धर्मसंसदेत अस्तित्वाची चर्चा, मुसलमानांविरुद्ध भाषण नव्हते ! – देहली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

सुदर्शन वृत्तवाहिनीचे सुरेश चव्हाणके यांच्यावर मुसलमानांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या आरोपाचे प्रकरण

सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक अध्यक्ष सुरेश चव्हाणके

नवी देहली – १९ डिसेंबर २०२१ या दिवशी देहली येथे झालेल्या धर्मसंसदेत सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांच्यावर मुसलमानांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धर्मसंसदेत केवळ अस्तित्व रक्षणाची चर्चा झाली, तर मुसलमान समाजाच्या विरोधात कोणतेही द्वेषपूर्ण भाषण झाले नसल्याचे पोलिसांनी म्हटले.

‘ए.एन्.आय.’ वृत्तसंस्थेनुसार जमा केलेले पुरावे आणि व्हिडिओ फुटेज यांच्या आधारे देहली पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सखोल चौकशी केल्यानंतर हा निष्कर्ष निघाल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरेश चव्हाणके मुसलमानांविषयी काहीही बोलले नाहीत. हिंदु धर्म बळकट करण्याविषयी आणि राक्षसी शक्तींविरुद्ध लढण्याविषयी या धर्मसंसदेत चर्चा झाली, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.