सभाधीटपणा असलेली आणि संतांचे त्वरित आज्ञापालन करणारी रत्नागिरी येथील कु. मुक्ता गोविंद भारद्वाज (वय १९ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल पक्ष नवमी (१२.३.२०२२) या दिवशी कु. मुक्ता भारद्वाज हिचा १९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे वडील श्री. गोविंद भारद्वाज आणि रत्नागिरी येथील साधिका कु. नयना दळवी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. मुक्ता भारद्वाज

कु. मुक्ता भारद्वाज हिला १९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !


श्री. गोविंद भारद्वाज (मुक्ताचे वडील, (वय ५४ वर्षे)), रत्नागिरी

श्री. गोविंद भारद्वाज

१. सभाधीटपणा

१ अ. शाळेत वीरवृत्तीच्या नाट्यछटा धीटपणे सादर करून त्यात पारिताषिके मिळवणे : ‘लहानपणापासूनच मुक्तामध्ये सभाधीटपणा आहे. ती समुदायासमोर निर्भीडपणे बोलू शकते. शाळेत शारदीय नवरात्र उत्सवात तिने नाट्यछटा सादर केल्या होत्या. त्यात तिने सलग ३ वर्षे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळवली. तिने ‘यदा यदा हि धर्मस्य’ या नाट्यछटेमध्ये ‘जयद्रथ वध, धर्मयोद्धा अर्जुनाचे भगवंताने केलेले रक्षण’ आणि ‘घराघरांतून शिवबा पाहिजे !’ (हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी जिजाबाईंचे स्वगत) या क्षात्रतेज जागृत करणार्‍या नाट्यछटा सादर केल्या होत्या. धर्मजागृती सभेतही तिने बालकक्षामध्ये सेवा केली आहे.

१ आ. सनातन संस्थेच्या उपक्रमांर्गत विद्यालयामध्ये व्याख्यान घेणे : एका विद्यालयामध्ये प्रथमच ‘नववर्ष ३१ डिसेंबरला नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करा !’, या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मी मुक्ताला म्हटले, ‘‘तुला संहिता समोर न ठेवता हे व्याख्यान करायचे आहे.’’ तिने अभ्यास करून व्याख्यानाची सिद्धता केली आणि संहिता समोर न ठेवता सर्व सूत्रांसह हा विषय शाळेतील जवळजवळ १०० विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासमोर उस्फूर्तपणे मांडला. शाळेतील शिक्षकांनीही तिचे कौतुक केले. त्याच दिवशी तिने दुसर्‍या एका शाळेतही हे व्याख्यान केले.

१ इ. स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेणे : सध्या ती युवकांचा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेते. या वर्गात ती वीरवृत्तीने विषय मांडते. ती तिच्या मित्र-मैत्रिणींना स्वरक्षण प्रशिक्षण आणि राष्ट्र-धर्म यांविषयी सांगून त्यांच्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करते. ती नियमितपणे शौर्यजागृती व्याख्यान इत्यादींचा प्रसार करते.

२. जाणवलेले पालट

अ. पूर्वी तिच्यामध्ये ऐकण्याची वृत्ती नव्हती; आता तिची ऐकण्याची वृत्ती वाढली आहे.

आ. आता मुक्ता घरातील कामांत तिच्या आईला साहाय्य करते.

इ. पूर्वी कुंकू लावणे आणि सात्त्विक कपडे घालणे यांसाठी मुक्ताचा पाठपुरावा करावा लागत असे; परंतु आता ती स्वतःहून कुंकू लावते आणि सात्त्विक कपडे घालते.

३. स्वभावदोष

आळस, उलट बोलणे आणि नियोजन न करणे.’

कु. नयना दळवी, (वय २१ वर्षे) रत्नागिरी

कु. नयना दळवी

१. शिकण्याची वृत्ती

कु. मुक्ता भारद्वाज हिला नवीन सेवा शिकायला आवडते. मुक्ताताईला तांत्रिक (Technical) सेवा शिकण्याची पुष्कळ उत्सुकता होती; पण त्यासंदर्भात तिला काही ठाऊक नव्हते. तिने माझ्याकडून ती सेवा पूर्णपणे समजून घेऊन केली. एकदा मी तिला सहज म्हटले, ‘‘तुला एक नवीन सेवा शिकवायची आहे.’’ त्यानंतर मी हे सूत्र विसरून गेले; पण तिने मला त्या सेवेविषयी स्वतःहून विचारून ती सेवा शिकून घेतली.

