साळगाव येथे नायजेरियाच्या नागरिकाकडून ६७ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

वर्ष २०२२ मधील सर्वांत मोठा छापा

अमली पदार्थांनी पोखरलेला गोवा !

पणजी, २३ मार्च (वार्ता.) – अमली पदार्थविरोधी पथकाने २३ मार्च या दिवशी साळगाव येथील एका मद्यालयावर धाड टाकून नायजेरियाचा नागरिक ओनये लकी याच्याकडून ६६ लक्ष ९५ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले. ‘एल.एस्.डी.’ लिक्विड’ आणि ‘एम्.डी.एम्.ए.’ हे अमली पदार्थ या वेळी कह्यात घेण्यात आले. अमली पदार्थविरोधी कायद्याच्या आधारे संशयित लकी याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चालू वर्षातील अमली पदार्थांच्या विरोधातील हा सर्वांत मोठा छापा आहे.

विदेशी नागरिकांचा अमली पदार्थ व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग ! – महेश गावकर, पोलीस अधीक्षक, अमली पदार्थविरोधी पथक

गोव्यात मोठ्या प्रमाणावर येणारे विदेशी नागरिक अमली पदार्थ व्यवसायात गुंतले आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत १ कोटी रुपये आणि वर्ष २०२१ मध्ये २ कोटी २५ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत.  वर्ष २०२१ मध्ये अमली पदार्थ व्यवसायात गुंतलेल्या १८ जणांना, तर चालू वर्षी ५ विदेशी नागरिकांना कह्यात घेण्यात आले आहे. चरस आणि गांजा या अमली पदार्थांच्या वाढत चाललेल्या व्यवसायाला स्थलांतरित कामगार अधिक उत्तरदायी आहेत’’, अशी माहिती पोलीस अधीक्षक (अमली पदार्थविरोधी पथक) महेश गावकर यांनी दिली. (अमली पदार्थाचा व्यवसाय आता समुद्रकिनारपट्टीतून गोव्यातील गावागावांत पोेचला आहे. अमली पदार्थ कुठे उपलब्ध असतात याची माहिती आता सर्वसामान्य नागरिकालाही सहजतेने मिळू शकते. नवनिर्वाचित सरकार आणि त्यांच्या अंतर्गत प्रशासन यांनी आता अमली पदार्थांच्या विरोधात कठोर पावले उचलावी, हेच जनतेला अपेक्षित आहे ! – संपादक)