ईश्वराच्या ईश्वरत्वाचा आणि अन्य सर्वच दैवी गुणांचा उगम त्याच्या ‘निरपेक्ष प्रीती’ या गुणातून होतो. ईश्वराची प्रीती हेच या सृष्टीचे, म्हणजे आपल्या जन्माचे कारण आणि आनंदप्राप्तीसाठीचे कार्यही आहे. भगवंताने पृथ्वीवर दहा अवतार घेण्याचे कारणही तेच असून भक्तांवरील प्रीतीमुळेच ईश्वर धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. ईश्वराची प्रीती हीच धारणाशक्ती असून तोच धर्म आहे. ईश्वराच्या ‘प्रीती’ या अनन्यसाधारण गुणामुळेच सर्व जिवांना त्याची ओढ लागते. त्याच्या प्रीतीविना सूर्य, चंद्र आणि तारांगणे एका क्षणात निष्प्रभ होतील अन् आपल्या सर्वांचे जीवन कवडीमोल होईल. अशा ईश्वराचे, त्या ब्रह्मांडनायकाचे सगुण रूप असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक प्रेम हेच आम्हा साधकांचे इहलोकीचे आणि परलोकीचे वैभव आहे.
१. सच्चिदानंद परब्रह्म असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वशक्तीमान, सर्वज्ञानी अन् परिपूर्ण असल्यामुळे सौंदर्याची खाण असणे, ते साधकांचा श्वास, प्राण आणि जीवनसर्वस्व असणे
परात्पर गुरु डॉक्टर सच्चिदानंद परब्रह्म आहेत. ते परमात्मा आहेत. ते सर्वशक्तीमान, सर्वज्ञानी अन् परिपूर्ण असल्यामुळे सौंदर्याची खाण आहेत; पण ‘हे सर्व आम्ही साधक कुठे जाणतो ?’ आम्हाला केवळ ‘ते आमची परम कृपाळू गुरुमाऊली आहेत’, एवढेच ठाऊक आहे. आमचा श्वास, प्राण, अस्तित्व आणि जीवनसर्वस्व तेच आहेत. इथे आमचे काहीच नाही. जे आहे, ते सर्व त्यांच्या कृपेनेच आम्हाला मिळाले आहे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वव्यापक प्रीती !
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगातून प्रीतीच्या अनंत धारा सतत वहात असल्याने त्यांच्या सान्निध्यात सतत चैतन्य आणि आनंद अनुभवता येणे : परात्पर गुरु डॉक्टरांचे चालणे, बोलणे, हसणे, पहाणे इत्यादि एकूण सर्वच कृती अलगद, सहज आणि सुंदर होतात. त्या मृदु आणि मधुर असतात. त्यांच्या सर्वांगातून सतत प्रीतीच्या अनंत धारा वहात असल्याने त्यांचे सर्वच श्रीकृष्णाप्रमाणे मधुर आहे. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात सतत चैतन्य आणि आनंद अनुभवता येतो.
२ आ. ‘सनातनचे विश्वकुटुंब’ हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अतूट अशा प्रीतीच्या धाग्यांनी जोडले असून त्यांनीच सर्व साधकांची मने जोडून ठेवली असणे : प्रत्येक मुलाला वाटते, ‘आईचे माझ्यावरच अधिक प्रेम आहे !’ अगदी तसेच प्रत्येक साधकालाही ‘आपण परात्पर गुरु डॉक्टरांचे लाडके आहोत’, असे वाटत असते. प्रत्यक्षात त्यांच्यामुळेच आपण साधनेत आलो, टिकून राहिलो आणि एकमेकांशी जोडले गेलो आहोत. त्यांनीच आपल्या सर्वांची मने जोडून ठेवली आहेत. हे ‘सनातन विश्वकुटुंब’ परात्पर गुरु डॉक्टरांच्या अतुट अशा प्रीतीच्या धाग्यांनी जोडलेले आहे.
२ इ. सूर्याचे तेज, अग्नीची दाहकता, आकाशाची व्यापकता आणि वायूची गतीमानता हीच ओळख आहे, त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांची ‘प्रीती (निरपेक्ष प्रेम)’ हीच ओळख आहे.
३. गुरुकार्यापेक्षा साधकांना अधिक महत्त्व देणारी आणि प्रीतीने सर्व साधकांची काळजी घेणारी प्रेमळ गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले !
३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांची अनुभवलेली प्रीती ! : वेगवेगळ्या ३ प्रसंगांत साधिकांनी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितलेली अडचण आणि त्यांनी साधिकांना दिलेली उत्तरे येथे दिली आहेत.
१. वृद्ध साधिका : परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले), आता माझ्याकडून सेवा होत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात ना ? तुम्ही आता काय सेवा करणार ? एवढी वर्षे पुष्कळ सेवा केलीत. आता देवाला तुमच्याकडून सेवेची अपेक्षा नाही. तुम्ही आता नामजप करायचा.
