|
मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – ११ मार्च या दिवशी प्रदर्शित झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, तसेच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ नये, यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. भिवंडी येथे चित्रपटगृहात हा चित्रपट बंद का पाडण्यात आला ? त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी १५ मार्च या दिवशी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली.
या वेळी राम कदम यांच्या विधानाला समर्थन देत भाजपच्या आमदारांनी हा चित्रपट करमुक्त करण्याची एकमुखी मागणी केली; मात्र यावर सरकारने कोणतेही निवेदन केले नाही. हा चित्रपट करमुक्त करण्याविषयी सरकारची उदासीनता दिसून आली. राम कदम आणि भाजपचे आमदार अन् अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी ‘महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त केलाच पाहिजे’, अशा आशयाचे फलक घेऊन अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन घोषणा दिल्या.
‘द कश्मीर फाइल्स’ पहायला जाऊ ने, यासाठी षड्यंत्र रचले जात आहे ! – राम कदम, आमदार, भाजप
राम कदम म्हणाले, ‘‘मुंबई शहरातील ‘मेट्रो’ चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाइल्स’ पहाण्यासाठी चित्रपटगृहात लोक नसतांनाही चित्रपटगृहाबाहेर ‘हाऊस फुल’चे (‘चित्रपटगृहात जागा नाही’, याचे) फलक लावण्यात येत आहेत. हा चित्रपट कुणीही पाहू नये, यासाठी असे षड्यंत्र रचले जात आहे. यापूर्वी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी हा चित्रपट करमुक्त करण्याविषयी मागणी केली असतांनाही सरकारने हा चित्रपट करमुक्त का केला नाही ? हिंदु लोकांच्या भावनांचा विचार करून सरकारने हा चित्रपट करमुक्त करावा, अशी जोरदार मागणीही कदम यांनी केली.
काश्मीरमध्ये हिंदूंचे शिरकाण केल्याचा सत्य इतिहास दाखवायचा नाही का ? – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त केलाच पाहिजे, कारण या चित्रपटात हिंदूंचे शिरकाण कशा पद्धतीने केले, ते दाखवले आहे. हा सत्य इतिहास आहे. यावर सत्ताधार्यांचे दुमत आहे का ? या चित्रपटात वस्तूस्थिती मांडणारा इतिहास दाखवण्यात आला आहे. हा इतिहास शिकवायचा नाही का ? त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही.’’
… आणि घोषणांनी सभागृह दणाणले !
या वेळी सत्ताधारी पक्षांतील काही आमदारांनी ‘पावनखिंड’ आणि ‘झुंड’ हे चित्रपटही करमुक्त करावेत, अशी मागणी केली, तर भाजपचे आमदार ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्यासाठी घोषणा देत होते. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘वन्दे मातरम्’, अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले.