खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील श्रीमती उषा सुधाकर मालव या सनातन संस्थेच्या नागपूर येथील साधिका आणि माझ्या मोठ्या वहिनी सौ. रमा देशमुख यांच्या आई आहेत. श्रीमती उषा मालव यांचे खडतर जीवन आणि कृष्णभक्तीमुळे त्यांना येत असलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. कष्टप्रद बालपण
१ अ. उषाताईंच्या बालविधवा आतेबहिणीने त्यांना दत्तक घेणे आणि रागीट स्वभावाच्या आतेबहिणीने उषाताईंचा राग राग करणे : श्रीमती उषाताईंचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. त्यांना त्यांच्या आतेबहिणीने दत्तक घेतले होते. ही आतेबहीण बालविधवा होती आणि एका शाळेत मुख्याध्यापिका होती. ती रागीट आणि तापट स्वभावाची होती. ती लहानग्या उषाला रागवायची आणि अक्षरशः झोडपून काढायची.
१ आ. लहानपणापासून कृष्णभक्तीत रमलेल्या उषाताई !
१ आ १. कृष्णमंदिरात जाणे आणि कृष्णाशी बोलणे : लहानपणापासूनच कृष्णभक्ती हा उषाताईंच्या जीवनाचा एक भाग होता. त्यांनी कठीण परिस्थितीतही कृष्णभक्ती करायचे सोडले नाही. त्यांच्या गावात एक सुंदर कृष्णमंदिर होते. उषाताई ४ वर्षांच्या असल्यापासून त्या मंदिरात जायच्या. ‘कृष्णाशी बोलणे, कृष्णाला दुःख सांगणे, फुले गोळा करून त्यांचा हार करून कृष्णाला घालणे आणि आनंदात घरी जाणे’, हा त्यांचा नित्य नेम होता.
१ आ २. कृष्णासाठी हार करायला एकही फूल न मिळाल्याने लहानगी उषा व्याकुळ होणे आणि एका गृहस्थाने तिला गुलाबाची टवटवीत फुले आणून देणे : एक दिवस सगळीकडे शोधूनही एकही फूल न मिळाल्याने लहानगी उषा थकून मंदिराच्या पायरीवर बसली. तिच्या डोळ्यांतून अश्रूधारा वहात होत्या. ती कृष्णाला ‘आज एकही फूल मिळाले नाही रे’, असे सांगत होती. कृष्णाने जणू त्या बालमनाची हाक ऐकली. एका गृहस्थांनी तिच्या ओंजळीत गुलाबाची फुले ठेवली आणि ‘‘ही फुले तुझ्या कृष्णासाठी घे’’, असे तिला सांगितले. त्या फुलांचा टवटवीतपणा वेगळाच होता. फुले पाहून ती चिमुकली आनंदली अन् कृष्णाला फुले वाहण्यासाठी उठली. नंतर ते गृहस्थ मात्र तिला कुठेच दिसले नाहीत.
२. सासरची बिकट परिस्थिती
वयाच्या १६ व्या वर्षी पांढुर्णा (छिंदवाडा, मध्यप्रदेश) या गावातील श्री. सुधाकर मालव यांच्याशी उषाताईंचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना सासरी पुष्कळ सासुरवास होऊ लागला. यजमानांची खासगी नोकरी असल्याने त्यांना ३ – ३ मास वेतन मिळत नव्हते. त्यामुळे घरखर्च आणि चार मुलांचे शिक्षण पूर्ण करतांना त्यांची तारेवरची कसरत चालू होती.
३. श्रीमती उषा मालव यांच्या भक्तीमुळे भगवंतच त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करत असणे
३ अ. मालव कुटुंब दारे नसलेल्या घरात रहाणे आणि ‘रात्रीच्या वेळी कुटुंबियांचे रक्षण व्हावे’, यासाठी उषाताईंनी प्रवेशद्वारात पोपटाचा पिंजरा ठेवणे : उषाताईंनी पांढुर्णा येथे घर बांधले होते; पण घराच्या चारही खोल्यांना दारे लावण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे अनुमाने २ वर्षे त्यांचे कुटुंब दारे नसलेल्या घरात रहात होते. तेव्हा त्यांची मोठी मुलगी (कु. माला) वयात आली होती. रात्रीच्या वेळी उषाताई मुलीच्या सुरक्षेसाठी घराच्या प्रवेशद्वारात घरातील पोपटाचा पिंजरा ठेवायच्या. ‘रात्री घरी कोणी आलेच, तर पोपट ओरडेल आणि त्यांना कळेल’, असा त्यांचा हेतू होता. दुसर्या दारात त्यांचे पती झोपायचे. तिसर्या दारात उषाताई स्वतः झोपायच्या अन् मुलांना आतल्या खोलीत झोपवायच्या. त्या थंडी आणि पाऊस यांची तमा न बाळगता आपल्या मुलींना जपत होत्या.
३ आ. उषाताईंच्या मोठ्या मुलीला वाईट शक्तींचा त्रास असल्याने ती रात्री झोपेतून उठून घराबाहेर जाणे आणि उषाताई श्री नवनाथांच्या पोथीचे पारायण करू लागल्यावर मुलगी रात्री बाहेर जाऊ न शकणे : उषाताईंच्या मोठ्या मुलीला वाईट शक्तींचा त्रास होता. ती रात्री जोरात किंचाळायची आणि झोपेतून उठून घराबाहेर पडायची अन् चालत एका पुलापर्यंत जायची. तिच्यामागे उषाताईही न बोलता चालत रहायच्या. मुलगी पुलाजवळ जाऊन मागे वळून बघायची आणि आई दिसली की, भानावर यायची. नंतर उषाताई तिला घेऊन घरी परत यायच्या. असे बरेच दिवस चालू होते.
यावर उपाय म्हणून उषाताईंनी रात्री अंघोळ करून श्री नवनाथांच्या पोथीचे पारायण करायला आरंभ केला. नंतर काही दिवसांनी त्यांच्या मुलीचे बाहेर जाणे बंद झाले. उषाताईंनी तिला विचारले, ‘‘आजकाल तू रात्री बाहेर जात नाहीस.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी बाहेर जायला निघाल्यावर दारापाशी मला आगीचा गोळा दिसतो. त्यामुळे मी परत जागेवर येऊन झोपते.’’ तेव्हा ‘श्री नवनाथच कुटुंबाचे रक्षण करत आहेत’, हे त्यांच्या लक्षात आले. उषाताईंच्या भक्तीमुळे भगवंतच त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करत होता.
‘श्रीकृष्ण मला कधीच उपाशी ठेवणार नाही. त्याला कधीही विसरायचे नाही’, हा त्यांचा दृढ भाव असल्याने संसार करता करताच त्यांचा परमार्थही अखंड चालू होता.
४. एका दुर्घटनेत उषाताईंच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्यावर त्यांनी गाणगापूर येथे श्री गुरुचरित्राचे पारायण करून दत्तात्रेयांना प्रार्थना करणे आणि दत्तगुरूंनी स्वप्नदृष्टांत देऊन ‘तुझ्या कुटुंबावर माझी कृपादृष्टी राहील’, असे सांगणे
एका दुर्घटनेत त्यांच्या मोठ्या मुलाचा (प्रशांतचा) मृत्यू झाला. मृत्यूनंतरचा दहावा दिवस झाल्यावर उषाताईंनी थेट गाणगापूर गाठले. गाणगापूरला गेल्यावर प्रत्येक रात्री औदुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्राचे वाचन करणे आणि दत्तात्रेयांना दुःख कथन करणे, असे चालू होते. त्यांनी तीन दिवस पारायण केले आणि दत्तात्रेयांना सांगितले, ‘तू मला कृपादृष्टीचे वचन देत नाहीस, तोपर्यंत मी येथून जाणार नाही.’ त्याच रात्री दत्तात्रेयांनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले, ‘तुझ्या मुलाचे एवढेच आयुष्य होते. तो आता परत येणार नाही. तुझ्या कुटुंबावर माझी कृपादृष्टी राहील !’ साक्षात् श्री दत्तगुरूंचे दर्शन झाल्याने उषाताईंच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
५. खामगाव (जि. बुलढाणा) येथे रहायला गेल्यावर उषाताईंचे कृष्णमय झालेले जीवन !
५ अ. उषाताईंनी कृष्णाची सगुण भक्ती करणे : उषाताईंच्या धाकट्या मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन त्याला खामगाव येथे नोकरी लागली. तेव्हा मुलाजवळ रहाण्यासाठी उषाताईंनी खामगावला घर घेतले. त्यानंतर उषाताईंचे शारीरिक कष्ट न्यून झाले आणि त्यांच्या सगुण सेवेला बहर येऊ लागला. कृष्णाची सगुण भक्ती करतांना त्या ‘कृष्णाला कोमट दूध पाजून मच्छरदाणी लावून पलंगावर झोपवायच्या. कृष्णाला थंडीच्या दिवसांत स्वेटर घालायच्या. सकाळी टाळ्या वाजवून आणि भूपाळी म्हणून त्याला उठवायच्या.
५ आ. उषाताईंनी स्त्रियांना भागवत वाचून दाखवणे : घराच्या जवळपास रहाणार्या स्त्रियांना उषाताई भागवत वाचून दाखवत. त्यांना श्रीकृष्णाच्या गोष्टीही सांगत. त्या वाती आणि श्रीकृष्णासाठी वस्त्रही सिद्ध करून विकत. त्यामुळे हळूहळू त्यांची तेथील लोकांची ओळख झाली. ‘हे सर्व कृष्णच करवून घेतो आणि लोकांच्या माध्यमातून कृष्णच ते विकत घेतो’, असा त्यांचा भाव असतो.
५ इ. स्त्रियांनी उषाताईंना मठात नेणे
५ इ १. प.पू. आगाशेकाका यांच्या मठातील श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती पाहून उषाताईंना लहानपणीचे कृष्णमंदिर आठवणे आणि त्यांचा भाव जागृत होणे : एक दिवस श्रीकृष्णाने उषाताईंच्या जीवनात आनंदाचा परमोच्च क्षण आणायचे ठरवले. भागवत ऐकायला येणार्या काही स्त्रिया उषाताईंना म्हणाल्या, ‘‘आपल्या गावात एक सुंदर मठ आहे. आम्ही तुम्हाला तेथे घेऊन जाऊ. तो मठ प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे शिष्य प.पू. आगाशेकाका यांचा आहे. मठात अतिशय सुंदर कृष्णमूर्ती आहे. ती मूर्ती पाहून तुम्हाला पुष्कळ आनंद होईल !’’ त्या स्त्रियांनी उषाताईंना मठात नेले. तेथे गेल्यावर उषाताईंना लहानपणीचे कृष्णमंदिर आठवले आणि त्यांचा भाव जागृत होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या.
५ इ २. मठातील सेवा करू लागल्यावर उषाताईंना प.पू. आगाशेकाकांकडून ‘गुरुमंत्र’ मिळणे : नंतर उषाताई प्रतिदिन मठात जाऊ लागल्या. मठातील केर काढणे, रांगोळी काढणे, पूजेची सिद्धता करणे आदी सेवा त्या करू लागल्या. काही दिवसांनी प.पू. आगाशेकाकांनी उषाताईंना ‘गुरुमंत्र’ दिला. मठातील मूर्तींची पूजा करण्ो आणि सोवळ्यात स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवणे, या सेवाही उषाताईंना मिळाल्या. त्या मठात भागवत वाचन आणि कृष्णकथा सांगणे, अशा सेवाही करू लागल्या. त्यांच्या वाणीतील माधुर्याने कथा ऐकायला येणार्यांची संख्या वाढत गेली.
६. उषाताईंच्या भक्तीमुळे घरात पुष्कळ चैतन्य जाणवणे आणि ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्ग ऐकल्यावर घरी येणार्या स्त्रियांनी सत्संगात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवणे
उषाताईंची मुलगी (सौ. रमा देशमुख) नागपूर येथे ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्ग घेते. त्यांनी सांगितले, ‘‘आई रहात असलेल्या घरात आता पुष्कळ चैतन्य जाणवते आणि तेथून जाऊ नये’, असे वाटते. आईने घरी येणार्या स्त्रियांना ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्ग ऐकण्यास सांगितले. तेव्हा आलेल्या काही जणींनी ‘आम्हाला या सत्संगात सहभागी करून घ्या’, असे लगेच सांगितले.’’
अशा कृष्णभक्त उषाताईंविषयीची सूत्रे लिहून घेतल्याबद्दल श्री गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉक्टर) आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– श्री गुरुचरणी शरणागत,
सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज. (२.११.२०२१)
|