(म्हणे) ‘ख्रिस्ती संस्थांनीच सामाजिक न्याय दिला आणि प्रत्येकासाठी शिक्षण उपलब्ध करून दिले ! ’ – एम्. अप्पावू, विधानसभा अध्यक्ष, तमिळनाडू

  • ख्रिस्ती संस्थांनी हिंदूंचे धर्मांतर करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षणाच्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांचे वैचारिक धर्मांतर केले. अशांचे तमिळनाडूच्या विधानसभा अध्यक्षांनी उदात्तीकरण करणे, ही त्यांची वैचारिक दिवाळखोरी होय ! – संपादक
  • तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्यामुळे तेथे धर्मांध ख्रिस्त्यांचे अशा प्रकारे सरकारी पातळीवर उदात्तीकरण झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक
तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम्. अप्पावू

चेन्नई – सत्ताधारी द्रमुकचे (द्रविड मुन्नेत्र कळघम्चे म्हणजे द्रविड प्रगती संघाचे) आमदार आणि तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम्. अप्पावू हे तिरूनेलवेली येथील पल्यामकोट्टई येथील सेंट झेवियर महाविद्यालयात एका पुरस्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले, ‘‘ख्रिस्ती संस्थांनीच समाजाला द्रविड विचारसरणी शिकवली, सामाजिक न्याय दिला आणि प्रत्येकासाठी शिक्षण उपलब्ध करून दिले.’’ द्रमुक सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत, द्रमुकमधील अनेक जणांनी, ‘पक्षाला सत्तेवर आणण्यात ख्रिस्ती समुदायाचे योगदान दिले’, असे वारंवार वक्तव्य केले आहे. अप्पावू यांनी केलेले विधान हे ख्रिस्त्यांच्या लांगूलचालनासाठी केल्याचे बोलले जात आहे.

द्रमुककडून ख्रिस्त्यांचे वारंवार लांगूलचालन !

काही दिवसांपूर्वी ‘चर्च ऑफ साउथ इंडिया’च्या स्थापनादिनाच्या समारंभात, राज्याचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन म्हणाले होते, ‘हे सरकार तुमच्यामुळे (ख्रिस्त्यांमुळे) स्थापन झाले.’ काही दिवसांपूर्वी एजी चर्चने आयोजित कार्यक्रमात दुग्धविकासमंत्री एस्.एम्.नासार यांनी ‘ख्रिस्ती समुदायाच्या प्रार्थनेच्या शक्तीमुळे द्रमुक सत्तेवर आला’, असे विधान केले होते.