शिक्षणतज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणार !
देशातील भाजप शासित राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारनेही त्यांच्या अंतर्गत येणार्या शाळांमधून हिंदूंचे धर्मग्रंथ शिकवण्यास चालू केले पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते ! – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – गुजरात शासनाने ६ वी ते १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीतेचे पाठ शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपशासित कर्नाटक शासनही असा निर्णय घेण्याचा विचार करत आहे.
सौजन्य इंडिया टूडे
राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी सांगितले, ‘सांस्कृतिक मूल्ये लोप पावत असल्याने ते थांबवण्यासाठी कर्नाटकमधील शाळांत श्रीमद्भगवद्गीतेचे पाठ शिकवण्याचा विचार सरकार करत आहे. शालेय अभ्यासक्रमात नीतीशास्त्र शिकवले जावे, अशी अनेक नागरिकांची मागणी आहे. शाळांमध्ये यापूर्वी नीतीशास्त्राची एक तासिका घेतली जायची. ती प्रत्येक आठवड्यात असायची. त्यात रामायण, महाभारत यांच्यातील कथांवर आधारित धडे दिले जायचे. आता याविषयीचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षणतज्ञांशी चर्चा केली जाईल. तसेच नीतीशास्त्र शिकवायचे कि नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल.’