वाराणसी सेवाकेंद्रातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांना उकळत्या पाण्याने भाजल्यावर आलेल्या अनुभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती वाटलेली कृतज्ञता !
१. स्वयंपाकघरात सेवा करतांना उकळत्या पाण्याचे पातेले हातातून निसटून उकळते पाणी शरिरावर उडणे आणि त्या वेळी भित्रा स्वभाव असूनही शांत रहाणे
२२.६.२०२१ या दिवशी सकाळी १० वाजता मी स्वयंपाकघरात सेवा करत होते. मी गॅसवरून उकळत्या पाण्याचे पातेले खाली उतरवत असतांना ते माझ्या हातातून निसटले आणि त्यातील उकळते पाणी माझा तोंडवळा अन् शरीर यांवर उडाले. माझा स्वभाव अशा वेळी भयभीत होऊन ओरडण्याचा असूनही त्या वेळी मी शांत राहिले.
२. अंगावर गार पाणी टाकत असतांना परात्पर गुरुदेवांचे श्रीरामस्वरूप आठवणे आणि गंगाजलाची शीतलता अनुभवून ‘गुरुदेवच शरिराचा दाह न्यून करत आहेत’, असे वाटणे
प्रथमोपचार म्हणून मला माझ्या शरिरावर सतत गार पाणी घालण्यास सांगितले होते. स्नानगृहात अर्धा घंट्यापेक्षा अधिक वेळ सहसाधिका माझ्या अंगावर गार पाणी ओतत होती. त्या वेळी मला परात्पर गुरुदेवांच्या श्रीरामस्वरूपाचे स्मरण झाले आणि गंगामातेच्या जलतत्त्वाची शीतलता अनुभवता येत होती. मला वाटले, ‘जणूकाही गुरुदेवच त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून शीतलता पोचवून माझ्या शरिराचा दाह न्यून करत आहेत.’
३. तोंडवळ्यावर भाजूनही मन सकारात्मक असणे आणि ‘गुरुदेवांनी मोठे संकट टाळून रक्षण केले’; म्हणून कृतज्ञता वाटून मन शांत रहाणे
स्नानगृहातून बाहेर आल्यानंतर माझ्या शरिराचा दाह होण्याचे प्रमाण न्यून झाले होते. माझ्या तोंडवळ्यावर भाजले होते; परंतु माझ्या मनात कोणताही नकारात्मक विचार आला नाही. मला मनातून गुरुदेवांविषयी ‘केवढे मोठे संकट टाळून त्यांनी माझे रक्षण केले आहे’, अशी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. त्यामुळे माझे मन शांत आणि स्थिर झाले.
४. राष्ट्रीय भक्तीसत्संगात आपतत्त्व साधकांना साहाय्य करणार असल्याचा विषय ऐकला असल्याने स्थिर रहाता येऊन गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटणे
त्या सप्ताहात भक्तीसत्संगातसुद्धा ‘आपत्काळात आपतत्त्वाचे महत्त्व आणि ते कशा प्रकारे साहाय्य करणार ?’, हा विषय चालू होता. त्यामुळेही माझे मन स्थिर रहाण्यास साहाय्य झाले.
अशा कठीण प्रसंगात गुरुदेवांनी माझे रक्षण केले, त्यासाठी कृतज्ञतास्वरूप हे जीवन त्यांच्या चरणी समर्पित करते.
– सुश्री (कु.) सुनीता छत्तर (वय ४२ वर्षे), वाराणसी सेवाकेंद्र, वाराणसी, उत्तर प्रदेश. (६.११.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |