सध्या भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. हे प्रथमच घडत आहे, असे नाही, तर वर्ष १९४९ च्या चीनमधील साम्यवादी (कम्युनिस्ट) क्रांती नंतर याला प्रारंभ झाला आहे. त्यानंतर चीनने हळूहळू मंचूरिया, दक्षिण मंगोलिया, युनान, पूर्व तुर्कस्तान, मकाऊ, हाँगकाँग, पॅरासेल्स आणि तिबेट हस्तगत केले. तसेच वर्ष १९६२ च्या आक्रमणात लडाखमधील पामीरचा पठारही कह्यात घेतला. तिकडे पाकिस्ताननेही पाकव्याप्त काश्मीरमधील ‘अक्साई चीन’ चीनला दिला आहे. प्रश्न हा आहे की, चीन आक्रमकपणे कारवाया करत असतांना आमचे डोळे का उघडले नाहीत ? भारताने नेमकी चूक कुठे केली ? भारताने तिबेटला चीनचा भाग समजण्याची चूक केली आणि पंचशीलच्या सिद्धांतांवर डोळे झाकून विश्वास ठेवला. शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण युद्धाची कूटनीती विसरलो. परिणामी भारताचे स्वतःच्या लष्करी सिद्धतेकडे दुर्लक्ष झाले. ‘आपण कुणावर आक्रमण करणार नाही, तर कुणी आपल्यावरही आक्रमण करणार नाही’, या भ्रमात रहाणे भारताला महागात पडले.
लेखक : गंगाधर ढोबळे
आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चीनच्या साम्राज्यवादी धोक्याविषयी देशाला सतर्क करणे
चीनच्या साम्यवादी साम्राज्यवादाच्या धोक्याविषयी दोन दिग्गज भारतीय नेत्यांनी वेळीच सतर्क केले होते. एक होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! डॉ. आंबेडकर यांनी वर्ष १९५१ मध्ये कायदामंत्री असतांना ‘हिंदु कोड बिल’च्या वेळी आणि २६ ऑगस्ट १९५४ ला राज्यसभेचे खासदार असतांना चीनविषयी संसदेत चेतावणी दिली होती. ‘चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एक दिवस भारताशी विश्वासघात करतील अन् भारताला धोका देतील’, असे त्यांना वाटत होते. त्यांची चेतावणी खरी ठरली; कारण स्वातंत्र्यानंतर याच दोन देशांनी भारतावर युद्धे लादली आहेत.
दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी २६ जानेवारी १९५४ च्या दैनिक ‘केसरी’मधील त्यांच्या लेखामध्ये म्हटले होते की, ‘मागील ६ वर्षांमध्ये चीनने त्याच्या सैन्याच्या बळावर तिबेट गिळंकृत केले. आता चीन आणि रशिया यांची सीमा सरळ भारताशी येऊन टेकली आहे. ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या रक्षणासाठी अफगाणिस्तान, तिबेट, नेपाळ, सिक्कीम, भूतान, ब्रह्मदेश इत्यादी राज्ये आणि देश निर्माण करून ठेवले होते. त्यांना आपल्या समवेत रहाण्याची इच्छा होती; परंतु आता तेही विचलित झाले आहेत.’ ही राज्ये आता चीनच्या प्रभावाखाली येत आहेत. सावरकर यांनी ही गोष्ट ६ दशकांपूर्वी सांगितली होती. यावरून त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते; परंतु आमची परराष्ट्रनीती वर्ष १९६२ मध्ये माओने कानफटात मारेपर्यंत भूमीवर आलीच नाही.
पंचशील कराराविषयी डॉ. आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत सरकारला सतर्क करणे
भारत आणि चीन यांच्यात २९ एप्रिल १९५४ मध्ये ‘पंचशील करार’ झाला. या कराराचे सिद्धांत पुढील अनेक वर्षे भारताच्या परराष्ट्रनीतीचा भाग राहिले आहेत. या ५ सिद्धांतांमध्ये एकमेकांची अखंडता आणि सार्वभौमत्व यांचा सन्मान करणे, एकमेकांवर आक्रमण न करणे, अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप न करणे, समान आणि परस्पर लाभदायक संबंध अन् शांतीपूर्ण सहअस्तित्व राखणे ही सूत्रे होती. डॉ. आंबेडकर यांनी पंचशील करारावर टीका करतांना राज्यसभेत स्पष्टपणे म्हटले होते की, ‘माओचा पंचशीलवर विश्वास नाही; परंतु आपले पंतप्रधान याला पुष्कळ गांभीर्याने घेत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. राजकारणात पंचशील आदी काही नसते. साम्यवादी देशाच्या राजकारणात, तर अजिबात नाही. साम्यवादी देशामध्ये नैतिकता नावाची गोष्ट नसतेच. त्यांची आजची नैतिकता उद्या रहाणार नाही. सांगायचे तात्पर्य हे की, पंचशीलच्या नावाने भावूक होण्याची आवश्यकता नाही, तर विश्वासघात होणेच आहे.’
याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही तत्कालीन केंद्र सरकारला सतर्क केले होते. वर्ष १९५६ मध्ये जोधपूर येथील हिंदु महासभेच्या अधिवेशनामध्ये ते म्हणाले की, ‘केवळ पंचशीलचा मंत्र जपल्याने काही होत नाही. पंचशीलवर स्वाक्षरी करणार्या रशियाने हंगरी देशावर चढाई करून इंग्लंडलाही चेतावणी दिली आहे. ते (नेहरूंच्या) पंचशीलची चिंता करत नाहीत; कारण त्यांची लष्करीदृष्ट्या स्थिती चांगली आहे.’ सावरकर यांचे म्हणणे होते की, ‘ज्या राष्ट्राकडे शक्तीशाली सैन्य असते, तेच राष्ट्र मोठे समजले जाते, इतर सर्व गोष्टींना काही अर्थ नाही. चर्चा करण्यासाठी पंचशील किंवा वैश्विक सिद्धांत चांगला वाटत असला, तरी व्यवहारामध्ये आपल्या देशाचे हित जपणे महत्त्वाचे असते.’
‘हिंदी-चिनी भाई भाई’ घोषणेविषयी चीनकडून धोका खाणार्या नेहरूंचा मोहभंग होणे
पंचशील करारानंतर ज्या घटना घडल्या, त्याही लक्षात घेतल्या पाहिजे. त्याचे दोन कंगोरे आहेत. एक चीनकडून त्याच्या सि कियांग प्रदेशातून तिबेटपर्यंत दळणवळण आणि लष्करी सिद्धतेचे जाळे निर्माण करणे अन् दुसरे अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेच्या संदर्भातील करार चीनने नाकारणे. पंचशील करारानंतर तत्कालीन चिनी पंतप्रधान चाऊ एन् लाई भारत भेटीवर आले. त्या वेळी नेहरू आणि चाऊ यांच्यात सार्या जगभराच्या गोष्टी झाल्या; परंतु सीमेसंदर्भातील सूत्राला कुणीही स्पर्श केला नाही.
चीन अप्रसन्न होऊ नये, यासाठी नेहरूंनी त्या वेळी तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांना भारतात शरणागती देण्यास नकार दिला. तिकडे वर्ष १९५७ मध्ये बातमी आली होती की, सि कियांग-तिबेट मार्ग पूर्णपणे सिद्ध झाला आहे. भारतात जनतेच्या वाढत्या दबावामुळे नेहरूंनी चाऊ यांना याविषयी पत्र लिहिले. त्याचेही उत्तर महिनाभरानंतर आले. चाऊने म्हटले की, दोन देशांमध्ये कोणती सीमाच ठरलेली नाही. त्यामुळे ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या घोषणेविषयी नेहरूंचा मोहभंग झाला. त्यांना चीनने धोका दिला होता.
मॅकमोहन सीमारेषेवर विश्वास ठेवणारा भारत आणि ती धुडकावून लावणारा चीन !
