रशियाचा वेध घेण्यासाठी युक्रेनचा दुर्बिण म्हणून वापर करायचा होता, यासाठी युक्रेनला ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) राष्ट्रांमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिका दबाव टाकत राहिली. रशियाच्या सीमेवरती अमेरिकेला ‘नाटो’च्या माध्यमातून लष्करी तळ उभारायचा होता. अमेरिकन क्षेपणास्त्र राशियाकडे रोखून ठेवायची होती. अर्थात्च हे पुतिन आणि रशिया यांना कधीही मान्य होण्यासारखे नव्हते. त्यासंदर्भात रशियाने त्यांना वेळोवेळी चेतावणीही दिली आहे; पण युक्रेनने त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. त्यांचा ओढा ‘नाटो’ आणि अमेरिका यांच्याकडे वाढत चालला होता. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि मग रशियाने ‘बंदुक आपली, खांदा युक्रेन’चा वापरला आणि उलट अमेरिकेचा वेध घेण्यासाठी चेतावणी देण्यासाठी युक्रेनला संपूर्ण बेचिराख करायला आरंभ केला.
१. युद्धाची अन्य सुप्त कारणे
१ अ. रशियाने तेल आणि नैसर्गिक वायू यांचे भाव वाढवले की, मध्य आशियाई राष्ट्रांतील या उत्पादनांचे भाव वाढणे आणि त्या राष्ट्रांचे अमेरिकेवरील अवलंबित्व न्यून झाल्याने अमेरिकेला ते न रुचणे ! : केवळ युक्रेनचे ‘नाटो’मध्ये सामील होणे, एवढेच या युद्धाचे सूत्र नसून या युद्धात आणखी काही सूत्रे आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तेल आणि नैसर्गिक वायूचे. रशिया हा जगातील दुसर्या क्रमांकाचा तेल आणि वायू उत्पादक आणि निर्यातदार देश. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात अडचण अशी की, तेलाचे भाव वाढले की, रशिया, सौदी अरेबिया आणि इतर मध्य आशियाई राष्ट्रांतील तेलाचे भावही वाढतात आणि त्यामुळे त्यांच्या तिजोरीत भरभरून पैसे वाढतात. हे अमेरिकेला पहावत नाही; कारण तेलाचे भाव अल्प झाले, तर सौदी अरेबिया आणि इतर अरबी राष्ट्रांचे अमेरिकेवरील अवलंबित्व वाढते, तसेच त्यामुळे रशिया अप्रसन्न होतो. मग रशिया त्याच्या वाट्याचे तेल बाजारात आणून भाव स्थिर रहातील, असे बघतो.
१ आ. जर्मनीला नैसर्गिक वायू निर्यात करणार्या वायूवाहिनीमुळे युरोपीय बाजारपेठ रशियाला मिळणार असणे, हे अमेरिकेला खटकणे : त्यातच रशियाने मागील दोन वर्षांमध्ये नैसर्गिक वायू वाहून नेण्यासाठीची वाहिनी थेट जर्मनीच्या दारात नेऊन ठेवली. तो प्रकल्प आता पूर्ण झाला असून त्यामधून आता प्रत्यक्ष वायूची वाहतूक चालू होणार होती, त्यामुळे वाहतूक खर्च अर्ध्याने अल्प होणार आणि संपूर्ण युरोपीय बाजारपेठ रशियाला मिळणार आणि अमेरिकेच्या नाकावर टिच्चून रशियाची तिजोरी भरभरून वहाणार, याखेरीज युरोप रशियाच्या जवळ जाणार, अशी स्थिती निर्माण झाली. हे कुठेतरी अमेरिकेलाही खटकत होते.
१ इ. युक्रेनमध्ये सापडलेले ‘लिथियम’ रशिया आणि अमेरिका या दोघांचे लक्ष्य : युक्रेनमध्ये ‘लिथियम’ या खनिजाचा प्रचंड प्रमाणात साठा सापडलेला असून, लिथियमचा उपयोग हा मोबाईलची बॅटरी, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिकल कार यांच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या खनिजावरती एकीकडे अमेरिका आणि युरोपला त्यांचे वर्चस्व निर्माण करायचे आहे, तर दुसरीकडे रशियाही लिथियमवर डोळा ठेवून आहे.
