काँग्रेसशासित छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी शेणापासून बनवलेल्या पेटीतून सादर केला अर्थसंकल्प !

रायपूर (छत्तीसगड) – काँग्रेसशासित छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ९ मार्च या दिवशी राज्याच्या विधानसभेत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या वेळी मुख्यमंत्री बघेल यांनी शेणापासून बनवलेली पेटी (ब्रीफकेस) हातात धरली होती. अर्थसंकल्प मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेणापासून बनवलेल्या पेटीचा वापर करण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. ही पेटी रायपूर गोकुळ धाम गौठाणमध्ये कार्यरत ‘एक पहल’ या महिला बचत गटाच्या महिलांनी सिद्ध केली आहे.

या पेटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही पेटी शेणाची पूड, चुन्याची पूड, मैदा, लाकूड आणि गवार डिंक यांचे मिश्रण थरावर थर लावून सिद्ध करण्यात आल्याचे या गटातील महिलांनी सांगितले.

शेण हे श्री महालक्ष्मीदेवीचे प्रतीक !

छत्तीसगडमध्ये असे मानले जाते की, शेण हे श्री लक्ष्मीदेवीचे प्रतीक आहे. हे लक्षात घेऊन बचत गटांच्या महिलांनी ‘गोमय पेटी’ बनवली आहे, जेणेकरून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पेटीद्वारे छत्तीसगडच्या प्रत्येक घरात लक्ष्मीचा प्रवेश होईल आणि छत्तीसगडमधील प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल.

छत्तीसगडमध्ये आहे ‘गोधन न्याय योजना’ !

छत्तीसगडमध्ये वर्ष २०२१ मध्ये ‘गोधन न्याय योजने’स प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार पशुपालक शेतकर्‍यांकडून शेण खरेदी करते. सरकारने यासाठी राज्यभरात वेगवेगळी ‘गौ ठाणे’ही बांधली आहेत. यामध्ये गायींची निगा राखून त्यांच्या शेणापासून गांडूळ खत सिद्ध करण्याचे काम केले जाते. सरकार केवळ गोपालकांकडून शेणखत खरेदी करत आहे. शेणापासून वीज आणि गुलाल बनवण्याचे काम सरकार करत आहे. गेल्या वर्षी गांधी जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी शेणापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता.