डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक आणि ‘संगीत (तबला) अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे श्री. योगेश सोवनी यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २८.१२.२०२१ या दिवशी प्रथम आणि २३.३.२०२२ या दिवशी दुसऱ्यांदा आगमन झाले. त्यानंतर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने त्यांच्या तबलावादनाचे काही प्रयोग करण्यात आले. प्रयोगांच्या वेळी आणि दोन प्रयोगांच्या मधल्या कालावधीत त्यांच्या संदर्भात जाणवलेले पालट अन् लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. शिष्यभावात वृद्धी होणे
श्री. सोवनी यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ‘तबला’ क्षेत्रातील त्यांचे विविध गुरु यांच्या संदर्भातील शिष्यभाव वाढल्याचे जाणवतो.
२. तबलावादनाची सेवा श्रीगुरुचरणी फुलांच्या रूपाने समर्पित होणे
जेव्हा ते तबलावादन करत असतात, तेव्हा त्यांचे मन श्रीगुरूंना पूर्णपणे समर्पित झाल्याचे जाणवते. त्या वेळी श्री. सोवनी यांच्या हृदयात श्रीगुरूंच्या चैतन्यदायी पिवळसर रंगाच्या चरणांचे दर्शन होते आणि त्यावर श्री. सोवनी यांनी तबलावादनरूपी सेवा अर्पण केल्याचे जाणवते. त्यामुळे प्रत्येक प्रयोगानंतर श्री. सोवनी यांच्या हृदयातील श्रीगुरुचरणांवर समर्पण भक्तीची निळ्या रंगाची फुले वाहिल्याचे सूक्ष्म दृश्य दिसते.
३. श्री. सोवनी यांना त्यांच्या गुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे
प्रयोगाच्या वेळी तबलावादन चांगल्या प्रकारे झाल्यावर आणि त्याचा प्रेक्षकांवर चांगला परिणाम झाल्यावर श्री. सोवनी यांना त्यांच्या गुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. त्यांच्या हृदयातील कृतज्ञताभाव त्यांची दृष्टी, मुखावरील हावभाव आणि हालचाली यांतून जाणवतो.
४. श्री. सोवनी यांच्यातील ‘कर्तेपणा नसणे’, या गुणामुळे त्यांच्यावर श्रीगुरूंची भरभरून कृपा होत आहे’, असे जाणवणे
श्री. सोवनी यांच्यामध्ये कर्तेपणा नसल्यामुळे ते तबलावादनाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या गुरूंना अर्पण करतात. ते म्हणतात, ‘मी काहीच करत नाही. जे काही आहे, ते सर्व श्रीगुरूंची कृपाच आहे.’ ‘श्री. सोवनी यांच्यातील ‘कर्तेपणा नसणे’, या गुणामुळे त्यांच्यावर श्रीगुरूंची भरभरून कृपा होत आहे’, असे जाणवते.
५. श्री. सोवनी यांच्या मनात श्रीगुरूंच्या प्रतीचा समर्पणभाव आणि कृतज्ञताभाव यांच्यामध्ये वृद्धी झाल्यामुळे त्यांच्या पाठीमागे श्रीगुरुतत्त्वाचे वलय दीर्घकाळ टिकून रहाणे
जेव्हा श्री. सोवनी प्रयोगाला आरंभ करत असतात, तेव्हा त्यांच्या पाठीमागे पिवळ्या रंगाचे गुरुतत्त्वाचे वलय कार्यरत झाल्याचे जाणवते. हे वलय पूर्वी केवळ काही क्षणांसाठी दिसायचे. आता श्री. सोवनी यांच्या मनात श्रीगुरूंच्या प्रतीचा समर्पणभाव आणि कृतज्ञताभाव यांच्यामध्ये वृद्धी झाल्यामुळे त्यांच्या पाठीमागे श्रीगुरुतत्त्वाचे वलय दीर्घकाळ टिकून रहाते.
६. श्री. सोवनी तबलावादन करत असतांना त्यांच्या पाठीमागे त्यांचे गुरु सुप्रसिद्ध तबलावादक तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे आणि त्यांनी श्री. सोवनी यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांच्यावर गुरुकृपेचा वर्षाव केल्याचे जाणवणे
२५.३.२०२२ या दिवशी जेव्हा श्री. सोवनी यांनी झपतालामध्ये ‘कायदा’ (टीप) हा प्रकार वाजवला, तेव्हा ‘तो प्रयोग संपूच नये’, असे वाटत होते. एका प्रयोगाच्या वेळी जेव्हा श्री. सोवनी पुणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी रचलेला कायदा वाजवत होते, तेव्हा श्री. सोवनी यांच्या पाठीमागे पंडित सुरेश तळवलकर यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवले. श्री. तळवलकर यांच्या कृपेचा हात श्री. सोवनी यांच्या मस्तकावर होता. त्यांच्या हातातून पिवळ्या रंगाच्या चैतन्य आणि ज्ञान यांच्या लहरी श्री. सोवनी यांच्या मस्तकात जाऊन त्यांच्या संपूर्ण देहात पसरल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्याकडे गुरुतत्त्वाकडून आलेले चैतन्य त्यांच्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित झाले आणि त्यांच्या तबलावादनातून भाव, चैतन्य अन् आनंद यांच्या लहरी संपूर्ण वातावरणात वेगाने प्रक्षेपित झाल्या. त्यामुळे संपूर्ण वातावरण भावमय, चैतन्यदायी आणि आनंदमय झाले होते.