१ ई. रशियाच्या विघटनानंतर अमेरिका महासत्ता होणे आणि हे रशियाला खटकत असणे अन् पुन्हा प्रभावी रशियाची निर्मिती करण्याची अपेक्षा असणे : आणखी एक कारण म्हणजे दुसर्या महायुद्धानंतर जगाची वाटणी अमेरिका आणि रशिया अशा दोन महासत्तांमध्ये झाली. मग चालू झाला शीतयुद्धाचा कालावधी; परंतु वर्ष १९९० मध्ये रशियाच्या झालेल्या विघटनानंतर शीतयुद्ध जवळपास संपल्यातच जमा झाले होते. त्यातच रशियाच्या विघटनामुळे महासत्तापदाचा राजमुकुट आपोआपच अमेरिकेच्या डोक्यावरती बसला. हे कुठेतरी रशियाचे नागरिक आणि पुतिन यांना खटकत होते. पुन्हा एकदा एका सामर्थ्यशाली आणि प्रभावशाली रशियाची निर्मिती करावी, हे त्यांच्या मनाने घेतले होते अन् जगाला ते दाखवण्यासाठी अशा एका युद्धाची रशियाला आवश्यकता होतीच. असे सगळे वेगवेगळे कंगोरे रशिया-युक्रेन युद्धाला आहेत.
२. युद्धाची पूर्वसिद्धता
२ अ. युद्धाचे आर्थिक दुष्परिणाम लक्षात घेऊन रशियाने त्याची गंगाजळी पूर्वीच भरून ठेवलेली असणे : रशियाचे अध्यक्ष पुतिन हे पूर्वाश्रमीचे रशियाची गुप्तचर संस्था ‘केजीबी’चे प्रमुख होते. त्यामुळे कुठल्याही घटनेची आखणी करतांना त्याची पूर्वसिद्धता, प्रत्यक्ष घटनाकाल आणि त्यानंतर त्या घटनेचे होणारे संभाव्य परिणाम या सगळ्यांचा विचार करूनच पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केलेले आहे. त्याच्यावरचे आर्थिक निर्बंध लादले जातील, याचा विचार करूनच पुतिन यांनी परकीय गंगाजळी ६३५ अब्ज डॉलरवरती जमा करून ठेवली आहे. त्यामुळे पुढील वर्ष-दोन वर्ष तरी आर्थिक निर्बंधाची झळ रशियाला पोचणार नाही.
२ आ. रशियाने युद्धसामुग्रीचे उत्पादन वाढवून विपुल साठा करून ठेवलेला असणे : गेल्या दोन वर्षांपासून रशियाने त्यांच्या युद्धसामुग्रीचे, बाँब, क्षेपणास्त्रे, बाँबर विमाने, रॉकेट लाँचर त्यांचे उत्पादन जवळपास तीन-चार पटींनी वाढवून विपुल प्रमाणात त्यांचा साठा करून ठेवला आहे.
३. रशियालाही युद्ध परवडणारे नसणे
रशियाच्या लष्करी योजनेप्रमाणे ‘पहिल्या तीन-चार दिवसांत जोरदार आक्रमण करून युक्रेनला जायबंदी करून शरण यायला लावावे’, असे ठरले होते. त्याप्रमाणे पहिले दोन-तीन दिवस रशिया यशस्वीही झाला; पण चौथ्या दिवसापासून युक्रेन युरोपियन देशांकडून मिळालेल्या शस्त्राने प्रतिकार करू लागला, तसेच युक्रेनच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार प्रतिकार करायला आरंभ केला. त्यामुळे युद्धाचा कालावधी आता २२ दिवसांच्या पुढे गेला आहे. हे रशियालाही परवडण्यासारखे नाही; कारण प्रतिदिन युद्धाचा खर्च हा साधारण एक ते सव्वा लाख कोटी डॉलरच्या घरामध्ये आहे. त्यासमवेतच ५० टक्क्यांपेक्षा अधिक अंकानी कोसळलेला रशियाचा शेअर बाजार, रशियन चलन ‘रुबल’चा घसरलेला भाव, सोबत २० टक्क्यांनी वाढलेले व्याजदर आणि देशांतर्गत चाललेली युद्धविरोधी प्रदर्शने यांमुळे कुठेतरी पुतिन यांच्यावरही युद्ध लवकरात लवकर निकालात काढण्याचा दबाव आहे.
४. एकीकडे ग्रहांवर मानवी वस्तीसाठी संशोधन करणे आणि दुसरीकडे पृथ्वीवरील माणसांना मारणे हा विरोधाभासच !
एकीकडे जगभरातील शास्त्रज्ञ सूर्यमालेतील इतर ग्रह मंगळ, चंद्र यांसारख्या ग्रहांवर तेथे मानवी वस्ती शक्य आहे का ? यासाठी वेगवेगळी याने या ग्रहांवर पाठवून कोट्यवधी डॉलर व्यय करून पुष्कळ मोठे संशोधन करत आहेत, तर दुसरीकडे या ‘पृथ्वीवरील माणसे नष्ट कशी होतील’, यासाठी पुष्कळ मोठमोठ्या शस्त्रांची, अण्वस्त्राची निर्मिती जगभरातील राष्ट्रांनी करून ठेवली आहे ! हा मानवी जीवनातील एक मोठा विरोधाभासच आहे !
५. एक-दोन लोकांच्या हातात कोट्यवधींचे जीवन-मरण असावे का ?
आज जगभरातील तत्त्ववेत्ते विचारवंत यांच्यासमोर प्रश्न असा आहे की, पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांचे जीवन-मरण एक-दोन व्यक्तींच्या हातात असावे का ? कधी रोमन सम्राट ज्युलियस सीझरच्या तलवारीने धरणी लाल झाली, तर कधी सिकंदरच्या अफाट सैन्याच्या घोडदौडीने धरणी हादरली, कधी सगळ्या युरोपचे रणांगण करणार्या नेपोलियनच्या तोफांनी धरणी कापली, तर कधी मानवतेला कलंकित करणार्या जर्मनीच्या हिटलरच्या बाँबर विमानाने धरणी दुभंगली आणि शेवटी दुसर्या महायुद्धामध्ये हिरोशिमा अन् नागासाकी यांवर टाकलेल्या बॉंबने धरणीकंप झाला आणि आज युक्रेन युद्धाचे महायुद्धात रूपांतर होण्याच्या भयाण धरणीकंपात आहे. सहस्रो वर्षांत माणूस खरोखरच सुधारला आहे का ? आज या युद्धामुळे जगभरामध्ये पुन्हा शस्त्रास्त्र स्पर्धा चालू होणार का ? मानवी जीवन हे बंदुकीच्या टोकावरतीच रहाणार का ?
६. पृथ्वीवरून आपल्या प्रजातीला नष्ट करण्यासाठी उतावीळ प्राणी म्हणजे माणूस !
दूरदर्शनवरील ‘महाभारत’ या मालिकेत एक पुढील संवाद दाखवला होता. श्रीकृष्ण एका प्रसंगात भिष्मांना म्हणतात, ‘‘आम्ही मानवाची निर्मिती केली. त्याला मन, बुद्धी आणि इच्छाशक्ती देऊन सामर्थ्यसंपन्न बनवले. मानवी इतिहास घडवण्याचे काम आम्ही त्याच्यावर सोपवले.’’ खरोखरच मानवाने त्याचे दायित्व योग्य प्रकारे निभावले का ? कारण या पृथ्वीवरती मानव हाच एक असा प्राणी आहे, जो आपल्याच प्रजातीला, या सृष्टीवरून नष्ट करण्यासाठी उतावीळ झाला आहे. या सृष्टीवरील कोट्यवधी जिवांचे जगणे सुरक्षित होणार का ? हा सगळ्या जगासमोर मोठा प्रश्नच आहे.
७. महायुद्धाचे ढग !
आज जगभरातील विचारवंत तत्त्वज्ञ आणि कोट्यवधी नागरिकांसमोर पुढील प्रश्न आहेत – या युद्धाची परिणती महायुद्धात होणार का ?, अण्वस्त्रांचा वापर होऊन या पृथ्वीवरील मानवी जीवन पुन्हा उद्ध्वस्त आणि बेचिराख होणार का ?, मानवी इतिहासामध्ये पुन्हा एका महायुद्धाची नोंद होणार का ? जगाचा भूगोल पुन्हा पालटणार का ? ज्या वैश्विक शक्तीने या विश्वाची निर्मिती केली आहे, नक्की त्याच्या मनामध्ये काय आहे, हे येणारा काळच ठरवेल; पण आमच्या खानदेशातील बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या एका कवितेमध्ये विचारलेले प्रश्न हा पुन्हा तसाच शेष रहातो. ‘अरे माणसा माणसा कधी होशील माणूस ?’ याचे कारण युद्धामध्ये कुणीही जिंकले वा हरले, तरी माणुसकी, माणसाची सद्सद्विवेकबुद्धी मात्र पराभूतच होत असते ! अर्थात् भारतीय धर्मशास्त्रानुसार अधर्म वाढला की देव अवतार घेतो आणि धर्म-अधर्म युद्ध होऊन अधर्माचा पराभव होतो.
८. उद्ध्वस्त नगरे आणि निर्वासित प्रश्न
खरकीव, लुहान्स, मारियोपोल, चेर्नोबिल, खेरसन, चेरनिहिव आदी महत्त्वाची औद्योगिक आणि आर्थिक शहरे, संपूर्णपणे बेचिराख झाली असून त्यांची वाताहत झाली आहे. सर्वत्र पडझड झालेल्या इमारती, ओसाड पडलेले रस्ते आणि गावे आहेत. शहरभर आगीचे लोळ उठत असून त्यासमवेत राजधानी कीवही अर्धीअधिक उद्ध्वस्त झाली आहे. आता युक्रेनमधील निपर नदीतून पाण्याऐवजी मानवी रक्ताचे पाट वहात आहेत. लाखो नागरिकांना निर्वासिताचा शिक्का मारून आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये मानहानीकारक प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे लाखो निर्वासितांचा पुष्कळ मोठा प्रश्न जगासमोर उभा रहाणार आहे. त्यासमवेत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दराने १३० डॉलरचा आकडा पार केल्याने जगभरातच मोठ्या महागाईची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच कोरोनामुळे गेली दोन वर्षे सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांच्या गळ्याला फास लागला असतांना आता मोठ्या निर्वासितांच्या आणि वाढणार्या महागाईचा प्रश्न सोडवतांना तो फास अधिकच आवळला जाईल.
९. युद्ध थांबवण्यासाठीचे उपाय !
सध्यातरी हे युद्ध थांबवण्याच्या दोनच शक्यता दिसत आहेत, एक म्हणजे रशियामध्ये पुतिन यांना रोखले जाणे आणि दुसरा म्हणजे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी त्यांचे हात बांधून घेणे. रशियासमोर शरणागती पत्करणे आणि यापुढे आपण नाटोमध्ये सामील होणार नाही. या आश्वासनावरती हे युद्ध थांबवले जाऊ शकते. पहिल्याची शक्यता पुष्कळ अल्प आहे; पण युक्रेनच्या नागरिकांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षांवर दबाव आणावा आणि जगभरातील सामर्थ्यशाली नेत्यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि भारत यांनी केवळ शब्दांचे बुडबुडे न सोडता, प्रत्यक्ष रणभूमीवर जाऊन दोन्ही देशांना ‘सिझ फायर’ (शस्त्रसंधी) करायला लावून दोन्ही देशांमध्ये संवाद साधला, तरच हे युद्ध थांबू शकते. असे झाले तर निदान उरलेले युक्रेनचे राष्ट्र तरी ते वाचवू शकतात; कारण आता भुईसपाट झालेल्या युक्रेनला पुन्हा उभे करण्यासाठी पुढे न्यूनतम २५ ते ३० वर्र्षांचा कालावधी लागेल. अहंकारापायी संपूर्ण देश बेचिराख करण्यापेक्षा उरलेले राष्ट्र वाचवणे अधिक शहाणपणाचे ठरेल. नाहीतर उद्ध्वस्त, बेचिराख आणि ओसाड झालेल्या युक्रेनमध्ये ‘गिधाडं येतील खायला, वटवाघळे येतील रहायला’, अशी परिस्थिती होऊन जाईल !
– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे पूर्व.