भारताने स्वत:ची सैन्यक्षमता आणि युद्धसामुग्रीचे आधुनिकीकरण यांवर भर द्यायला हवा ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘रशिया-युक्रेन यांच्या युद्धात आम्ही युक्रेनला पूर्ण साहाय्य करू’, असे अनेक पाश्चात्त्य देश सांगत होते; मात्र प्रत्यक्षात रशियाने युक्रेनच्या सैन्यासह नागरी वस्त्यांवर आक्रमण केल्यावरही कोणत्याही देशाने युक्रेनच्या साहाय्यासाठी प्रत्यक्ष कोणतीही सैन्य कारवाई केली नाही. त्यामुळे या युद्धात युक्रेन एकटा पडला आहे. या सर्वांचा परिणाम उद्या चीनही अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांच्या धमक्यांना न घाबरता थेट तैवानला स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी युद्ध करू शकतो. तैवाननंतर चीनचे पुढील लक्ष्य भारत असू शकतो. गेली ८ वर्षे चीनने ‘ग्रे वॉरफेअर झोन’ (प्रत्यक्ष युद्ध न करता सतत युद्धाची स्थिती निर्माण करणे) निर्माण केलेला आहे. यात चीन हा रशियापेक्षा पुष्कळ पुढे आहे. तसेच रशिया हा चीनचा सर्वांत मोठा मित्र असल्यामुळे भारतालाही पुढील काळात कुणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्याने लढावे लागेल. त्यासाठी भारताने स्वत:ची सैन्यक्षमता आणि युद्धसामुग्रीचे आधुनिकीकरण यांवर भर द्यायला पाहिजे.