२. तत्त्वनिष्ठता

मुक्ताताई आम्हा सगळ्यांमध्ये वयाने लहान आहे. तरीही तिला कुणाची काही चूक लक्षात आली, तर ती लगेच तत्त्वनिष्ठतेने आणि निर्भीडपणे चूक सांगते. ती त्यावर योग्य दृष्टीकोनही देते.

३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

‘काही कालावधीसाठी मी मुक्ताताईचा व्यष्टी साधनेचा आढावा घेत होते. एक दिवस तिला काही अडचणीमुळे व्यष्टी साधनेच्या आढाव्याला जोडणे शक्य नव्हते; म्हणून तिने ‘आढावा लिखित स्वरूपात पाठवते’, असे मला सांगितले; पण काही अडचणीमुळे तिला आढावा पाठवता आला नाही. तिला त्याची पुष्कळ खंत वाटली. तिने दुसर्‍या दिवशीच्या आढाव्यात ही चूक सांगून क्षमायाचना केली. प्रत्यक्षात ४ – ५ दिवसांपासूनच तिचा आढावा घेण्यास आरंभ झाला होता; पण तिच्यामध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य आणि चुकांविषयी खंत असल्याने तिने अल्प कालावधीत कृतीच्या स्तरावर प्रयत्न चालू केले.

४. सेवेची तळमळ

४ अ. सेवेसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करतांना भाव अनुभवता न येणे, तेव्हा विचारून घेऊन ती सेवा परिपूर्ण करणे : मुक्ताताईची सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ असते. तिला कोणतीही सेवा सांगितल्यावर मुक्ताताई लगेच ती सेवा समजून घेते आणि त्यातील अडचणी मनमोकळेपणाने विचारते. एकदा मी मुक्ताताईला शौर्यजागृती व्याख्यानाची उपस्थिती लिहून घेण्याची आणि ती उपस्थिती टिकून रहाण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याची सेवा करायला सांगितली होती. आध्यात्मिक उपाय करतांना तिला भाव अनुभवता येत नव्हता. व्याख्यान चालू असतांनाच ही सेवा करायची होती. तिची देवाला अनुभवण्याची तळमळ असल्यामुळे तिने लगेच मला या संदर्भात लगेच विचारून घेतले. त्यासाठी मी तिला भावप्रयोग सांगितला. तिने तसे प्रयत्न केले. या व्याख्यानाची उपस्थितीही टिकून राहिली आणि तिला या सेवेतून आनंद घेता आला. ‘मुक्ताताईमधील तळमळीमुळे देवाने तिला आनंद दिला’, असे मला वाटले.

४ आ. संतांचे त्वरित आज्ञापालन करणे : सध्या मुक्ताताई स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत सेवा करते. एकदा सगळ्या स्वरक्षण प्रशिक्षक सेवकांसाठी सद्गुरु सुश्री (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन होते. त्यात सद्गुरु स्वातीताईंनी सांगितले, ‘‘उपक्रम वाढवण्यासाठी आपण तळमळीने प्रयत्न करायला हवेत.’’ हे मार्गदर्शन ऐकल्यावर मुक्ताताईने लगेच तिच्या आसपासच्या युवकांना एकत्रित केले आणि त्यांच्यासाठी शौर्यजागृती व्याख्यानाचे नियोजन केले. तिच्यातील आज्ञापालन आणि तळमळ या गुणांमुळे तिथे लगेच एक प्रशिक्षणवर्ग चालू झाला. हा वर्ग पूर्ण झाल्यावर लगेचच तिने तिच्या महाविद्यालयातील मुलांना घरी बोलावले आणि मला ‘शौर्यजागृती’ हा विषय घ्यायला सांगितले. तिने त्यांच्यासाठीही लगेचच एका स्वरक्षण वर्गाचे नियोजन केले.

५. जाणवलेला पालट

पूर्वी मुक्ताताईचा सेवेमध्ये अत्यल्प सहभाग असायचा. एक दिवस तिने मला भ्रमणभाष करून ‘ताई, मी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याची सेवा करू का ? तू माझा सराव घेशील का ?’, असे विचारून त्या सेवेला आरंभ केला.

‘हे गुरुदेवा, आपण आम्हाला मुक्ताताईसारखी सहसाधिका देऊन तिच्याकडून शिकण्याची संधी दिली’, यासाठी कोटीशः कृतज्ञता. ‘तुमची मुक्ता लवकरच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन तुमच्या चरणांचे आनंदी फूल बनू दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.