रौद्री शांतीविधी केल्याने ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. माधव गाडगीळकाका (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे वडील) यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे !

धार्मिक विधींविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

हिंदु धर्मात सांगितलेल्या ‘रौद्री शांतीविधी’चे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘उतारवयात इंद्रिये अकार्यक्षम होऊ लागतात. कानाने अल्प ऐकू येणे, डोळ्यांनी अल्प दिसणे, विविध रोग निर्माण होणे इत्यादी त्रास चालू होतात. देवतांच्या कृपेने या व्याधींचा परिहार व्हावा आणि उर्वरित आयुष्य सुखात जावे, यांसाठी ५० व्या वर्षापासून १०० वर्षांपर्यंत प्रत्येक ५ वर्षांनी व्यक्तीसाठी शांतीविधी करावा’, असे शास्त्र आहे. रौद्री शांतीविधी वयाच्या ८५ व्या वर्षी करतात.

श्री. माधव गाडगीळ

सनातनचे ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. माधव गाडगीळकाका यांचा १८.१.२०२२ या दिवशी रौद्री शांतीविधी झाला. हा विधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सनातन-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केला. ‘रौद्री शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?, तसेच विधीतील घटकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे एक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

सौ. माधुरी गाडगीळ

१. चाचणीतील निरीक्षणे : या चाचणीत श्री. माधव गाडगीळ यांची विधीपूर्वी आणि विधीनंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. शांतीविधीतील अन्य घटकांचीही विधीपूर्वी आणि विधीनंतर निरीक्षणे करण्यात आली. तसेच विधीच्या वेळी करण्यात आलेल्या यागातून निघणारा धूर अन् यागाची विभूती यांचीही निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


१ अ. रौद्री शांतीविधीचा विधीतील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप – चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने त्यापुढे अचूक प्रभावळ मोजता आली नाही.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. श्री. माधव गाडगीळकाका यांनी रौद्री शांतीविधीतील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : श्री. माधव गाडगीळकाका यांनी शांतीविधीतील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्या भोवतीचे त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ न्यून झाले आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

आ. श्री. माधव गाडगीळकाका यांच्या गळ्यातील फुलांच्या हारावर विधीतील चैतन्याचा सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे हारातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ अल्प होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

इ. रुद्र (भगवान शिवाचे रूप) ही रौद्री शांतीविधीतील प्रमुख देवता आहे. विधीच्या वेळी रुद्र देवतेच्या कलशामध्ये रुद्र देवतेचे चैतन्य आकृष्ट झाले. याचा परिणाम म्हणून विधीनंतर कलशातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.

इ १.  विधीपूर्वी कलशात पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून येण्याचे कारण

इ १ अ. पाताळातील वाईट शक्तींनी श्री. माधव गाडगीळकाका यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे करून त्यांच्या ‘रौद्री शांती’ या विधीमध्ये सूक्ष्मातून विघ्न आणण्याचे नियोजन करणे आणि शिवाच्या कृपेने ही आक्रमणे विविध स्तरांवर परतवली जाणे : ‘रौद्री शांती’ या विधीचा संबंध श्री. माधव गाडगीळकाका यांच्याशी होता. ते सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे पिता असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन आध्यात्मिक उत्तराधिकार्‍यांपैकी एक असलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे ते सासरे आहेत. त्यामुळे मुलगा आणि सून यांच्यावर होणार्‍या आध्यात्मिक स्तरावरील वाईट शक्तींच्या आक्रमणांपैकी काही आक्रमणांचा परिणाम श्री. माधव गाडगीळकाका यांच्यावरही होणार होता. या आक्रमणांमुळे श्री. माधव गाडगीळकाका यांच्या ‘रौद्री’ शांतीविधीमध्ये विविध प्रकारची विघ्ने येणार होती. ‘तसे होऊ नये’, यासाठी शिवाच्या कृपेने त्यांच्यावरील सूक्ष्मातील आक्रमणे विविध स्तरांवर परतवण्यात आली. त्यामुळे श्री. माधव गाडगीळकाका यांचा ‘रौद्री शांती’ हा विधी निर्विघ्नपणे पूर्ण झाला.

कु. मधुरा भोसले

इ १ आ. वाईट शक्तींनी ‘रौद्री’ शांतीच्या ठिकाणी तीन स्तरांवर केलेली सूक्ष्मातील आक्रमणे आणि त्यांना देवतांनी दिलेले प्रत्युत्तर

