|
मुंबई – महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीवरील वज्रलेपाची झीज थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. मूर्तीचे संवर्धन आणि वारकऱ्यांच्या भावनांचा आदर या दोन्हींची सांगड घालून उपाययोजना करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
१४ एप्रिल या दिवशी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची ऑनलाईन बैठक झाली. पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूर्तीची प्रत्यक्ष पहाणी करून उपाययोजनांविषयी अभ्यासपूर्ण अहवाल ५ मेपर्यंत सादर करण्याचे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या वेळी दिले. या बैठकीला सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मंदिर समितीचे श्री. औसेकर महाराज, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत मिश्रा यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या वेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, या अहवालातील महत्त्वाची सूत्रे वारकरी संप्रदायाच्या निदर्शनास आणून द्यावीत. वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी. त्यांच्या भावनांचा आदर करावा. यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी यांची मंदिर समितीच्या समन्वयाने बैठक घ्यावी. मंदिर आणि परिसरातील आर्द्रता न्यून करण्यासाठी मंदिरातील ‘मार्बल’ काढण्याविषयी योग्य, निर्दोष पद्धतीचा अवलंब व्हावा, यासाठी संबंधित विभागाची अनुमती घ्यावी. वज्रलेपाची झीज थांबवण्याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन, अन्य मंदिरात केलेल्या उपाययोजना, मंदिर समित्यांचा अनुभव लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.