अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२० मार्च २०२२) या दिवशी पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

उद्या फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२० मार्च २०२२) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पाहूया. १८ मार्च २०२२ या दिवशीच्या अंकात पू. पात्रीकर यांचा जन्म ते शिक्षणापर्यंतचा जीवनप्रवास पाहिला. आज पुढील भाग पाहू.

 

पू. अशोक पात्रीकर आणि सौ. शुभांगी पात्रीकर

पू. अशोक पात्रीकर यांच्या चरणी त्यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘पू. अशोक पात्रीकर यांनी कोणताही संकोच न बाळगता ‘त्यांचे साधनेत येण्यापूर्वीचे जीवन कसे होते’, हे या लेखात दिले आहे. तेव्हा त्यांची असलेली नकारात्मक वैशिष्ट्ये वाचून ‘अशी व्यक्ती पुढे ‘संत’ होऊ शकते’, हे कुणाला खरे वाटणार नाही; पण त्यांनी ते खरे करून दाखवले आहे. असा आदर्श सर्वांपुढे ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे, तेवढे थोडे ! त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये या लेखमालेतून प्रकाशित होणार आहेत. त्यांचा सर्वांना लाभ घेता येईल !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.२.२०२२)

३. वय २० ते ४६ वर्षे

३ अ. नोकरी

३ अ १. नागपूरजवळ असलेल्या पेंच (नदीचे नाव) प्रकल्पाच्या ठिकाणी नोकरी करणे आणि ते ठिकाण घरापासून लांब असल्याने वडिलांनी अमरावतीजवळ नोकरीला लावण्यासाठी प्रयत्न करणे : ‘पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर मी नोकरीसाठी प्रयत्न चालू केले. वडील मला नोकरीसाठी विविध ठिकाणी अर्ज करायला लावायचे. त्या काळात अभियंत्याची नोकरी मिळणे फारसे कठीण नव्हते; पण ती मला मिळत नव्हती; म्हणून काही दिवस मी एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी केली. नंतर मी नागपूरजवळ असलेल्या पेंच प्रकल्पाच्या ठिकाणी ८ मास ‘तांत्रिक साहाय्यक’ या पदावर नोकरी केली. नोकरीचे ठिकाण घरापासून लांब असल्याने वडिलांचे मला अमरावतीजवळ नोकरीला लावण्याचे प्रयत्न चालू होते. मला एका ठिकाणच्या नोकरीसाठी मुलाखतीचे पत्र टपालाने (पोस्टाने) अमरावतीच्या पत्त्यावर आले. ‘त्या मुलाखतीसाठी मला कार्यालयाकडून सुटी मिळावी’, यासाठी वडिलांनी मला ‘आईची प्रकृती गंभीर आहे. लवकर ये’, अशी तार पाठवली. त्या पूर्वी त्यांनी मला पत्र पाठवले होते, ‘मी तुला आईच्या प्रकृतीविषयी तार करत आहे. त्यामुळे तुला सुटी मिळेल.’ माझे नोकरीचे ठिकाण शहरापासून लांब एका खेड्यात असल्याने ते पत्र मिळण्यापूर्वी मला तार मिळाली. त्यामुळे मी घाबरून धावत अमरावतीला गेलो आणि तिथे गेल्यावर सर्व खुलासा झाला.

३ अ २. पेंच प्रकल्पाच्या ठिकाणाहून नदीतून तराफ्यावरून परततांना तराफा उलटल्याने नदीत पडणे आणि देवाच्या कृपेने नावाड्याने बाहेर काढणे : पेंच प्रकल्पाच्या ठिकाणी प्रकल्पावर जायला पेंच नदी ओलांडावी लागायची. पावसाळ्यात नदीला पूर असतांना दोन रिकामी पिंपे जोडून केलेला तराफा वापरला जायचा. एकदा कामावरून परत निघतांना काही कर्मचारी घाईत आले आणि गर्दी करत आम्ही बसलेल्या तराफ्यावर चढले. त्यामुळे तराफा उलटला आणि बसलेले आम्ही सर्व कर्मचारी नदीत पडलो. मला पोहता येत नसल्याने मी पाण्यात एक डुबकी मारली. तेवढ्यात नावाड्याने मला बाहेर काढले. ही देवाचीच कृपा !

३ अ ३. ‘जीवन प्राधिकरण’ विभागाच्या अकोला कार्यालयात पर्यवेक्षक पदावर नोकरी मिळाल्याचे पत्र मिळणे; परंतु अधिकार्‍याच्या चुकीमुळे ती नाकारली जाणे आणि त्या अधिकार्‍याची भेट घेतल्यावर परत अमरावती कार्यालयात नेमणूक होणे : नंतर मला ‘जीवन प्राधिकरण’ या विभागाच्या अकोला कार्यालयात पर्यवेक्षक (ओव्हरसीअर) पदावर नोकरी मिळाल्याचे पत्र मिळाले. मी त्या पत्राप्रमाणे अकोला येथे गेल्यावर मला कळले की, मी वेळेत न आल्याने माझी नेमणूक रहित केली आहे. मी वेळेपूर्वी पोचलो होतो, तरी एका अधिकार्‍याच्या चुकीमुळे त्यांनी मला नाकारले. त्यानंतर शोध घेत वडिलांच्या समवेत जाऊन मी त्या अधिकार्‍यांची भेट घेतली आणि नंतर त्यांनी माझी नेमणूक अमरावती येथील कार्यालयात केली. काही दिवसांनी माझ्या पदाचे नाव ‘शाखा अभियंता’, असे झाले. नोकरीच्या काळात अमरावतीव्यतिरिक्त मोर्शी (जिल्हा अमरावती), अकोला, खामगाव (जिल्हा बुलढाणा) आणि यवतमाळ या ठिकाणी माझे स्थानांतर झाले.

३ अ ४. मूळव्याधीचा त्रास चालू झाल्याने तिखट पदार्थ खाणे न्यून होणे : नोकरीत असेपर्यंत मला पुष्कळ तिखट पदार्थ आवडायचे; पण त्याचा परिणाम म्हणून मला मूळव्याधीचा त्रास चालू झाला. वर्ष २००४ मध्ये माझे मूळव्याधीचे शस्त्रकर्म करावे लागले. त्यानंतर मी तिखट पदार्थ खाणे न्यून केले.

३ अ ५. सहलीला जायची पुष्कळ आवड असणे आणि अष्टविनायक, ज्योतिर्लिंग, अशा देवतांचे दर्शन होऊनही अध्यात्माचे ज्ञान नसल्याने दर्शनापेक्षा सहलीला जाण्याचा आनंद घेणे : नोकरीत असतांना मला सहलीला जायची पुष्कळ आवड होती. कार्यालयातील सहकार्‍यांच्या समवेत आणि विवाह झाल्यावर कुटुंबाच्या समवेत प्रत्येक वर्षी मी कुठेतरी दूर सहलीला जात असे. त्या सहलीत अष्टविनायक, ज्योतिर्लिंग, अशा देवतांचे दर्शनही होत असे; पण अध्यात्माचे काहीच ज्ञान नसल्याने दर्शनापेक्षा ‘सहलीला गेलो’, यातच मी आनंद मानत होतो.

नोकरी लागल्यावर सहकार्‍यांकडे असलेली दुचाकी वाहने मी चालवत असे. वर्ष १९७४ मध्ये वडिलांनी मला काही पैसे दिले आणि वापरलेली (second hand) दुचाकी घ्यायला लावली. त्या दुचाकी वाहनावर आणि अन्य दोन मित्रांच्या दुचाकी वाहनांवर मी आणि माझे ५ मित्र पचमढी (मध्यप्रदेश) येथे सहलीला गेलो होतो.

३ अ ६. एक घर सनातन संस्थेला सेवाकेंद्र म्हणून देण्याचे पुण्यकर्म गुरुकृपेने घडणे : या जन्मीच देवाण-घेवाण हिशोब पूर्ण व्हावा; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझ्याकडून अमरावती येथील एक घर सनातन संस्थेला सेवाकेंद्र म्हणून देण्याचे पुण्यकर्म घडले. त्यामुळे ‘माझ्या आध्यात्मिक प्रगतीतील मोठा अडथळा दूर झाला’, असे मला जाणवले. गुरूंनी केलेल्या या कृपेसाठी मी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

३ अ ७.‘देवाने, म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टरांनी मला व्यसनापासून दूर ठेवले’, हे आता कळते.

