बुचा शहरामध्ये आम्ही नरसंहार केला नाही ! – रशियाचा दावा

मॉस्को (रशिया) – बुचा शहरामध्ये आम्ही नरसंहार केला नाही, असा दावा रशियाने केला आहे. हे संपूर्ण प्रकरण खोटे असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ रशियाने प्रसारित केला आहे. बुचा शहरात ४१० हून अधिक मृतदेह मिळाले आहेत. रशियाच्या सैन्याने नागरिकांची सामूहिक हत्या केल्याचा आणि महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला आहे की, रशियाच्या सैन्याने ३० मार्च २०२२ या दिवशी बुचा शहरातून माघार घेतली होती. कीव प्रशासनाकडून जी छायाचित्रे प्रसारित केली जात आहेत, त्यांतील मृतदेह ४ दिवस उलटूनही गोठलेले नाहीत. मृत्यूनंतर काही घंट्यांनी मृतदेह ताठ होऊ लागतो. मृतदेहांची जी भयावह छायाचित्रे समोर आली आहेत, ती बनावट आहेत. रशियाच्या सैन्याला अपकीर्त करण्यासाठी युक्रेनकडून हे केले जात आहे.