सत्सेवेतून पुष्कळ आनंद मिळतो आणि सेवा करतच रहावीशी वाटते ! – शिबिरार्थींचे मनोगत

संभाजीनगर येथील ‘साधना सत्संग जिज्ञासू’ शिबिर

मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सौ. अक्षरा बाबते

संभाजीनगर – येथील सनातनचे साधक श्री. दिनेश बाबते यांच्या निवासस्थानी ‘साधना सत्संग जिज्ञासू’ शिबिर पार पडले. या वेळी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात मार्गदर्शन करतांना धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘योग्य साधना केल्यावर देव कसे साहाय्य करतो आणि आपल्या जीवनात कसे आमूलाग्र पालट होतात, हे प्रत्येकाने साधना सत्संगाच्या माध्यमातून अनुभवले. सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा केल्यावर आपले कुटुंब आनंदी झाले. आता आपल्याला याही पुढे जाऊन समाजातील प्रत्येक कुटुंब आनंदी होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.’’

मार्गदर्शनानंतर जिज्ञासूंनी मनोगत व्यक्त केले. या वेळी शिबिरार्थींनी सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. ‘गुरुदेवांच्या कृपेने सत्सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्या सेवेतून पुष्कळ आनंद मिळाला. सेवा करतच रहावे, असे वाटते’, असे मनोगत काही जणांनी व्यक्त केले. या शिबिरात महिला जिज्ञासूंची संख्या अधिक होती. ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सौ. अक्षरा बाबते यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.

विशेष

१. एक जिज्ञासू महिला २५ किलोमीटर लांबून एकट्याच आल्या होत्या. त्यांची तळमळ आणि सद्गुरु जाधवकाकांच्या प्रती असलेला भाव पुष्कळ उत्कट होता. सत्संगाला येता आल्याचा आनंद त्यांना शब्दातून व्यक्त करता येत नव्हता. त्या भावस्थितीत होत्या. सद्गुरु जाधवकाका आणि परात्पर गुरुदेव यांच्या चरणी त्या पुन: पुन्हा कृतज्ञता व्यक्त करत होत्या.

२. एका जिज्ञासूने ‘प्रत्येक मासात असे शिबिर घेऊ शकता का ?’ असे सुचवले.


जिज्ञासूंचे अभिप्राय आणि अनुभव

१. सौ. रेखा बाखरिया – नामजप करतांना हलके झाल्यासारखे वाटते. नामजप एकाग्रतेने होतो. ‘सेवेत पुष्कळ आनंद मिळतो आणि सेवा करतच राहूया’, असे वाटते.

२. सौ. उज्ज्वला राजली – गुढीपाडव्यानिमित्त मला पत्रलेखन करण्याची संधी मिळाली. मला माझ्या आवडीची सेवा गुरुदेवांच्या कृपेने करता आली.

३. सौ. ज्योती गरूड – गुढीपाडव्यानिमित्त प्रवचनाचे आयोजन करण्याची सेवा मी घेतली होती. त्या वेळी नातेवाईक आणि शेजारी असणाऱ्यांना प्रवचनाला येण्यास विचारले. प्रथम ‘ते जमणार नाही’, असे म्हणाले. मग गुरूंना शरण जाऊन प्रार्थना करून त्यांना पुन्हा आमंत्रण दिल्यावर सर्वजण ‘हो’ म्हणाले आणि प्रवचन चांगल्यारितीने पार पडले. ही अनुभूती पुष्कळच प्रेरणादायी ठरली.

४. सौ. ज्योती जोशी – सेवेला गेले की, व्यवहारातील कामे सहज होतात, हे अनुभवायला मिळाले. भगवंताच्या कृपेने सत्संगाला उपस्थित रहाता आले. ईश्वरच सर्व अडथळे दूर करतो, याची प्रचीती आली.

५. सौ. सोनाली कोरटकर – ‘हा सत्संग संपूच नये’, असे वाटते. सर्व साधिकांकडून पुष्कळ शिकायला मिळाले. त्यांचे गुण आत्मसात करता येऊ दे, अशी गुरुचरणी प्रार्थना !