टीप – कायदा : तालाच्या मूळ स्वरूपानुसार सिद्ध केलेली विशिष्ट बोलसमुहाची नियमबद्ध अन् विस्तारक्षम रचना म्हणजे कायदा. हा स्वतंत्र तबला-वादनातील मुख्य प्रकार आहे. ‘कायदा’ हा विलंबित आणि मध्य या लयीत (दुगुण किंवा चौगुण यांत) वाजवला जातो.
७. श्री. सोवनी यांचे तबलावादन इतके दैवी होते की, प्रयोगाला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपैकी चार साधिकांनी स्थुलातून व्यासपिठाच्या बाजूला जाऊन प्रथमच भरतनाट्यम् नृत्य सादर करणे
तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या चार साधिकांना नृत्य करण्याची प्रेरणा मिळून त्यांनी उत्स्फूर्तपणे भरतनाट्यम् नृत्य सादर केले. असे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच घडले की, अनिष्ट शक्तींचा त्रास असणाऱ्या आणि नसणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या साधिकांनी तबलावादनाच्या प्रयोगाच्या वेळी एकाच वेळी नृत्य केले. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या’ इतिहासातील ही ऐतिहासिक घटना ‘याची देही याची डोळा पहाण्याची संधी मिळाली’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
८. संगीताचा परिणाम वनस्पती आणि निसर्ग यांच्यावर झाल्याची प्रचीती येणे
प्रयोगाच्या ठिकाणी तुळस, गुलाब आणि निवडुंग यांची रोपे ठेवली होती. तबलावादनातून प्रक्षेपित झालेले भाव, चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींमुळे या रोपांनाही आनंद झाल्याचे जाणवले. निवडुंगाच्या रोपातील नकारात्मक स्पंदने आणि तमोगुण यांचे प्रमाण न्यून झाल्याचे जाणवले. तसेच गुलाब आणि तुळस या रोपांमध्ये भावलहरी कार्यरत झाल्यामुळे गुलाबाकडे विष्णुतत्त्व आणि तुळशीकडे रामतत्त्व आकृष्ट झाल्याचे जाणवले. यावरून ‘संगीताचा परिणाम वनस्पती आणि निसर्ग यांच्यावर कशा प्रकारे होऊ शकतो’, हे सूत्र अभ्यासता आले.
९. श्री. सोवनी यांच्यातील भावामुळे त्यांच्यावर झालेल्या श्रीगुरुकृपेमुळे त्यांची वाटचाल तबलावादनातून भगवंताकडे, स्थूल जगतातून सूक्ष्म जगताकडे आणि ऐहिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे चालू झालेली असणे
‘श्रीगुरूंची कृपा संपूर्ण आयुष्यभर प्राप्त व्हावी’, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावरून श्री. सोवनी यांच्यामध्ये श्रीगुरूंप्रतीचा अपार भाव जाणवतो. त्यामुळे आधी श्रीगुरुकृपेमुळे त्यांना केवळ तबल्याचे ज्ञान मिळून ते तबलावादनात पारंगत झाले. आता त्यांच्या भावात वृद्धी झाल्यामुळे त्यांच्यावर झालेल्या श्रीगुरुकृपेमुळे त्यांची वाटचाल तबलावादनातून भगवंताकडे चालू झालेली आहे. देवाच्या कृपेने त्यांची वाटचाल स्थूल जगतातून सूक्ष्म जगताकडे आणि ऐहिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे चालू झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या भौतिक उन्नतीसह त्यांची आध्यात्मिक उन्नतीही होत आहे.
१०. श्री. सोवनी यांच्यावरील श्रीगुरुकृपेमुळे त्यांनी ठरवल्यापेक्षा निराळ्या पद्धतीने तबलावादन होणे, त्यांच्या तबल्यातून मृदंगाचा नाद स्थुलातून ऐकू येणे आणि त्यांच्या तबल्याच्या नादलहरींमधून निर्गुण-सगुण स्तरावरील शिवतत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवणे
श्री. सोवनी यांच्या तबलावादनाच्या प्रयोगानंतर त्यांनी सांगितले, ‘‘मी जेव्हा तबलावादन करण्यासाठी व्यासपिठावर बसतो, तेव्हा मी जे ठरवले असते त्याहीपेक्षा निराळ्या पद्धतीने आणि माझ्या कल्पनेच्या पलीकडील तबलावादन होते.’’ त्यामुळे जेव्हा श्री. सोवनी तबलावादन करत होते, तेव्हा त्यांच्या तबल्यातून ‘मृदंगाचा’ नाद स्थुलातून ऐकू येत होता आणि त्यांच्या तबल्याच्या नादलहरींमध्ये निर्गुण-सगुण स्तरावरील शिवतत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवले. तेव्हा ‘ही श्री. सोवनी यांच्यावरील गुरुकृपा असून श्रीगुरुच त्यांच्याकडून आवश्यक असणारे तबल्याचे प्रकार वाजवून घेतात’, असे मला जाणवले. यावरून ‘गुरुतत्त्व शिष्याच्या माध्यमातून कसे कार्यरत असते’, हे सूत्र मला शिकायला मिळाले.
‘श्री. सोवनी यांनी यापुढेही भावस्थितीमध्ये तबलावादनाची सेवा केली, तर लवकरच ते जीवनमुक्त होऊन म्हणजे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदाकडे वाटचाल करू शकतात’, असे देवाने मला सांगितले.
कृतज्ञता
परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे श्री. योगेश सोवनी यांच्यातील शिष्यभावाशी संबंधित असणारी वरील गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.३.२०२२)
|