ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याच्या सोहळ्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण !

१४.३.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एका भावसोहळ्यात ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

पू. राजाराम नरुटे

१. संत घोषित करण्यापूर्वी जाणवलेली सूत्रे

अ. कार्यक्रमाच्या आरंभी श्री. नरुटेआजोबा व्यासपिठावरील आसंदीवर बसले असता त्यांच्या तोंडवळ्याच्या जागी मला सूक्ष्मातून विठ्ठलाचे मुख दिसले. त्या वेळी ‘ते वारकरी असून त्यांची विठ्ठलभक्ती आहे’, असा विचार माझ्या मनात आला. प्रत्यक्षातही असे असल्याचे कार्यक्रमात त्यांचा परिचय ऐकतांना समजले.

श्री. राम होनप

आ. श्री. नरुटेआजोबा यांचे बोलणे ऐकून माझे मन अंतर्मुख होऊन माझा भाव जागृत झाला. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या मनाला पुष्कळ आनंद मिळत होता.

इ. कार्यक्रम चालू होण्यापूर्वी एक साधक चित्रीकरणाच्या दृष्टीने श्री. नरुटेआजोबा यांचे कपडे व्यवस्थित करत होता. त्या वेळी साधक ‘पंढरपूरच्या विठ्ठलाचेच वस्त्र नीट करत आहे’, असे मला दृश्य दिसले.

ई. कार्यक्रमात श्री. नरुटेआजोबा श्रीविष्णूच्या दशावतारांविषयी बोलत होते. तेव्हा माझ्या मनात ‘आज आम्हाला श्री. नरुटेआजोबा यांच्या रूपात विठ्ठलाचा अवतार पहायला मिळाला. त्यामुळे विठ्ठलाचे दर्शन घ्यायला पंढरपूरला जायला नको. विठ्ठलच श्री. नरुटेआजोबा यांच्या रूपात रामनाथी आश्रमात आला आहे’, असा विचार आला.

उ. आपण एखाद्या अपरिचित व्यक्तीला भेटल्यावर अन्य कुणी त्याचा परिचय करून देतो, त्याप्रमाणे श्री. नरुटेआजोबा यांच्या बाजूला सूक्ष्मातून विठ्ठल उभा आहे, असे मला दिसले आणि त्याने श्री. नरुटेआजोबा यांना उद्देशून ‘हे भक्तशिरोमणी आहेत’, असा त्यांचा परिचय मला करून दिला.

२. संतपदी विराजमान झाल्यानंतर जाणवलेले सूत्र

श्री. नरुटेआजोबा संतपदी विराजमान झाल्यावर सनातन संस्थेचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी त्यांच्या गळ्यात हार अर्पण करून सन्मान केला, तेव्हा मला पू. नरुटेआजोबांच्या जागी सूक्ष्मातून गळ्यात तोच हार घातलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले. त्या वेळी ‘हा सन्मान प्रत्यक्षात विठ्ठलाचाच चालू आहे’, असे मला जाणवत होते.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला पंढरपूरला न जाता पू. नरुटेआजोबांच्या माध्यमातून विठ्ठलाचे दर्शन झाले’, या विषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०२२)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक