पाठपुरावा घेणे’, असे आम्ही ६ मास एक दिवस आड करत होतो. या कामासाठी पुष्कळ विलंब होत होता; म्हणून त्या कर्मचाऱ्याने ‘संबंधित ६ विभागांतील कोणाला तरी गाठून त्यांना पैसे देऊन अहवाल मिळवा’, असे मला सुचवले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘आम्ही अशा पद्धतीने कामे करून घेत नाही.’’
१ आ. नातेवाइकांनी सुचवल्यानुसार ‘काम करून देण्यासाठी पैसे हवेत का ?’, असे संबंधित कर्मचाऱ्याला विचारल्यावर त्याने पैसे न घेता त्वरित काम करणे : अनुमाने ७ मासांनंतर आम्हाला ६ विभागांचे त्या भूमीविषयी अभिप्राय असलेले अहवाल मिळाले. ते घेऊन आम्ही कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याकडे सोपवले आणि आता पुढील प्रक्रियेसाठी मुख्य अधिकाऱ्याकडे अहवाल पाठवण्याची विनंती केली. त्या वेळी माझी बहीण आणि चुलत भाऊ मला म्हणाले, ‘‘पैसे दिल्याविना ते काम करत नाहीत. त्या कर्मचाऱ्याला ‘तुम्हाला काही पैसे हवे असल्यास देतो’, असे तुम्ही सांगा.’’ त्याप्रमाणे मी संबंधित कर्मचाऱ्याला विचारले, ‘‘हे अहवाल पुढे देण्यासाठी तुम्हाला काही पैसे हवे आहेत का ?’’ तेव्हा ते मला हात जोडून म्हणाले, ‘‘तुमच्याकडून मला पैसे नको. तुमचे अहवाल मी उद्याच पत्र काढून पुढे देतो आणि तसे तुम्हाला कळवतो.’’ हे ऐकून आम्हाला ‘ईश्वराची साधकांवर किती कृपा आहे ?’, हे प्रत्यक्षात अनुभवता आले आणि आम्ही ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
२. ‘सनातन संस्थेचे साधक आहेत’, असे समजल्यावर एका शासकीय विभागातील कर्मचाऱ्याने अहवाल मिळण्यासाठी स्वतः साहाय्य करणे
अन्य एका प्रसंगात आम्ही एका शासकीय विभागातील एका कर्मचाऱ्याकडे अहवाल घेण्यासाठी गेलो. तेथे बोलता बोलता त्यांनी मला सांगितले, ‘‘मी अमुक एका गावातून प्रतिदिन इथे ये-जा (अप-डाऊन) करतो.’’ त्या वेळी मी त्यांना विचारले, ‘‘त्या गावातील अमुक एका कुटुंबाशी तुमची ओळख आहे का ?’’ प्रत्यक्षात मी त्यांना ‘मी सनातनचा साधक आहे’, असे सांगितले नव्हते, तरीही ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही सनातनचे साधक आहात का ?’’ त्यावर आम्ही ‘हो’ म्हणून सांगितले. त्यावर ते आम्हाला म्हणाले, ‘‘ठीक आहे. काही काळजी करू नका. माझ्या गावाकडून कार्यालयात येतांना मला तुमचे घर लागते. मी तुमच्या घराचे छायाचित्र काढून अहवाल सिद्ध करतो आणि तो साहेबांकडे पाठवतो.’’ त्या वेळी ‘ईश्वर आम्हाला साहाय्य करत आहे’, याची मला प्रचीती आली.
‘हे परात्पर गुरुदेव, आम्ही साधक सनातन संस्थेत असल्याने व्यावहारिक कामांतही आम्हाला ईश्वराचे साहाय्य मिळत आहे. ही केवळ आपलीच कृपा आहे. याविषयी आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (१०.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |