पालकांना पाल्यांच्या बहुतेक समस्यांतून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरणारे शिबिर
पुणे – येथील महर्षि कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेचे महिलाश्रम वसतिगृह (रमासदन बिल्डिंग), कर्वेनगर येथे ५ मे या दिवशी सकाळी १० ते ८ मे या दिवशी सायंकाळी ५ पर्यंत वैद्य सुविनय दामले कृत ‘भारतीय गुरुकुल परिवार’ने ‘बालक-पालक गुरुकुल शिबिर क्रमांक ४’चे आयोजन केले आहे. पालकांना पाल्यांच्या बहुतेक समस्यांतून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त असणारे हे शिबिर असून यासाठी बालक-पालक दोघांनीही पूर्णवेळ उपस्थित रहाणे आवश्यक आहे. वैद्य सुविनय वि. दामले, शास्त्रज्ञ डॉ. उदय भवाळकर, श्री. नितीन शेलार, सव्यसाची शस्त्र गुरुकुल यांच्यासह अनेक अनुभवी वक्ते, वैद्य, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, कलाशिक्षक, निसर्गप्रेमी यांच्याकडून अनमोल ज्ञान ग्रहण करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
आरोग्य, कला, क्रीडा, इतिहास, अध्यात्म, भारतीयत्व संस्कार, संस्कृती, पालकत्व, याचे शिक्षण दिले जाणार आहे. गुरुकुल पद्धतीची ओळख म्हणजे बालक-पालक शिबिर. या शिबिरामध्ये गुरुकुल शिक्षणपद्धती कशी असते, धर्म आणि भारतीय संस्कृती, भारतीय प्राचीन विज्ञान, भारतीय खेळ, व्यायाम, ‘शिवरायांशी सलगी’ असे विशेष कार्यक्रम आणि गीत, माळा, पतंग बनवणे, आरास करणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहेत.
या शिबिरात ८ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतचे बालक आणि त्यांचे पालक या दोघांना एकत्रित प्रवेश घ्यावा लागेल. याचे शुल्क बालकांना २००० रुपये आणि पालकांना २५०० रुपये इतके असून शिबिर शुल्कामध्ये दोन वेळेस चहा, नाष्टा, भोजन, निवास व्यवस्था, शिबिरातील कार्यक्रम व्यवस्था, सर्व समाविष्ट आहे.