उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आणणार ! – पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री

  • मुख्यमंत्री धामी यांचा स्तुत्य निर्णय ! भाजपशासित प्रत्येक राज्याने हा निर्णय घ्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे. – संपादक
  • असा एका एका राज्यात कायदा बनवण्याऐवजी केंद्र सरकारने देशात हा कायदा अस्तित्वात आणावा, असेच जनतेला वाटते ! – संपादक
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

डेहराडून – निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या वचनानुसार नवनिर्वाचित भाजप सरकार राज्यात समान नागरी कायदा लागू करील, असे आश्‍वासन उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिले. मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर धामी यांनी ‘आमचे सरकार समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आराखडा सिद्ध करणार असून त्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे’, असेही सांगितले.

निवडणुकीच्या आधी प्रकाशित केलेल्या घोषणापत्रात भाजपने ‘पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायदा आणू’, असे आश्‍वासन दिले होते. याविषयी बोलतांना धामी म्हणाले, ‘‘उत्तराखंडच्या लोकांना दिलेले हे वचन लवकरच पूर्ण करू. समान नागरी कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी स्थापन करण्यात येणार्‍या तज्ञांच्या समितीत कायदेतज्ञ, विविध क्षेत्रांतील विचारवंत आदींचा समावेश असेल. समान नागरी कायदा अस्तित्वात आल्यास प्रत्येक नागरिकासाठी विवाह, घटस्फोट, मालमत्ता आणि वारसाहक्क यांसाठी समान कायदे असतील.’’ देशात केवळ गोवा राज्यात समान नागरी कायदा आहे. उत्तराखंडमध्ये हा कायदा असित्वात आल्यास तो असा कायदा बनणारा देशातील दुसरे राज्य असेल.