प्रीतीस्वरूप असलेल्या पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी आणि त्यांचे चैतन्यमय निवासस्थान !

आज चैत्र कृष्ण चतुर्थी (२०.४.२०२२) या दिवशी सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी यांचा ८५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

मंगळुरू (कर्नाटक) येथे रहाणाऱ्या सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा मंजुनाथ यांना पू. प्रभुआजी यांच्या निवासस्थानी गेल्यावर आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी यांना ८५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. पू. राधा प्रभुआजी यांच्या घरी चैतन्य जाणवणे

‘मी पू. राधा प्रभुआजी यांच्या घरात प्रवेश करताच मला शांत वाटले आणि शीतलता जाणवली. तेथील सुखासनावर बसल्यानंतर ‘मी पूर्ण भावाच्या स्थितीत असून चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.

सौ. राधा मंजुनाथ

२. पू. राधा प्रभुआजी यांचे देवघर पहातांना आलेल्या अनुभूती

२ अ. पू. राधा प्रभुआजी यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज, प.पू. गुरुदेव यांची छायाचित्रे आणि श्रीकृष्णाचे चित्र सजीव जाणवणे : पू. राधा प्रभुआजी यांनी मला त्यांचे देवघर दाखवले. तेव्हा देवघरातील प.पू. भक्तराज महाराज, प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांची छायाचित्रे अन् श्रीकृष्णाचे चित्र सजीव झाल्याचे मला जाणवले.

२ आ. देवघरातील प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) पादुका पहात असतांना मला त्यात त्यांचे अस्तित्व जाणवत होते.

२ इ. पू. राधा प्रभुआजी यांच्या देवघरातील ‘श्रीराम, लक्ष्मण आणि सीता’ यांच्या मूर्तींतून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्यामुळे चिंब भिजणे : पू. राधा प्रभुआजी यांच्या देवघरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. ‘या मूर्ती त्यांच्या घरी गेल्या ५० वर्षांपासून आहेत’, असे त्यांनी मला सांगितले. त्या मूर्तींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य माझ्या शरिरात प्रवेश करत असल्याने ‘पावसात गेल्यावर आपण जसे चिंब भिजून जातो’, तशी मी आतून चैतन्यामुळे भिजून चिंब झाले होते. त्या मूर्ती आताच नवीन आणल्याप्रमाणे चमकत होत्या.

२ ई. मूर्तीतून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्यामुळे हलकेपणा जाणवणे : त्या मूर्तींकडे पाहून माझी भावजागृती झाली. ‘माझ्या सहस्रारचक्रातून ग्रहण होणाऱ्या चैतन्यात मी संपूर्ण डुंबून गेले. माझ्या शरिरावरील त्रासदायक आवरण दूर होऊन मला हलकेपणा जाणवला. हे सर्व अनुभवत असतांना ‘या स्थितीतून बाहेर पडूच नये’, असे मला वाटत होते.

३. पू. राधा प्रभुआजी यांच्या घरातील प्रत्येक खोलीत देवतांचे अस्तित्व अनुभवणे

३ अ. स्वयंपाकघरात गेल्यावर मला ‘तिथे साक्षात् श्री अन्नपूर्णादेवीच वास करत आहे’, असे जाणवले.

३ आ. पू. भार्गवराम यांच्यात अनुभवलेले कृष्णतत्त्व ! : पू. राधा प्रभु आणि पू. भार्गवराम यांच्या खोलीत प्रवेश करताच मला तिथे श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले अन् माझी भावजागृती झाली. पू. भार्गवराम यांनी मला सांगितले, ‘‘माझ्या पायाला जखम झाली आहे.’’ तेव्हा मला त्यांच्यातील निरागसतेचे दर्शन झाले. ‘नटखट श्रीकृष्ण यशोदेला सांगत आहे’, असे मला जाणवले. हा प्रसंग अनुभवतांना माझी भावजागृती झाली.

३ इ. ‘माजघरात गेल्यावर मंदिराच्या गाभाऱ्यात आहे’, असे जाणवणे : माजघरात गेल्यानंतर ‘मी मंदिराच्या गाभाऱ्यातच आहे’, असे मला वाटले. तेव्हा ‘मी सर्व देवता आणि गुरुदेव यांना प्रदक्षिणा घालत असून त्यातून मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा माझी गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

४. पू. राधा प्रभुआजी यांची प्रीती

अ. पू. राधा प्रभुआजींनी मला बसण्यासाठी आसंदी आणून दिली आणि त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही प्रतिदिन येथे नामजप करण्यासाठी येऊ शकता.’’ माझ्या गुडघ्याचे शस्त्रकर्म होऊन एक वर्ष झाले आहे. त्यांनी त्याविषयी माझी आठवणीने विचारपूस केली. त्या मला म्हणाल्या, ‘‘प्रतिदिन फिरायला जात जा. त्यामुळे तुमचे शारीरिक त्रास उणावतील आणि तुमची साधनाही चांगली होईल.’’

आ. त्या संत असूनही सर्व साधकांशी आपुलकीने बोलतात आणि सर्वांना सतत आनंद देतात. त्यांच्या सहवासात मला सतत आनंद मिळतो.

५. प्रार्थना

‘हे गुरुदेवा, पू. राधा प्रभुआजी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याप्रमाणे आम्हा सर्व साधकांना सतत अंतर्मुख राहून साधनेत प्रगती करून घेता येऊ दे’, हीच आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.

६. कृतज्ञता

‘हे कमलनयन, श्रीविष्णुरूपी सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेवा, आपल्या कृपेने मला पू. राधा प्रभुआजी यांच्या सहवासात रहायला मिळत आहे. त्याबद्दल मी आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. राधा मंजुनाथ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), मंगळुरू, कर्नाटक. (१.१.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक