प्रत्येकाने दिवसातील १५ मिनिटे वेळ काढून राष्ट्र-धर्माच्या स्थितीविषयी चिंतन-मनन केले पाहिजे ! – शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वतीजी महाराज, काशी सुमेरू पीठ

समारोपाच्या अगोदर बाल वारकर्‍यांनी टाळ-मृदंगाचा ठेका धरून उपस्थितांची मने जिंकली

कोल्हापूर, ६ एप्रिल (वार्ता.) – भारताने नेहमीच विश्वकल्याणाची भूमिका घेतली आहे. तमिळी हिंदूंची हत्या करणार्‍या श्रीलंकेत खाण्यासाठी अन्न नाही, अशी स्थिती आहे. भारताचा तिरस्कार करणार्‍या पाकिस्तानची स्थिती काय आहे, हे आपण पहात आहोत. संत साहित्याचे चिंतन, मनन केल्यास आपल्या मनातून भीती निघून जाईल. सद्यःस्थितीत प्रत्येकाने १५ मिनिटे वेळ काढून राष्ट्र-धर्माच्या स्थितीविषयी चिंतन मनन आणि नामस्मरण केले पाहिजे. धर्म राहिला, तरच भारत राहिल, असे प्रतिपादन उत्तरप्रदेश येथील काशी सुमेरू पिठाचे शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. ते ६ एप्रिल या दिवशी महासैनिक दरबार सभागृह येथे आयोजित दोन दिवसांच्या ‘विश्वात्मक संत साहित्य संमेलना’च्या समारोपप्रसंगी बोलत होते.

समारोपाच्या अगोदर बाल वारकर्‍यांनी टाळ-मृदंगाचा ठेका धरून उपस्थितांची मने जिंकली

हे संमेलन ‘अमरवाणी इव्हेंट्स फाऊंडेशन’, उदयपूर येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय, तसेच ‘इंडसमून मिडिया’ यांच्याद्वारे आयोजित करण्यात आले होते.

संमेलनात मार्गदर्शन करतांना काशी सुमेरू पिठाचे शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वतीजी महाराज

स्वामी नरेंद्रानंद सरस्वतीजी महाराज या वेळी म्हणाले,

१. भारतियांनी जर गीतेचा अभ्यास केला असता आणि ती आत्मसात् केली असती, तर भारत कधीच पारतंत्र्यात गेला नसता.

२. भारतात जितके विपुल प्रमाणात संत साहित्य उपलब्ध आहे, तितके अन्यत्र कुठेच नाही. महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, तर समर्थ रामदास्वामी समजून घ्यावे लागतील, संत ज्ञानेश्वर महाराज यांना समजून घ्यावे लागेल. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले ज्यांच्या साहित्याने महाराष्ट्र समृद्ध झाला.

३. सत्ययुगापासून ज्या काळात संतांचे योगदान नाही, असा एकही कालखंड नाही.

४. श्री महालक्ष्मीचा जर आशीर्वाद देणारा हात असेल, तर तिच्या दुसर्‍या हातात शस्त्रही आहे. याच भवानीमातेने छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवारही दिली होती. हे आपण विसरता कामा नये.


साधू-संत हेच या देशाचे बलस्थान ! – विष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री, त्रिपुरा

या प्रसंगी त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री विष्णुदेव वर्मा म्हणाले, ‘‘भक्ती याला इंग्रजीत समानार्थी शब्द नाही, धर्म-संस्कृती याला इंग्रजीत शब्द नाही. भक्ती, संस्कृती, संतांची विचारधारा यांमुळे भारत आज टिकून आहे. साधू-संत हेच या देशाचे बलस्थान आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम्’, असे मानणारी आपली संस्कृती आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांनी सामाजिक क्षेत्रांत काय केले यापेक्षा धार्मिक, आध्यात्मिक आणि भक्ती या क्षेत्रांत समाजाला काय दिले ते महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात धर्म महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती क्रांतीला नाही, तर उत्क्रांतीला महत्त्व देते. संस्कृती, मूल्य हे काढून टाकले, तर भारतात काहीच रहाणार नाही.’’
या प्रसंगी ह.भ.प. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी यांनीही मनोगत व्यक्त केले.


विशेष

१. समारोपाच्या बाल वारकर्‍यांनी टाळ-मृदंगाच्या घोषात ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली. या संमेलनास उपस्थित असलेले त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री विष्णुदेव वर्मा यांनीही काही काळ या विद्यार्थ्यांच्या समवेत टाळ हातात घेऊन त्याचे वादन केले.

२. वाराणसी, श्रीलंका येथून अशी संमेलने आयोजित करण्यासाठी मागणी असल्याचे संयोजकांनी सांगितले.

३. पहिल्या दिवशीच्या उद्घाटन सत्रानंतर दुसर्‍या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसर्‍या दिवशी संमेलन पहाण्यासाठी ‘संकेतस्थळ लिंक’ मागून घेतली.


पहिल्या दिवशीच्या विशेष घडामोडी

१. संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यांनी संमेलनासाठी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘मंत्री, नेते, राज्यपाल यांच्यामागे फिरण्यापेक्षा संतांच्या सान्निध्यात रहा. त्यांच्यासमोर लीन व्हा. आज मी जे काही आहे, त्यामागे संतांचेच आशीर्वाद आहेत.

२. संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चित्रकार संदीप घोडके यांनी काढलेली चित्रे लावण्यात आली होती. या प्रदर्शनात संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांसह सद्गुरु बाळूमामा, समर्थ रामदासस्वामी अशी अनेक चित्रे होती. ही चित्रे पाहून राज्यपालांनी त्याचे कौतुक केले आणि याचे मूल्य विचारून त्याचे मूल्य घेऊन ही चित्रे राजभवनावर पाठवून द्यावीत, असे सांगितले.