महापुरासारख्या आपत्तीत साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले काळजी घेत असल्याची सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना आलेली प्रचीती !

महापुरासारख्या आपत्तीत साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले काळजी घेत असल्याची सांगली येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७८ वर्षे) यांना आलेली प्रचीती !

श्री. दत्तात्रय कुलकर्णी

१. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच सांगलीत पूरस्थिती निर्माण होणे आणि त्याच दिवशी स्थलांतर करावे लागणे

‘जुलै २०२१ मधील गुरुपौर्णिमेच्या आधी ५ – ६ दिवसांपासून जलधारांचा वर्षाव चालू होता. सांगलीमध्ये मी आणि पत्नी सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (वय ७३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), असे दोघेच रहातो. आमचे वास्तव्य कृष्णा नदीच्या काठी गावभागात आहे. त्यातच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झाला होता. पाण्याची पातळी मर्यादित होती. सकाळी ११ वाजता आम्ही ‘ऑनलाईन’ गुरुपूजन उत्सवामध्ये तल्लीन झालो होतो. नंतर दुपारी २ वाजता सौ. कल्पना आनंदराव थोरात यांनी पूरस्थितीची भयानकता आणि पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आम्हाला स्थलांतराविषयी सूचित केले. नुसते सूचित केले नाही, तर शक्यतो लगेचच बाहेर पडण्याचे नियोजन केले. यामध्ये गावभागातील ८ – ९ कुटुंबांचा समावेश होता. त्यांच्यासाठी रहाण्याचे ठिकाण, वाहन आणि साहाय्यासाठी साधक यांचे नियोजन करण्यात आले.

२. पूरस्थितीमुळे वाहन मिळण्यात अडचणी येणे आणि गुरुकृपेने विश्रामबाग येथे स्थलांतरित होता येणे

मागील अनुभव विचारात घेऊन आम्ही बाहेर पडलो. तोपर्यंत घराजवळील मारुति चौकात पाणी यायला आरंभ झाला होता. सर्व दुकाने बंद झाली होती. प्रत्येकाची बाहेर पडण्याची धडपड चालू होती. रस्त्यावर गर्दी झाल्यामुळे रिक्शा किंवा इतर वाहनेही मिळत नव्हती. पाणी वाढत होते. आमचे साहित्यही पुष्कळ होते. आमच्या साहाय्यासाठी भाग्यनगरहून माझी मधली मुलगी सौ. प्रकृती प्रशांत कुलकर्णी हिला जणू देवानेच आदल्या दिवशी सांगलीला पाठवले होते. तिच्या साहाय्याने संततधार पावसामधून आम्ही रात्री ८ वाजता विश्रामबाग येथे श्रीमती नंदा दौंडे (वय ७० वर्षे) यांच्या घरी पोचलो. वेळेत पूर्वसूचना मिळून त्यानुसार घराबाहेर पडल्याने आम्ही विश्रामबाग येथे सुखरूप पोचू शकलो. दुसऱ्या दिवशी पाण्याची पातळी वाढल्याने आम्हाला नंतर बाहेर पडताच आले नसते.

३. विश्रामबाग येथे साधिकेच्या घरी गेल्यावर ‘गुरुमाऊलीच्या आश्रमातच आलो आहोत’, असे वाटून निर्धास्त होणे

विश्रामबागला पोचल्यानंतर आम्हाला गुरुमाऊलींची प्रीती अनुभवण्यास मिळाली. आम्ही घरातून निघण्यापूर्वी आम्हाला श्रीमती नंदा दौंडे यांचा २ – ३ वेळा भ्रमणभाष आला. त्यांच्या घरचा पत्ता देऊन त्या ‘तुम्ही कधी येणार ?’, असे विचारत होत्या. आम्ही विश्रामबागला पोचलो. तेव्हा दौंडेवहिनी घराच्या फाटकाजवळ छत्री घेऊन पावसात आमची वाट पहात उभ्या होत्या. त्यांनी आमचे मनापासून स्वागत केले. त्यांच्या त्या स्वागताने आम्ही भारावून गेलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर ‘आपण जणूकाही गुरुमाऊलीच्या कुशीत, आश्रमातच आलो आहोत’, असे वाटून आम्ही निर्धास्त झालो. आमचा ऊर कृतज्ञतेने भरून आला.

४. साधिकेच्या घरी ३ दिवस आश्रमजीवन अनुभवणे आणि ‘गुरुमाऊलीने साधकांना कसे घडवले आहे !’, याची प्रचीती येणे

पुढील ३ दिवस आम्ही आश्रमजीवन अनुभवले. दौंडेवहिनींचे घर २ खोल्यांचेच होते; पण तेथे सर्व व्यवस्थित आणि नीटनेटके होते. आम्ही सर्व जण मिळून देवपूजा, आरती इत्यादी करत होतो. पहाटेपासून आमच्या व्यष्टी साधनेला प्रारंभ होत होता. आमच्यामधील प्रेमभाव दिवसेंदिवस वृद्धींगत होत होता. ‘गुरुमाऊलीने साधकांना कसे घडवले आहे !’, हे आम्हाला अनुभवता आले. ३ दिवसांनंतर दौंडेवहिनींचा निरोप घेतांना त्यांचे डोळे पाणावले. आम्हीही सद्गदित झालो. त्या वेळी ‘गुरुमाऊलींचे सर्वांकडे लक्ष आहे. प्रत्येकाची काळजी घेत ते प्रत्येक साधकाला शिकवत आहेत’, असे आम्हाला जाणवले.

५. या प्रसंगात सौ. थोरातवहिनी आणि श्रीमती दौंडेवहिनी यांच्याकडून आम्हाला ‘नियोजन, आज्ञापालन, परेच्छेने वागणे, प्रेमभाव, नीटनेटकेपणा, तत्परता अन् व्यष्टी साधनेतील सातत्य’ इत्यादी गुण शिकता आले.

गुरुमाऊलीने अनुभवण्यास दिलेले त्यांनीच माझ्याकडून लिहून घेतले. ते त्यांच्याच कोमल चरणी कृतज्ञतापूर्वक समर्पण ! ‘या घनघोर आपत्काळात गुरुदेव आपल्या समवेत असणारच आहेत. तेच आपल्याला आपत्काळातून अलगद बाहेर काढणार आहेत’, याची या प्रसंगातून गुरुदेवांनीच अनुभूती दिली’, याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. दत्तात्रय कुलकर्णी, गावभाग, सांगली. (८.८.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक