(म्हणे) ‘भारताने रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतले, तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील !’

अमेरिकेची भारताला अप्रत्यक्ष धमकी

अमेरिकेच्या अशा धमक्यांना भारताने भीक घालू नये. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही देशाच्या अंतर्गत समस्येत हस्तक्षेप करून तेथील परिस्थिती बिघडवते. स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करणार्‍या अमेरिकेने ‘भारताने काय करावे आणि काय करू नये’, हे सांगण्याची आवश्यकता नाही ! – संपादक

‘व्हाईट हाऊस’च्या प्रसिद्धी सचिव जेन साकी

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताला स्वस्तात कच्चे तेल उपलब्ध करून देण्याचा  प्रस्ताव रशियाने भारतासमोर ठेवला आहे. त्यावर अमेरिकेने ‘भारताने रशियाकडून तेल विकत घेतल्यास अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांचे उल्लंघन होणार नाही; मात्र भारताने असे पाऊल उचलल्यास ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही चुकीच्या बाजूने होती’, अशी इतिहासात नोंद होईल. रशिया किंवा रशियन नेतृत्व यांचे समर्थन म्हणजे नक्कीच आक्रमणाचे समर्थन आहे ज्याचे परिणाम विनाशकारी आसतील’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्‍या ‘व्हाईट हाऊस’च्या प्रसिद्धी सचिव जेन साकी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना वरील विधान केले.

भारत रशियाचा प्रस्ताव स्वीकारून तेल विकत घेतले, तर महगाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता  

१. अमेरिका आणि युरोपमधील अनेक देश यांनी रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करणे बंद केले आहे. रशियावर अनेक नवे निर्बंध लावले आहेत. यामुळे रशियाची मोठी आर्थिक हानी होत आहे. हे पहाता रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल, तसेच इतर गोष्टी उपलब्ध करून देण्यासंबंधी सांगितले आहे.

२. भारताने अद्याप या प्रस्तावावर कोणतेही उत्तर दिलेले नाही; पण भारत हा प्रस्ताव स्वीकारणार असल्याची चर्चा चालू आहे. जर भारताने हा प्रस्ताव स्वीकारला, तर महागाईपासून मोठा दिलासा मिळू शकतो.

३. सध्या कच्च्या तेलाचे मूल्य अधिक असल्याने पेट्रोल आणि डिझेलच नाही, तर इतर गोष्टींचे मूल्यही वेगाने वाढत आहे. जर भारताला तेल स्वस्त मिळाले, तर इतर गोष्टीही स्वस्त होतील.

४. भारताने हा प्रस्ताव स्वीकारल्यास त्याचे तोटेही आहेत. अमेरिकेसह जगातील इतर देशांनी रशियावर निर्बंध लावले असून त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली असतांना भारताने हा प्रस्ताव स्वीकारल्यास या देशांसमवेत भविष्यात व्यापार करणे आणि  संबंध ठेवणे भारताला फार कठीण पडू शकते.