इ १ इ. कलशातील जलामध्ये असलेली त्रासदायक शक्ती नष्ट होण्यासाठी वरुणदेवाने शिवाला प्रार्थना करणे आणि त्यानंतर विधी चालू झाल्यावर शिवाकडून प्रक्षेपित झालेल्या लयकारी लहरींमुळे कलशातील नकारात्मक स्पंदने पूर्णपणे नष्ट होऊन विधीनंतर कलशातील जलामध्ये सकारात्मक ऊर्जेची स्पंदने आढळणे : विधीच्या पूर्वी कलशामध्ये श्रीवरुणदेवाचे तत्त्व अप्रकट अवस्थेत असल्यामुळे वाईट शक्तींनी वरुणदेवतेशी लढण्यासाठी विधीतील कलशावर सूक्ष्मातून आक्रमणे केली. त्यामुळे विधीच्या पूर्वी कलशातील जलामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळली. ‘रौद्री शांती’ विधी चालू झाल्यानंतर सनातनच्या साधक पुरोहितांनी कलशामध्ये सप्तनद्या आणि सप्तसमुद्र यांचे आवाहन करण्यासाठी मंत्र म्हटल्यावर कलशातील जलामध्ये श्रीवरुणदेवाचे तत्त्व प्रगट स्वरूपात कार्यरत झाले. तेव्हा वरुणदेवाने कलशातील वाईट शक्तींनी निर्माण केलेली नकारात्मक स्पंदने नष्ट करण्यासाठी शिवाला प्रार्थना केली. त्यानंतर शिवाच्या ‘रुद्र’ या रूपातून मारक शक्ती प्रक्षेपित होऊन ती कलशातील जलामध्ये आकृष्ट झाली. या मारक शक्तीतून प्रक्षेपित झालेल्या शिवाच्या लयकारी तत्त्वामुळे प्रथम कलशातील जलाशी एकरूप झालेल्या वाईट शक्ती जलापासून विलग झाल्या आणि त्यानंतर त्यांचे सूक्ष्म रूप नष्ट झाले. त्यामुळे विधीपूर्वी कलशात आढळून आलेली पुष्कळ नकारात्मक ऊर्जा विधी चालू झाल्यानंतर पूर्णपणे नष्ट झाली. जलामध्ये वरुणदेवतेचे चैतन्य आणि शिवाची मारक शक्ती यांची स्पंदने कार्यरत झाल्यामुळे विधीनंतर कलशातील जलामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जेची स्पंदने आढळली.’

–  कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२२)

ई. श्री. माधव गाडगीळ आणि सौ. माधुरी गाडगीळ यांनी रौद्री शांतीच्या वेळी तुपामध्ये स्वतःचे तोंडवळे पाहिले. या तुपामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

ई १. ‘श्री. माधव गाडगीळ आणि सौ. माधुरी गाडगीळ यांनी रौद्री शांतीच्या वेळी तुपामध्ये स्वतःचे तोंडवळे पहाणे’ या विशिष्ट कृतीमागील शास्त्र : ‘तुपामध्ये तेजतत्त्वाच्या स्तरावरील चैतन्य कार्यरत असते. श्री. माधव गाडगीळ आणि सौ. माधुरी गाडगीळ यांनी रौद्री शांतीच्या वेळी तुपामध्ये स्वतःचे तोंडवळे पाहिले. तेव्हा त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांतील पृथ्वी, आप आणि तेज या स्तरांवरील त्रासदायक स्पंदने अन् आवरण तुपामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाच्या माध्यमातून तुपामध्ये खेचले गेले. त्याचप्रमाणे तुपामध्ये कार्यरत झालेल्या शिवाच्या तेजोमय चैतन्य लहरींचा प्रवाह श्री. आणि सौ. गाडगीळ यांच्या प्रतिबिंबात कार्यरत झाला. त्याचा चांगला परिणाम श्री. माधव गाडगीळ आणि सौ. माधुरी गाडगीळ यांच्या स्थूल अन् सूक्ष्म देहांवर झाला. त्यामुळे श्री. आणि सौ. गाडगीळ यांच्यावर आध्यात्मिक उपाय होऊन त्यांच्यावर तुपाच्या माध्यमातून कार्यरत झालेल्या शिवाच्या तेजोमय चैतन्यलहरीतील दिव्य तेज कार्यरत झाले. त्यामुळे त्यांना पुढील जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळून त्यांच्या वार्ध्यक्याची प्रक्रिया ५ ते १० टक्के मंदावली. ’

–  कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२२)

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

उ. श्री. माधव गाडगीळ यांचे सुपुत्र सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्री. माधव गाडगीळ यांचे भावपूर्ण पाद्यपूजन केले. या पाद्यपूजनाच्या तीर्थामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

उ १.  सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन आध्यात्मिक उत्तराधिकार्‍यांपैकी एक असलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘रौद्री शांतीच्या’ अंतर्गत श्री. गाडगीळकाकांचे पाद्यपूजन केल्यामुळे सूक्ष्म स्तरावर झालेली प्रक्रिया अन् श्री. गाडगीळकाका यांना आध्यात्मिक स्तरावर झालेले लाभ

‘श्री. माधव गाडगीळकाका हे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे पिता असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन आध्यात्मिक उत्तराधिकार्‍यांपैकी एक असलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे ते सासरे आहेत. या सद्गुरु दांपत्याने श्री. गाडगीळकाकांचे पाद्यपूजन केले. हा दुर्मिळ योग आहे. श्री. माधव गाडगीळकाकांचे पाद्यपूजन केल्यावर सूक्ष्मातून घडलेली प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

उ १ अ. शिवानेच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरूंच्या माध्यमातून श्री. गाडगीळकाकांना उर्वरित आयुष्य ‘निरोगी’ होण्याचे आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून याच जन्मी संतपद प्राप्त करण्याचा शुभाशीर्वाद देणे !

