राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर जातीवाचक टीका !

आमदार म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीमध्ये इतका जातीद्वेष असेल, तर ते समाजात लोकप्रतिनिधी म्हणून काम कसे करणार ?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर टीका करतांना त्यांच्या आडनावातील ‘पांडे’ वेगळा करून त्यापुढे ‘बुवा’ हा शब्द अवतरणचिन्हात देऊन त्यांना जातीवाचक शब्दांत हिणवण्याचा प्रयत्न केला. अमोल मिटकरी यांनी केलेल्या या ‘ट्वीट’मध्ये पद्मश्री बाबासाहेब पुरंदरे यांचाही तुच्छतेने उल्लेख केला आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी जेम्स लेन यांचे पुस्तक मागे घेण्यासाठी ‘ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी’ला बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अन्य इतिहासकारांनी लिहिलेले पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून शरद पवार यांना ‘स्वत:ची चूक वाटत असेल, तर महाराष्ट्राची क्षमा मागावी’, अशी मागणी केली होती. त्याला अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले; मात्र उत्तरात त्यांनी संदीप देशपांडे यांची जात दाखवण्याचा प्रयत्न केला. अमोल मिटकरी यांनी ‘पांडे ‘बुवा’ उशिरा सुचलेल्या शहाणपणाची पत्रे सामाजिक संकेतस्थळावर टाकून खोट्या प्रसिद्धीची धडपड मी समजू शकतो. अक्कल ठिकाणावर ठेवून जरा हेही वाचा. अगोदरच तुमचा भोंगा फाटलाय आणि हो या देशात एकच बाबासाहेब आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उगाच अकलेचे तारे ताडून आम्हाला बोलायला भाग पाडू नका’, असे ‘ट्वीट’ केले आहे. या ‘ट्वीट’मध्ये त्यांनी ‘बाबासाहेब’ एकच असल्याचे सांगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानत नसल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.