चीनने नेहरूंना दुसरा धोका दिला, तो मॅकमोहन सीमारेषेच्या वेळी ! ब्रिटीश, भारत, तिबेट आणि चीन यांच्यात वर्ष १९१४ मध्ये सिमला येथे झालेल्या एका करारांतर्गत ‘मॅकमोहन रेषा’ सीमारेषा म्हणून स्वीकारण्यात आली. यालाच ‘मॅकमोहन सीमारेषा’ म्हणतात. मॅकमोहन ब्रिटीश अभियंता होता. त्याच्या चमूमध्ये चिनी राजदरबारी अभियंतेही होते; परंतु चिन्यांनी नंतर यातून अंग काढून घेतले. त्यानंतर एकट्या मॅकमोहनने कठोर परिश्रम करून नकाशांच्या आधारे ही सीमारेषा ठरवली आणि संपूर्ण दस्तावेज चिनी दरबारात प्रस्तुत केले. हिमालयाच्या पश्चिम सीमेवर तिबेट एक राज्य होते. त्यामुळे त्या प्रदेशामध्ये भारत-चीन नावाची कोणतीही सीमा नव्हती, जी होती ती चीन-लडाख सीमा ! पूर्व हिमालयाच्या प्रदेशामध्ये, म्हणजे आजच्या अरुणाचल प्रदेशची सीमा केवळ ब्रिटीशकालीन भारताशी मिळत होती; परंतु चीनने याला बळजोरीने आखलेली सीमा असल्याचे सांगितले आणि करार धुडकावून लावला. चीनने संपूर्ण उत्तर सीमेला वादाचा विषय बनवला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चीनविषयी सरकारला सतर्क करणे आणि सरकारने त्याकडे ‘आतंकवादी विचार’ समजून दुर्लक्ष करणे
चीन अशा प्रकारचे षड्यंत्र करत राहिला आणि आंबेडकर-सावरकर दोघेही सरकारला सतर्क करत राहिले. लखनौ विद्यापीठ आणि काठमांडु येथे झालेल्या विश्व धम्म संमेलनामध्ये डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते, ‘‘आम्हाला मार्क्स नाही, तर बुद्ध पाहिजे.’’ स्वातंत्र्यवीर सावरकर याच्याही एक पाऊल पुढे होते. ते म्हणायचे, ‘‘आम्हाला बुद्ध नको, युद्ध हवे !’’ बुद्ध शब्दाचा येथे धार्मिक अर्थ नसून ‘शांती’ असा अर्थ आहे.
सावरकरांचे म्हणणे होते की, शांती आम्हालाही हवी आहे; परंतु देशाच्या सार्वभौमत्वाची किंमत देऊन नाही. युद्ध पाहिजे, म्हणजे आपल्याला लष्करी सिद्धतेवर जोर दिला पाहिजे, अत्याधुनिक शस्त्रांची निर्मिती केली पाहिजे; कारण शांती बळाने मिळते, सद्गुणांनी नाही. कूटनीतीमध्ये न्याय नावाचा पक्षी नसतोच. कूटनीतीचा आरंभ आणि अंत अन्याय अन् धोकेबाजी यांतच होतो. सरकारने चीनच्या जाळ्यात फसू नये. तत्कालीन सरकारने सावरकर यांच्या विचारांना ‘आतंकवादी’ संबोधून दुर्लक्ष केले.
तिसर्या महायुद्धाची चाहूल ?चीनने तिबेट गिळंकृत केला आणि लडाखमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तिबेटीचे विचार महत्त्वाचे आहेत. तिबेटच्या निर्वासित सरकारचे पंतप्रधान लोबसंग संगाय यांचे मत या प्रकरणाला अधिक गंभीर करते. ते म्हणाले होते, ‘‘उत्तर सीमा ही जोपर्यंत भारत-चीन ऐवजी पहिल्यासारखी भारत-तिबेट रहाणार नाही, तोपर्यंत भारतासाठी चीनचा धोका नेहमीसाठी राहील.’’ तिबेट कह्यात घेतांना माओ याने स्पष्ट म्हटले होते की, तिबेट तर चीनच्या तळहातासारखे आहे. याची ५ बोटे लडाख, सिक्कीम, नेपाळ, भूतान आणि अरुणाचल आहेत. हे वक्तव्य सहजपणे घेऊ नये. या माध्यमातून चीनला दक्षिण पूर्व आशियात उतरायचे आहे. काय ही तिसर्या महायुद्धाची चाहूल आहे ? |
(साभार : नवभारत टाइम्स, १४.८.२०२०)