उ १ अ १. श्री. गाडगीळकाकांचे सुपुत्र सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्यांचे पाद्यपूजन केल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर झालेला लाभ : जेव्हा श्री. माधव गाडगीळकाका यांचे पाद्यपूजन सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केले, तेव्हा श्री. गाडगीळकाका यांच्यावरील काळाची प्रतिकूलता, वातावरणातील रज-तम आणि अपमृत्यूयोग यांचे पडलेले सावट त्यांच्या पायाकडे खेचले गेले अन् त्यांच्या पाद्यपूजनामुळे ते त्यांच्या पायातून बाहेर निघून गेले. त्यामुळे श्री. माधव गाडगीळकाका यांच्यावरील मोठे अरिष्ट टळले.

उ १ अ २. श्री. गाडगीळकाकांच्या सूनबाई श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्यांचे पाद्यपूजन केल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर झालेला लाभ : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या श्रीमहालक्ष्मीचा अंशावतार असून त्यांच्यामध्ये श्रीदेवीचे तत्त्व कार्यरत आहे. जेव्हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्री. गाडगीळकाकांचे पाद्यपूजन केले, तेव्हा प्रथम श्री. गाडगीळकाकांची चंद्रनाडी शुद्ध होऊन त्यांच्या देहात आपतत्त्वात्मक चैतन्यलहरी पसरून त्यांच्या देहात काही क्षणांसाठी शीतलता पसरली. त्यानंतर त्यांची सूर्यनाडी शुद्ध होऊन त्यांच्या देहामध्ये तेजोमय दैवी ऊर्जा कार्यरत झाली. त्यामुळे त्यांच्या देहातील विविध इंद्रिये आणि अवयव यांना दैवी बळ मिळून ते सुरळीतपणे कार्यरत झाले. श्री. माधव गाडगीळ यांची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के आहे. त्यामुळे जेव्हा त्यांचे सुपुत्र सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि त्यांच्या सूनबाई श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्यांचे पाद्यपूजन केले, तेव्हा श्री. गाडगीळकाकांची सुषुम्नानाडी कार्यरत झाली. त्यामुळे त्यांना दोन्ही सद्गुरूंकडून प्रक्षेपित झालेले निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य पुष्कळ प्रमाणात ग्रहण करता आले. त्यामुळे त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांभोवती निळसर पांढर्‍या रंगाचे निर्गुण-सगुण स्तरावरील दिव्य चैतन्याचे संरक्षककवच निर्माण झाले. त्यामुळे ‘स्थळ’ म्हणजे ‘विशिष्ट स्थान’ आणि ‘काळ’ म्हणजे ‘अशुभ काळ’ यांच्या माध्यमातून श्री. गाडगीळकाकांवर सूक्ष्मातून होणार्‍या वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांपासून त्यांचे रक्षण झाले अन् पुढेही होणार आहे. अशा प्रकारे पाद्यपूजनामुळे श्री. गाडगीळकाकांना पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक बळ मिळाल्यामुळे त्यांचे उर्वरित आयुष्य सुरक्षित झाले. त्यांच्याकडून उर्वरित आयुष्यात भाव आणि चैतन्य यांच्या स्तरांवर ईश्वरप्राप्तीसाठी साधना होऊन त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणार आहे. तसेच ते याच जन्मात लवकरच संतपद प्राप्त करणार आहेत.

अशा प्रकारे श्री. गाडगीळकाकांचे पाद्यपूजन दोन्ही सद्गुरूंनी केल्यामुळे दोन्ही सद्गुरूंच्या माध्यमातून शिवानेच श्री. गाडगीळ आजोबांना उर्वरित आयुष्य ‘निरोगी’ होण्याचे आणि शीघ्र आध्यात्मिक करून याच जन्मी संतपद प्राप्त करण्याचा शुभाशीर्वाद दिला आहे.’ – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२२)

ऊ. रौद्री शांतीविधीच्या वेळी केलेल्या यागातून निघणार्‍या धुरात सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली. तसेच यागाच्या विभूतीमध्येही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

थोडक्यात रौद्री शांतीविधी केल्याने व्यक्तीला तिचे उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आध्यात्मिक बळ प्राप्त होते. तसेच मृत्यूनंतरही तिच्या लिंगदेहाचे वाईट शक्तींपासून रक्षण होऊन तिचा मृत्यूत्तर प्रवास सुलभ होतो. यातून ‘हिंदु धर्मात सांगितलेल्या शांतीविधीमागे शास्त्र आहे’, हे लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.३.२०२२)

ई-मेल : [email protected]

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक