‘जिल्हा ग्राहक आयोगा’चे बिग बझारला १ सहस्र ५०० रुपये हानीभरपाई देण्याचे निर्देश !

संभाजीनगर येथे ग्राहकाकडून कापडी पिशवीसाठी शुल्क आकारल्याचे प्रकरण

पुणे – महाराष्ट्रातील जिल्हा ग्राहक आयोगाने ‘फ्युचर रिटेल लि.’चा एक भाग असलेल्या बिग बझारला व्यवसायाने अधिवक्त्या असलेल्या अश्विनी धनावत यांना त्यांच्या दुकानात खरेदी केलेल्या वस्तू घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या कापडी पिशवीसाठी १९ रुपये आकारल्याने
१ सहस्र ५०० रुपये हानीभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. याविषयी नुकत्याच दिलेल्या आदेशात आयोगाच्या अध्यक्षा निलिमा संत, सदस्य नीता कांकरिया आणि मंजुषा चितलांगे यांचा समावेश असलेल्या खंडपिठाने या ‘रिटेल चेन’ला ज्यासाठी त्यांनी ग्राहकांकडून शुल्क आकारले होते, त्या ‘वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी’चा तपशील प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी अधिवक्त्या अश्विनी धनावत यांनी जालना आयोगासमोर तक्रार प्रविष्ट केली होती.

अश्विनी धनावत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना आवश्यक असलेले पैसे भरल्यानंतर २७ डिसेंबर २०२० या दिवशी संभाजीनगर येथील बिग बझारमधून खरेदी केलेल्या वस्तू घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडून वेगळे शुल्क आकारण्यात आले. ‘ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंसाठी स्वतंत्रपणे पिशवी खरेदी करावी लागेल’, असा उल्लेख असलेले कोणतेही फलक ‘स्टोअर’मध्ये लावलेले नव्हते, तसेच १७ डिसेंबर २०२० आणि २१ डिसेंबर २०२० या दोन दिवशी त्याच ‘आउटलेट’ला (दुकानाला) दुसऱ्या भेटीच्या वेळी, त्यांच्याकडून ‘वैयक्तिक अपघात विमा’ पॉलिसीसाठी अनुक्रमे २.३३ आणि २.३६ रुपये आकारले गेले. प्रत्यक्षात विमा पॉलिसीसाठी शुल्क आकारण्यासाठी अधिवक्त्या अश्विनी धनावत यांची अनुमती घेण्यात आली नाही किंवा त्यांना प्रदान केलेल्या पॉलिसीचे कोणतेही तपशील देण्यात आले नाहीत.

वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीच्या सूत्रावर आयोगाने नमूद केले की, ‘इनव्हॉइस’मध्येच असे म्हटले आहे की, ‘पॉलिसी ऑफर’ केवळ ‘फ्युचर पे (टीप) ग्राहकांसाठी’ आहे आणि ग्राहकांना लवकरच लघुसंदेशाद्वारे पॉलिसीची माहिती मिळेल; मात्र तक्रारदाराने त्या ‘फ्युचर पे ग्राहक’ आहेत कि नाही, याविषयी तपशील दिलेला नाही आणि त्यांना लघुसंदेशाद्वारे कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आयोगाने त्या संदर्भात कोणतेही आदेश देण्याचे टाळले असून या ‘आउटलेट’ला धनावत यांना सर्व माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

ग्राहकाला त्याच्या स्वतःच्या पिशवीसह दुकानात प्रवेश करण्याची अनुमती नाही. त्यामुळे सामानासह पिशवी खरेदी करण्याविना त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. हा सरळसरळ ग्राहकांवर अन्याय आहे. त्यामुळे वस्तू वितरणयोग्य स्थितीत ठेवण्यासाठी होणारा सर्व प्रकारचा व्यय विक्रेत्याने उचलला पाहिजे, असा आदेश पूर्वी ‘राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगा’ने दिला होता. त्याचे उल्लंघन करत कापडी पिशवीसाठी ग्राहकाला १९ रुपये आकारल्याने बिग बझारला १ सहस्र ५०० रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाच्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रतिवादी बिग बाझार (फ्यूचर रिटेल लिमिटेड) आयोगाकडून नोटीस देऊनही त्यांच्यासमोर उपस्थित रहाण्यात किंवा तक्रारीला विरोध करणारा प्रतिसाद प्रविष्ट करण्यात अयशस्वी ठरला; म्हणून आयोगाने प्रकरण पूर्वपक्षाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

(टीप – ‘फ्युचर पे’ हे फ्युचर ग्रुप स्टोअर्स जसे की, बिग बझार, एफबीबी, सेंट्रल, ब्रँड फॅक्टरी इत्यादींवरील खरेदीसाठी ‘डिजिटल वॉलेट’ आहे. डिजिटल वॉलेट तुमच्या ‘स्मार्ट फोन’मध्ये एका ‘ॲप’च्या माध्यमात उपलब्ध असते. या ॲपद्वारे तुम्हाला हव्या त्या सामानाची खरेदी करता येऊ शकते.)