ममता बॅनर्जी यांचे सर्व विरोधी पक्षांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या विरोधात संघटित होण्याचे फुकाचे आवाहन !

  • अन्वेषण यंत्रणांविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन करणे, हा ममता बॅनर्जी यांचा समाजद्रोह ! – संपादक 
  • ‘अन्वेषण यंत्रणांमुळे पक्षाने केलेला भ्रष्टाचार आणि राष्ट्रघातकी कारवाया समोर येतील’, या भीतीपोटी बॅनर्जी अन्वेषण यंत्रणांना विरोध करत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक 
ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय अन्वेषण यंत्रणांद्वारे विरोधी पक्षांवर अन्याय करत आहे, अशा भूमिकेतून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

१. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रात लिहिले आहे की, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) आणि आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर सूड उगवण्यासाठी, देशभरातील राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी, छळण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून भाजपला केंद्रीय संस्थांचा अपवापर करण्यापासून रोखले पाहिजे. आपण सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एका ठिकाणी एकत्र येऊन चर्चा करावी.

२. ममता बॅनर्जी यांनी पुढे असेही म्हटले, ‘माझा मनात न्यायव्यवस्थेविषयी सर्वोच्च आदर आहे; मात्र सध्या काही राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे लोकांना न्याय मिळत नाही. हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि जनता हे आपल्या लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचे स्तंभ आहेत अन् कोणत्याही भागाला तडा गेला, तर संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडते.’