‘सुपर मार्केट’मध्ये ‘वाईन’ विक्री करण्याविषयी सरकारने हरकती आणि सूचना मागवल्या !

जनतेला व्यसनमुक्त करण्याऐवजी तिला व्यसनाधीन बनवणारा हा निर्णय सरकारने तात्काळ रहित करावा, अशीच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – ‘सुपर मार्केट’मध्ये सीलबंद बाटलीमध्ये ठेवलेली वाईन विक्री करण्यास अनुमती देण्याविषयी सरकारने नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. २९ जूनपर्यंत ‘आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००२३’ या पत्त्यावर टपालाद्वारे अथवा ‘[email protected]’ या ‘ई मेल’ पत्त्यावर हरकती आणि सूचना द्यावयाच्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यावर प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे आणि विरोधक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर सरकारने याविषयी जनमत घेऊन निर्णय घेण्याचे घोषित केले होते. त्यासाठी सरकारकडून या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.

सूज्ञ नागरिकांना आवाहन !

मद्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सूज्ञ आणि दक्ष नागरिकांनी स्वत:चे मत अवश्य नोंदवावे, असे आवाहन समाजातील जागरूक नागरिकांनी केले आहे.