रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे ‘डॉलर’ आणि ‘युरो’ यांना फटका ! – रशियाचा दावा

मॉस्को (रशिया) – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले. त्याचा उलट परिणाम ‘डॉलर’ आणि ‘युरो’ यांच्यावरच होत असून ते दुर्बळ झाले आहेत, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे माध्यम सचिव दिमित्री पेस्कोव यांनी केला आहे.

‘बेलारूस २४’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना पेस्कोव म्हणाले की,

१. ‘डॉलर’ आणि ‘युरो’ दुर्बळ होण्याची प्रक्रिया सध्या त्याच्या प्रारंभिक टप्प्यात असली, तरी तिला थांबवणे आता शक्य नाही. अनेक दशके अमेरिकी डॉलर हे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सर्वांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले होते; परंतु यापुढे त्याला उतरती कळा लागेल.


२. अनेक पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर लावलेल्या निर्बंधांमुळे रशियाने त्यास प्रत्युत्तर देत रशियाकडून नैसर्गिक वायू विकत घेण्यासाठी त्या-त्या देशांना रशियन बँकांमध्ये रशियाचे चलन असलेल्या रुबलमध्ये खाती उघडावी लागतील, असा नवीन नियम बनवला.
३. ज्यांनी रशियावर निर्बंध लादले आहेत, त्यांच्यासाठी प्रामुख्याने हा नियम असणार आहे, असेही रशियाने गेल्या आठवड्यात घोषित केले.
४. रशियाच्या या भूमिकेमुळेच आता डॉलर आणि युरो यांना फटका बसणार आहे. यामुळे डॉलर आणि युरो यांचे महत्त्वही आणखी न्यून झाले आहे. रशियाचे म्हणणे आहे की, हे केवळ नैसर्गिक वायूची निर्यात आणि रशियाविरोधी देशांवर लादलेले नियम असले, तरी हा पायंडा बनून जगभरामध्ये अशा प्रकारेच व्यवहार होऊन येणार्‍या काळात डॉलरचे महत्त्व उरणार नाही.
५. यासमवेतच रशियाने त्याचे मित्रराष्ट्र असलेल्या तुर्कस्तान आणि भारत यांच्याशी व्यवहार करतांना त्या-त्या राष्ट्रीय चलनामध्ये व्यवहार करण्याचा आग्रह धरला आहे.