विज्ञानाचा दुष्परिणाम ! – संपादक
(दिवसभरात भ्रमणभाष, दूरदर्शन संच, संगणक, भ्रमणसंगणकच्या स्क्रीनकडे किती वेळ पहातोय, ती वेळ म्हणजे ‘स्क्रीन टाइम’.)
संभाजीनगर – खाण्याच्या सवयी पालटल्यामुळे मुलांमध्ये स्थूलता आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढली आहे. कोरोनामुळे २ वर्षे मुलांचा वेळ ऑनलाईन शाळा, भ्रमणभाष, दूरदर्शन संच आणि भ्रमणसंगणक पहाण्यात गेला आहे. त्यामुळे या मुलांना स्क्रीनची लागलेली सवय अजूनही गेलेली नसल्याने पालकांसमोर मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ अल्प करणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे, तसेच मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पालटल्यामुळे त्यांच्यात स्थूलता वाढली आहे. सध्या मुलांमध्ये बद्धकोष्ठता हा आजार जाणवत आहे, अशी माहिती भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी १६ एप्रिल या दिवशी येथे दिली.
डॉ. उपेंद्र किंजवडेकर म्हणाले,
१. गेल्या २ वर्षांत मुले स्वत:ला असुरक्षित समजत होती. त्यांच्यात नैराश्य वाढले होते. कोरोनामुळे मुलांमधील संवाद अल्प झाला आहे.
२. मुलांना सामाजिक माध्यम हेच सर्वस्व वाटत असल्यामुळे ती त्याच्या आहारी गेली आहेत. याचे काही लाभ असले, तरी हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.
३. आमच्याकडे येणाऱ्या १० पैकी ८ मुलांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. ६-१८ वर्षे वयोगटांतील मुलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यांना योग्य आहार आणि आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
४. सतत भ्रमणभाष आणि दूरदर्शन संच पहाण्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे.
५. ‘ऑटिझम’मध्येही (स्वमग्नता) वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मुलांचा आईवडिलांशी संवाद अल्प झाला आहे. आईवडीलही त्रास होऊ नये; म्हणून मुलांच्या हातात भ्रमणभाष देतात. त्यामुळे मुले घंटोन्घंटे भ्रमणभाषमध्ये अडकून रहातात.
६. मुलांचे रात्रीच्या झोपेचे गणितही बिघडले असून रात्री १२ वाजेपर्यंत ती झोपत नाहीत. त्याचा परिणाम शरीरावर होत आहे.
७. ऑनलाईनमध्ये मुले उत्तीर्ण झाली असली, तरी ४० टक्के मुले अभ्यासात मागे आहेत. आम्ही ‘आय.एम्.ए.’द्वारे पालकांचे प्रबोधन करण्याचे काम करत आहे.