रशियन नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात १४ टक्क्यांनी वाढ !

मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून जगभरातील प्रमुख देशांनी रशियावर अनेक प्रतिबंध लादले आहेत, तसेच रशियाला युद्धावर प्रचंड प्रमाणात खर्चही करावा लागत आहे. त्यामुळे रशियन नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रशियाच्या काही भागांमध्ये साखरेची किंमत तब्बल ३७ टक्क्यांनी वाढली असून सरासरी वाढ ही १४ टक्के झाली आहे. रशियाचे चलन असलेले ‘रूबल’चे मूल्य हे तब्बल २२ टक्क्यांनी घटले आहे, तर देशातील महागाई ही १४.५ टक्क्यांनी वाढली आहे. रशियामध्ये वर्ष २०१५च्या शेवटानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्याचे तेथील अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. घसरलेल्या रूबलवर लगाम लावण्यासाठी रशियन बँकेने कर्जावरील व्याज २० टक्क्यांनी वाढवले आहे.