३ अ ८. नोकरी करतांना मी मन लावून केलेल्या कामांसाठी माझ्या अधिकार्‍यांच्या प्रशस्तीपत्राप्रमाणे मला दोन वेळा आगाऊ वेतनवाढ मिळाली.

३ आ. वैवाहिक जीवन

३ आ १. पत्नीचा कर्मकांडाकडे पुष्कळ ओढा असणे आणि तिच्यामुळे अष्टविनायक अन् तिरुपति बालाजी यांचे दर्शन होणे : डिसेंबर १९७६ मध्ये माझा विवाह झाला. माझी पत्नी सौ. शुभांगी हिचा कर्मकांडाकडे पुष्कळ ओढा होता. तिच्या घरी महालक्ष्मीपूजन आणि अनेक सण साजरे केले जायचे. त्या तुलनेत आमच्या घरी सण-वार नसल्याने तिला आश्चर्य वाटायचे. तिच्यामुळेच मला अष्टविनायक आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठ ज्योतिर्लिंगे, तसेच तिरुपति बालाजी यांचे दर्शन झाले.

३ आ २. पुत्रप्राप्तीसाठी नारायण-नागबळी हा विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे जाणे आणि ‘तेथे पोचतांना आलेले अडथळे आध्यात्मिक कारणांमुळे होते’, हे साधनेत आल्यावर कळणे : आम्हाला दोन मुली (६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत विशारद (सुश्री.(कु.) तेजल पात्रीकर आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनघा जोशी) होत्या आणि ‘मुलगा व्हावा’, अशी पत्नीची इच्छा होती. त्यामुळे आम्ही खामगाव येथे असतांना तिने स्वामी समर्थ यांच्या संप्रदायानुसार साधनेला आरंभ केला. पत्नीच्या आग्रहानुसार मी स्वामी समर्थ संप्रदायानुसार थोडी थोडी साधना करायला लागलो. त्या वेळी ‘कामनापूर्तीसाठी नारायण-नागबळी करायला हवा’, असे तिला समजले. त्याविषयी तिने मला सांगितले आणि आम्ही तो विधी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन करून आलो. त्र्यंबकेश्वर येथे हा विधी करायला जातांना पुष्कळ अडथळे आले. नाशिकला दूर पल्ल्याच्या गाडीने (रेल्वेने) रात्री उशिरा पोचलो. पुढे जायला बस नव्हती. दुसर्‍या दिवशी सकाळी विधी असल्याने तेथे रात्रीच पोचणे आवश्यक होते; म्हणून आम्ही ऑटोरिक्शा करून गेलो. उत्तररात्री भर पावसात समोरचे दिसत नसतांना रिक्शाचालकाने आम्हाला त्र्यंबकेश्वरला पोचवले. त्यामुळे नंतरच्या ३ दिवसांचे विधी सुलभपणे झाले. ‘हे अडथळे आध्यात्मिक कारणांमुळे आले होते’, हे आता माझ्या लक्षात येते.

३ आ ३. विधी पूर्ण झाल्यावर पत्नीने शिवशंकराच्या देवळाच्या कळसाकडे पाहून पुत्र होण्याची इच्छा बोलून दाखवणे आणि त्यानंतर मुलाचा जन्म होणे : तिथे तिसर्‍या दिवशी विधी पूर्ण झाल्यावर शिवशंकराच्या देवळात दर्शनासाठी जावे लागते. ‘शिवशंकराच्या देवळाच्या कळसाकडे पाहून मनातील इच्छा बोलून दाखवा. ती पूर्ण होते’, असे पुरोहितांनी सांगितल्यावर पत्नीने पुत्र होण्याची इच्छा बोलून दाखवली. मी मात्र काहीच मागितले नाही. त्यानंतर माझे स्थानांतर यवतमाळ येथे झाले. निखिलचा (मुलाचा) जन्म आम्ही यवतमाळ येथे असतांना झाला. त्यामुळे माझा अध्यात्मावरील विश्वास वाढत गेला.

३ आ ४. मुलगा ५ वर्षांचा होण्यापूर्वी त्याच्यासह त्र्यंबकेश्वरला जाऊन पुन्हा नारायण-नागबळी विधी करणे : ‘कामनापूर्ती झाल्यावर ५ वर्षांच्या काळात पुन्हा एकदा नारायण-नागबळी विधी करावा लागतो’, असे आम्हाला पहिल्या वेळीच पुरोहितांनी सांगितले होते. त्यानुसार निखिल ५ वर्षांचा होण्यापूर्वी आम्ही पुन्हा निखिलसह त्र्यंबकेश्वरला जाऊन तो विधी केला.

३ आ ५. अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेणे आणि स्वामींनीच सनातनच्या माध्यमातून साधना करण्याची प्रेरणा दिल्याचे लक्षात येणे : त्यानंतर कुटुंबासह सहलीला गेलो असतांना स्वामी समर्थांचे स्थान असलेल्या अक्कलकोट येथे जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि तेथील महाप्रसाद घेतला. ‘आम्हाला सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करण्याची प्रेरणा स्वामी समर्थांनीच दिली’, हे माझ्या नंतर लक्षात आले.’

३ इ. घरात सापाची लहान लहान पिल्ले निघणे, ज्योतिषाने वारूळाची पूजा करण्यास सांगितल्यावर पिल्ले निघणे आपोआप बंद होणे आणि तो पूर्वजांचा त्रास असल्याचे साधनेत आल्यावर लक्षात येणे : ‘साधनेत येण्यापूर्वी आम्ही यवतमाळ येथे भाड्याच्या घरात रहात होतो. तेथे नेहमी सापाची लहान लहान पिल्ले निघायची. आधी मी त्यांना मारायचो; पण पत्नीने एका ज्योतिषाला विचारल्यावर त्याने नागपंचमीला वारूळाची पूजा करायला सांगितली. तसे केल्यावर सापाची पिल्ले निघणे आपोआप बंद झाले. त्यानंतर आम्हाला पूर्वजांच्या त्रासाची लक्षणे जाणवली नाहीत. त्यामागील कार्यकारणभाव मला त्या वेळी कळत नव्हता. ‘तो कदाचित् पूर्वजांचा त्रास असेल’, हे आता साधनेत आल्यावर कळते.

३ ई. काही छंद

३ ई १. विनोदी दिवाळी अंक वाचायला आणि विनोदी चित्रपट पहायला आवडणे : आधीपासूनच मला दुःख असलेल्या कथा-कादंबर्‍या वाचायची आवड नव्हती. मी चित्रपट न पहाण्याचे हेही एक कारण होते. मला विनोदी साहित्य (कथा-कादंबर्‍या) वाचायची आवड होती आणि आताही काही प्रमाणात आहे. दिवाळी अंकांपैकी मी केवळ विनोदी दिवाळी अंक घेऊन वाचत असे आणि काही विनोदी चित्रपट पहात असे. ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषामुळे मला कुणाचेही दुःख अजूनही ऐकवत नाही आणि पहावतही नाही.

३ ई २. भजने आणि चित्रपट गीते म्हणायला अन् नाट्यगीते ऐकायला आवडणे : लहानपणी मला भजने म्हणायला आवडायचे; पण नंतर नोकरीतील व्यस्ततेमुळे माझे त्या छंदाकडे दुर्लक्ष झाले. नोकरीत माझ्या एका मित्राने त्याचा ग्रामोफोन आणि तबकड्या माझ्या अमरावतीच्या घरी ठेवल्या होत्या. तबकड्यांमध्ये नाट्यगीतांच्या काही तबकड्या होत्या. त्या मी कधी कधी ऐकायचो. त्यामुळे मला नाट्यपदे ऐकणे आवडू लागले. त्या काळात काही संगीत नाटके यायची. तीही मी पहात असे. मी चित्रपट पहात नसलो, तरी चित्रपटातील गाणी गुणगुणायला मला आजही आवडते. माझ्या वडिलांच्या काळातील के.एल्. सेहेगल या गायकाची गाणी वडिलांना आवडायची. नंतर त्यांची गीते मलाही आवडू लागली. त्यांच्या गाण्यांची एक ध्वनीफीत मी संग्रही ठेवली होती.

(क्रमश:)

– (पू.) अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०२१)

या लेखाचा मागील भाग पुढील लिंक वर पहा : https://sanatanprabhat.org/marathi/562357.html