२. एक काकू : परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले), माझ्याकडून सेवा होत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : असे कसे होईल ? थोडी तरी सेवा करता ना ? सेवेचा विचार करायला नको. त्यासाठी स्वयंसूचना घ्या. सेवा काय होणारच आहे. त्याचा ताण घ्यायला नको. जेवढे होते, तेवढे करायचे !
३. वयस्कर साधिका : मला बरे नसते. त्यामुळे मी सेवा करू शकत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आजारी आहात, तर अंथरुणावर पडून समष्टीसाठी नामजप करू शकता. समष्टीसाठी ‘नामजप करणे’ ही मोठी समष्टी सेवाच आहे. तुम्ही आता समष्टीसाठी नामजप करा !
३ आ. प्राणशक्ती अल्प असतांनाही सेवारत असणारे आणि साधकांशी प्रेमाने बोलून त्यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : प्राणशक्ती अल्प असतांनाही परात्पर गुरु डॉक्टर सेवेत व्यस्त असतात. उदा. ‘ग्रंथाशी संबंधित संगणकीय धारिकांचे वाचन करणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, साधकांच्या साधनेतील अडचणींचे निवारण करणे, साधकांना घडवणे इत्यादी. ‘प्रत्येकाला तेच हवेत’, अशी स्थिती असते. आता परात्पर गुरु डॉक्टरांचे वय झाले आहे, त्यांची प्राणशक्ती अल्प असते आणि पुष्कळदा ते रुग्णाईत असतात. इतक्या त्रासात आणि व्यस्ततेतही ते साधकांना घडवतात आणि त्यांचे कौतुक करून त्यांना खाऊही पाठवतात. परात्पर गुरु डॉक्टरांना साधकांसाठी भरपूर वेळ असतो; कारण त्यांची निरपेक्ष प्रीती आहे. आपण (साधक) स्वतःच्या लाभाला प्राधान्य देत इतरांवर प्रेम करतो.
४. साधकांवर पितृवत् प्रेम करून त्यांना साधना आणि सेवा यांसाठी प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक करणारे परम पिता !
४ अ. साधकांना विविध सेवा शिकवून त्या परिपूर्ण करवून घेणारे आणि केलेल्या सेवेचे कौतुक करून साधकांना खाऊ देणारे प्रेमळ परम पिता ! : परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत संगणकीय धारिका वाचायची सेवा करणार्या एका साधकाला मी विचारले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्याला एखादी सेवा दिली आणि आपल्याला ती सेवा करायला जमली नाही, तर तुम्ही काय करता ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘तसे नसते काकू ! ते सेवा देतात आणि ‘ती सेवा कशी करायची ?’, ते सांगतात. नंतर त्या सेवेत ‘कुठे आणि काय चुकले ?’, ते सांगून तेच त्या चुका आमच्याकडून सुधारून घेतात. तेच आम्हाला सेवा करायला शिकवतात आणि तेच ती सेवा परिपूर्णही करवून घेतात. नंतर तेच साधकाचे कौतुक करून त्याला त्या सेवेसाठी खाऊही देतात ! आपण केवळ सेवेला ‘हो’ म्हणायचे. सर्वकाही तेच करतात !
४ अ १. परात्पर गुरु डॉक्टरांनी काही सूत्रांचा अनुक्रम लावायला सांगून, ‘तो कसा लावायचा ?’, ते शिकवणे आणि ‘छान जमले’, असे सांगून कौतुकही करणे : तो साधक पुढे म्हणाला, ‘‘एकदा मी त्यांच्या समवेत संगणकीय धारिका वाचायला बसलो होतो. तेव्हा त्यांनी मला काही सूत्रे दाखवली आणि त्यांनी ती मला क्रमाने लावायला सांगितली. जिथे माझे चुकले, तेथे ‘हा मुख्य विषय, हा उपविषय, हे उपउप सूत्र’ असे सांगून ‘ते कसे शोधायचे ?’, हे त्यांनी मला शिकवले आणि माझ्याकडून नीट क्रम लावून घेतला. अशा प्रकारे त्यांनी मला ग्रंथाची अनुक्रमणिका लावायला शिकवली आणि ‘छान जमले !’ असे सांगून माझे कौतुकही केले.’’
४ अ २. ज्ञान सहजतेने आणि मुक्तहस्ते वाटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : तो साधक पुढे म्हणाला, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘मी नसलो, तरी पुढच्या पिढीला ग्रंथरूपात ज्ञान मिळायला हवे.’’ त्यांनी मला पुढे काही वर्षे चालू रहाणारी ग्रंथनिर्मितीची सेवा किती पटकन आणि सहजतेने शिकवली.’’
त्यांचे किती हे प्रेम ! किती ही तळमळ ! स्वतःला महत्त्व मिळायला हवे; म्हणून आपण हातचे राखून ठेवतो; मात्र परात्पर गुरु डॉक्टर आपल्या जवळील सर्व ज्ञान सर्वांना मुक्तहस्ते वाटत असतात. (क्रमशः)
– गुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |