संतांच्या वंदनीय उपस्थितीत आणि धर्मप्रेमींच्या सहभागाने हिंदु राष्ट्र स्थापनेचा जयघोष !
मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – संतांच्या वंदनीय उपस्थितीत आणि धर्मप्रेमींच्या उत्साहपूर्ण सहभागाने ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’ आदी स्फूर्तीदायक जयघोषात मुंबई येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनाला १२ मार्च या दिवशी प्रारंभ झाला. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हे २ दिवसांचे अधिवेशन मुंलुंड येथील पद्मावती बँक्वेट हॉल येथे पार पडत आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय वारकरी परिषदेचे पालघर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रदीप महाराज पाटील, वसई (मेधे) येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला आणि महाराष्ट्र प्रदेश वारकरी संप्रदायाच्या तीर्थक्षेत्र समितीचे कार्यकारी प्रमुख ह.भ.प. सुभाष गोविंदबुवा बन आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर, यांच्या वंदनीय उपस्थितीत या अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी उपस्थित विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी संघटितपणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करण्याचा निश्चय केला.
सकाळी १०.३० वाजता शंखनादाने अधिवेशनाला प्रारंभ झाला. त्यानंतर सद्गुरु आणि मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. यानंतर सत्यध्यान विद्यापिठाच्या ब्रह्मवृंदांनी चैतन्यपूर्ण वाणीत वेदपठण केले. त्यानंतर सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर, ब्रह्मवृंद आणि मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद पोशे यांनी या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले होते.